महापालिकेच्या निवडणूका आल्या की उद्धव ठाकरे NSG चं ते पत्र हमखास दाखवतात…

शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा बुधवारी पार पडला. पक्षात झालेलं बंड आणि राज्यातल्या सत्त्तातरानंतर पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर भाषण केलं. या भाषणात त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका केली. सोबतच त्यांनी अमित शहा आणि भाजपलाही लक्ष्य केलं. पण या सगळ्यात त्यांनी मुंबईकर शिवसैनिकांचं प्रचंड कौतुक केलं.

“संकट मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक कुठल्याही संकटात शिवसैनिकच पुढे असतो.” असं म्हणत त्यांनी काही शिवसैनिकांनी केलेल्या कामाचे दाखलेही दिले.

यातच उद्धव ठाकरेंनी एक उल्लेख केला तो म्हणजे, एनएसजी कमांडो गौतम गुहा यांनी शिवसैनिकांना उद्देशून लिहीलेल्या पत्राचा. याआधीही २०१७ मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पत्र व्हायरल केलं होतं. याच पत्राचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी आता आपल्या भाषणात केला.

हे पत्र नेमकं काय होतं आणि एनएसजीनं शिवसैनिकांचं कौतुक का केलं होतं ?

२६ नोव्हेंबर २००८. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. हल्ला इतका तीव्र होता की, लवकरच नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थातच एनएसजी कमांडोजला पाचारण केलं गेलं. एनएसजी कमांडोज जेव्हा पोहोचले तेव्हा या हल्ल्यामुळं अनेक नागरीकांचा जीव धोक्यात होता. त्यामुळं त्यांना तातडीनं पावलं उचलणं महत्त्वाचं होतं.

मात्र एक मोठी समस्या होती, ती म्हणजे एनएसजी कमांडोजना गल्लीबोळातले रस्ते आणि नागरिक जिथे अडकले आहेत तिथं कसं पोहोचायचं हे माहित नव्हतं.

अशावेळी धाऊन आली ती मुंबईतली स्थानिक लोकं.

एनएसजी कमांडो यांनी पहिल्यांदाच आपल्या ऑपरेशनमध्ये स्थानिक लोकांची मदत घेतली. या स्थानिक लोकांनी कमांडोजना रस्ते दाखवले, कशाचीच भीती न बाळगता कुठल्याही संरक्षणाशिवाय ते या कमांडोजसोबत फिरले. काही जणांनी कमांडोजला खायला मिळेल याकडेही लक्ष दिलं.

यातलेच एक होते, कुलाब्याचे शाखा प्रमुख विजय सुर्वे. यांचाच उल्लेख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. विजय सुर्वे यांनी २००८ मध्ये ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला होता.

सुर्वे म्हणाले, ‘आम्ही सुरुवातीपासूनच पोलिसांची मदत करत उभे होतो, त्यांना सगळी माहिती पुरवत होतो. जेव्हा एनएसजी कमांडोज तिथं पोहोचले तेव्हा आम्ही त्यांना जी काही मदत लागेल ती करायला तयार आहोत असं सांगितलं. त्यांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यात मदत सुद्धा केली.’ 

एनएसजीच्या कमांडोजनं मुंबई पोलिसांच्या मदतीनं ऑपरेशन यशस्वी केलं आणि मुंबई एका मोठ्या संकटातून वाचली.

हे सगळं घडलं नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस. त्यानंतर काही दिवसच उलटले आणि विजय सुर्वे आणि एनएसजी कमांडोजना मदत करणाऱ्या इतर नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. जेजे हॉस्पिटलचे डीन, ताज आणि ओबेरॉय हॉटेलचे सुरक्षारक्षक यांच्यासोबतच ज्या नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून एनएसजी कमांडोजला मदत केली होती, त्या सगळ्यांना एनएसजी कमांडोजनी वैयक्तिक रित्या पत्र पाठवलं.

या पत्रात स्क्वाड्रन कमांडर लेफ्टनंट कर्नल गौतम गुहा यांनी, ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडोमध्ये एनएसजी ब्लॅक कॅट कमांडोजला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली होती. सोबतच नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.

एवढ्या मोठ्या संकटातून नागरिकांना वाचवणाऱ्या, स्वतःच्या प्राणांची बाजी लावणाऱ्या एनएसजी कमांडोजनं एवढ्या सगळ्या गोंधळातही आपल्याला मदत करणाऱ्या या नागरिकांना लक्षात ठेवलं आणि सगळं वातावरण शांत झाल्यावर, त्यांचे आभार मानायला हे कमांडोज विसरले नाहीत.

ही गोष्ट आजही विजय सुर्वे आणि इतर नागरिकांच्या लक्षात आहेच, पण सोबतच उद्धव ठाकरेही मुंबईकरांना शिवसैनिकांचं महत्त्व सांगताना हा मुद्दा सांगायला विसरले नाहीत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.