मेजर ध्यानचंद म्हणाले होते, “मी मेल्यानंतर एकवेळ जग रडेल पण भारतीय लोकं रडणार नाहीत”

पंतपधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा, मेजर ध्यानचंद यांना न्याय मिळाल्याचं बोललं गेलं.

आजही आपल्या देशात कोणालाही आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ? असं विचारलं तर ते म्हणतं क्रिकेट. म्हणजे क्रिकेट सोडूनही बरेच वेगळे खेळ भारतात आहेत असं सांगण्याची वेळ आपल्यावर आली आहे. पण एक जमाना होता, जेव्हा भारताला यश आणि प्रसिद्धी मिळाली ती फक्त हॉकीमुळे.

या खेळाचा जादूगार म्हणून ओळखले जातात ते म्हणजे मेजर ध्यानचंद सिंग. ज्यांच्या जयंतीचा दिवस भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून साजरा केला जातो.

या महान खेळाडूने इतके जागतिक दर्जाचे पराक्रम केले पण त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यावर आलेली वेळ किती वाईट होती ,आणि त्याविषयी त्यांनी केलेलं विधान भारतीय म्हणवून घेणाऱ्याला लाज वाटावी इतकं जहरी होतं. त्यांना मिळालेली वागणूक आणि त्यांची हतबलता सांगणारा हा किस्सा.

१९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ध्यानचंद यांनी भारताला ऑलम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या खेळण्याने भारत हा जगातील सगळ्यात जास्त शक्तिशाली देश म्हणून गणला जाऊ लागला. त्यांच्या खेळण्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता भारताने १९२८ ते १९६४ या काळात झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धांपैकी ७ स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

ध्यानचंद यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४००पेक्षा अधिक गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत.

ध्यानचंद यांचा उतरत्या वयातला प्रवास मात्र अत्यंत दयनीय होता. घरातल्या अडचणी आणि आजारपण यामुळे ध्यानचंद त्रस्त होते. त्याचबरोबर देशातील तरुणाईच्या मनातून हॉकीबद्दलची कमी होत चाललेली गोडी यामुळे त्यांना वाईट वाटायचं. देशाचा राष्ट्रीय खेळ समजला जाणारा हॉकी खेळ एक दिवस नाहीसा होणार कि काय अशी भीती त्यांना सतत वाटत राहायची.

हॉकीतून संन्यास घेतल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच ढासाळली. मुलांची शिक्षण, लग्न याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. आर्थिक चणचण आणि बळावलेला आजार त्यांची पाठ सोडत नव्हते. भविष्यातील येणाऱ्या अडचणींच्या चिंतेने ते ग्रासले होते. त्यांच्या निवृत्तीनंतर भारतीय हॉकी फेडरेशन आणि भारत सरकार यांचं त्यांच्यावर शेवटपर्यंत लक्ष गेलं नाही.

ज्या हॉकीसाठी आपण कुटुंबाआधी खेळाला प्राधान्य दिलं, देशाला सगळं आयुष्य वाहिलं आता त्याच देशातील कोणी आपल्याकडे ढुंकूनसुद्धा पाहायला तयार नाहीत याचा त्यांना मात्र धक्का बसला. नंतर नंतर ते उदास आणि एकटेच राहू लागले. भारतीय लोक आणि सरकार यांच्यावर त्यांनी केले विधान मात्र जास्त भेदक होतं, ते म्हणाले होते कि,

मी मेल्यानंतर सगळं जग रडेल पण भारतीय रडतील याची मला खात्री वाटत नाही.

ध्यानचंद हे एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते, इतक्या साऱ्या अडचणी असूनही त्यांनी लोकांकडे आणि सरकारकडे मदत करा म्हणून हात पसरले नाही. त्यांच्या एका मित्राने त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांच्यासाठी एक वर्ल्ड टूर आयोजित केली होती ज्यात ते देशोदेशीच्या हॉकी ग्रुपसोबत चर्चा करणार होते आणि त्या खेळाडूंना मार्गदर्शन करून हॉकी हा खेळ पुन्हा मुख्य प्रवाहात आणता येईल असा त्यामागचा हेतू होता. पण त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने ती योजना बारगळली.

मित्रांनी परदेशी उपचार करण्यासाठी सुचवले आणि पैशाचीही तजवीज केली होती मात्र ध्यानचंद यांनी नकार दिला होता ते सांगायचे कि माझं मन आता भरलं आहे. १९७९ मध्ये त्यांची परिस्थिती बिघडली आणि त्यांना झाशीवरून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं. तिथेही त्यांना बेड मिळाला नाही , बराच वेळ लॉबीत थांबून राहावं लागलं, आरामदायक बेड सुद्धा त्यांना मिळाला नाही. 

त्यांना बघण्यासाठी त्यांचे घरचे लोक झाशीहून दिल्लीत आले मात्र त्यांना लिव्हर कॅन्सर झाला आहे असं कळलं. त्यांनी त्यांच्या परिवाराला सांगून ठेवलं होत कि माझ्या पदकांची आणि पुरस्कारांची काळजी घ्या पण त्यांच्या परिवाराने झाशीमध्ये भरवलेल्या एका प्रदर्शनात त्यांचं ऑलिम्पिक मेडल चोरीला गेलं.

हॉस्पिटलमध्ये असताना ते डॉक्टरांशी नेहमी खेळ या विषयावर बोलायचे, नवनवीन माहिती सांगायचे. खेळावर नितांत प्रेम असलेल्या मेजर ध्यानचंद यांनी ३ डिसेंबर १९७९ रोजी अखेरचा श्वास घेतला. आजारी असताना त्यांना कुणी पाहायलाही आलं नाही मात्र त्यांच्या निधनाचं वृत्त जाहीर होताच दवाखान्याबाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमली. पुढे त्यांचं पार्थिव हेलिकॉप्टरने नेण्यात आलं आणि त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.