संपूर्ण राज्याची लाईट घालवून, CRPF मार्फत मंदिर परिसर रिकामा करुन तो विधी पार पडतो

ओडिशाच्या पुरीची जगन्नाथ यात्रा जगभरात प्रसिध्द आहे. शेकडो वर्षांपासून हा सोहळा खूप गाजावाजा करत साजरा केला जात असतो. देश विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक, पर्यटक या यात्रेला हजेरी लावत असतात, इतकं जगन्नाथ पुरी फेमस आहे. याला कारण आहे या मंदिराबद्दल आणि भगवान जगन्नाथ यांच्याबद्दल सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी.

या धार्मिक स्थळावर लोकांची इतकी आस्था असण्यामागे याठिकाणाशी जोडलेले वेगवेगळे रहस्य आहेत ज्यांचा ज्याला भगवान जगन्नाथ यांची माया म्हणून भाविक बघतात.

म्हणून काय आहे जगन्नाथपुरीबद्दलचे हे इंटरेस्टिंग फॅक्टस? जाणून घेऊया…

हिंदू धर्मात चार धाम यात्रेला खूप महत्व आहे. रामेश्वरम, बद्रीनाथ, द्वारका आणि जगन्नाथपुरी अशा चार दिशांना असलेल्या चार ठिकाणांचा या यात्रेत समावेश असतो. यातील जगन्नाथपुरी हे एक ठिकाण. इतिहासात याला अनेक नावांनी ओळखलं जातं.

सर्वप्रथम याला उत्कल म्हणून ओळखलं जातंय. नंतर पुरुषोत्तम क्षेत्र, नीलांचल, निलगिरी आणि मग जगन्नाथ पुरी असं या ठिकाणाचं नामांतर होत गेलं. जेव्हा याला उत्कल म्हणून ओळखलं जात होतं तेव्हा अनंतवर्तनम चोडगंगा या राजाने मंदिराची निर्मिती केल्याचं सांगितलं जातं. म्हणून या मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. 

भगवान जगन्नाथ यांना श्री विष्णू यांचा अवतार मानलं जातं. या मंदिरात भगवान जगन्नाथ यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ भगवान बालभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्या मूर्ती देखील आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी भगवान विष्णूंच्या सगळ्या अवतारांप्रमाणे जगन्नाथ स्वामींची पूजा केली जाते. त्यामुळे भगवान जगन्नाथ यांच्यात विष्णूंच्या सगळ्या अवतारांचं दर्शन भाविकांना घडतं, असं भाविक सांगतात.

तर भारताच्या बाकी मंदिरांमध्ये दगडी मूर्ती असतात. मात्र फक्त जगन्नाथपुरी इथे देवाच्या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत. श्री विष्णू यांच्या नरसिंह अवताराचं प्रतीक म्हणून या मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत, असं सांगितलं जातं. अशा या तिन्ही मूर्ती दर १२ वर्षांनी बदलल्या जातात. मात्र ही मूर्ती बदलण्याची प्रक्रिया खूप गुप्तपणे पार पाडली जाते.

ज्याक्षणी या मूर्ती बदलायच्या असतात तेव्हा सगळ्या राज्याची लाईट सरकारद्वारे बंद केली जाते. अख्ख्या राज्यात काळोख केला जातो. यावेळी मंदिराच्या आजूबाजूला कुणालाच फिरकण्याची परवानगी नसते. मंदिराच्या सुरक्षेसाठी मंदिराला CRPF च्या जवानांनी घेराव केलेला असतो. अशात केवळ एका व्यक्तीला मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाते. मंदिराचा सगळ्यात ज्येष्ठ पुजारी जो मूर्ती बदलणार असतो.

पण मंदिरात प्रवेश करण्याआधी त्या पुजाऱ्याच्या डोळ्यावर सुद्धा काळी पट्टी बांधली जाते आणि मगच मंदिरात पाठवलं जातं…

आता यावरून इतकं तर कळलंच असेल की मूर्ती बदलताना काय होणार आहे हे बघण्याचा अधिकार कुणालाच नसतो. अगदी जो मूर्ती बदलतो त्यालाही नाही. कारण जो कोणी मंदिरात काय होतंय, हे बघतो तो क्षणात मरण पावतो, अशी मान्यता आहे. म्हणून ही खबरदारी राखली जाते.

जेव्हा पुजारी मूर्ती बदलत असतात तेव्हा त्यांना चाचपणी करत मूर्ती बदलाव्या लागतात. मूर्ती चेंज करताना जुन्या मूर्तींमधून एक पदार्थ नव्या मूर्तींमध्ये टाकला जातो. या पदार्थाला ‘ब्रम्ह पदार्थ’ म्हणतात. पण या पदार्थाला हात लावताना थेट स्पर्श होऊ नये म्हणून पुजाऱ्यांच्या हातात ग्लव्ज घातले जातात.

मात्र आजवर ज्या पुजाऱ्यांनी हे काम केलं आहे त्यांचं म्हणणं आहे की  त्यांना काहीतरी जिवंत आहे, धडधडतंय असं जाणवतं आणि याचा आकार अगदी मुठीत बसेल इतका असतो.

इथल्या धार्मिक कथेनुसार, जेव्हा श्रीकृष्णांनी देह सोडला तेव्हा त्यांचं शरीर पंचतत्वात विलीन झालं मात्र फक्त त्यांचं हृदय जिवंत राहीलं. हेच हृदय जगन्नाथ स्वामींच्या मूर्तीत आहे, अशी मान्यता आहे. म्हणून या मूर्ती जिवंत आहेत, असं म्हणतात. 

देवांच्या मूर्ती व्यक्तिरिक्त या मंदिराचे देखील काही इंटरेस्टिंग फॅक्टस आहेत…

पहिला फॅक्ट आहे मंदिराच्या दरवाजाच्या.

मंदिराच्या एका दरवाजाचं नाव आहे सिंह दरवाजा. इथून भाविक मंदिरात प्रवेश करतात. या दरवाजातून आत जाण्याआधी भाविकांना समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. कारण मंदिर समुद्राजवळ वसलेलं आहे. पण जसं भाविक या सिंह दरवाजातून आत पाऊल टाकतात, तसं लाटांचा आवाज बंद होतो आणि सगळीकडे शांतता पसरते. दरवाजातून बाहेर पडताना सुद्धा असंच होतं. दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकताच परत लाटांचा आवाज यायला सुरुवात होते.

दुसरा फॅक्ट – मंदिरावर असणारे पक्षी.

आपण बघितलं तर सगळ्याच मंदिरांवर पक्षी दिसतात आणि मंदिरावरून उडतात. मात्र जगन्नाथ पुरीच्या मंदिरावरून आजवर एकही पक्षी उडालेला नाहीये. आणि म्हणूनच या मंदिरावरून विमानाला उडायला सुद्धा शासनाने परवानगी नाकारलेली आहे.

तिसरा फॅक्ट या मंदिराची सावली.

कोणतीही इमारत असो त्याची सावली दिवसभरात केव्हातरी पडत असतेच. मात्र या मंदिराच्या कोणत्याही शिखराची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळी कधीच पडलेली नाहीये, असं सांगितलं जातं.

चौथा फॅक्ट – मंदिराच्या झेंड्याबाबतीत.

प्रत्येक झेंडा हा हवेच्या दिशेने फडफडत असतो, हे आपल्याला माहीतच आहे. पण जगन्नाथ पुरीच्या मंदिरावरील झेंडा हा हवेच्या विरुद्ध दिशेने फडकतो. शिवाय हा झेंडा रोजच्या रोज बदलावा लागतो. मंदिराचे पुजारी हे काम करतात. जर एकही दिवस हा झेंडा बदलला नाही तर मंदिर पुढचे १८ वर्ष उघडणार नाही, असं सांगितलं जातं.

मंदिराच्या वर एक चक्र सुद्धा आहे. या चक्राला कुठूनही बघितलं तर असं वाटतं त्याचं तोंड त्याच दिशेला आहे.

पुढचा फॅक्ट मंदिराच्या प्रसादाबद्दल.

मंदिर म्हटलं तर प्रसाद ही अनेकांची फेव्हरेट गोष्ट असते. जगन्नाथ पुरीच्या मंदिरात मोठ्या लाकडी चूलीवर प्रसाद बनतो. यासाठी सात मोठे भांडे वापरले जातात. हे भांडे एकावर एक रचले जातात आणि आश्चर्याची बाब म्हणजे सगळ्यात वरती जे भांडं असतं त्यातला प्रसाद शिजून तयार होतो, असं सांगतात.

शिवाय रोज लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात प्रसाद ग्रहण करतात. मात्र त्यांना प्रसाद कधीच कमी पडलेला नाहीये. दिवसभर प्रसाद भाविकांना दिला जातो आणि बरोबर मंदिर बंद करण्याची वेळ झाली की प्रसाद संपतो. अगदी एक कणही वाया जात नाही, असं इथले लोक सांगतात.

यामागची मान्यता म्हणजे –

भगवान विष्णू चारही पवित्र धामांमध्ये प्रवास करत असतात. यातील जगन्नाथ पुरी याठिकाणी ते जेवण करतात. म्हणून या धामात कधीच अन्न कमी पडत नाही किंवा वाया जात नाही.. 

हे सर्व खरोखर घडतं याचे अनेक साक्षीदार आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी कशा घडतात हे आजही रहस्य आहे. भाविकांच्या मते ही जगन्नाथ स्वामींची कृपा आहे, माया आहे, जी त्यांचं पुरीतलं वास्तव्य दाखवत असते.

तुम्ही जगन्नाथ पुरीच्या या मंदिराला कधी भेट दिली आहे का? दिली असेल तर तुमचा अनुभव कसा होता? किंवा तुम्हाला इथे जाण्याची इच्छा आहे का? कमेंट्समध्ये सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.