युवराजनं ६ सिक्स हाणले त्याच्या आधी फ्लिन्टॉफनं त्याला कोणती शिवी दिली होती ?

१९ सप्टेंबर २००७. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी२० वर्ल्डकपची भारत विरुद्ध इंग्लंड मॅच. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली होती. गंभीर आणि सेहवागने सुरवातीपासून धडाका लावला होता. चौदाव्या ओव्हरला १३६ रन्सवर सेहवागच्या रुपात भारताची पहिली विकेट पडली.

पुढच्या दहा-वीस रन्समध्ये गंभीर आणि उत्थप्पा देखील आउट झाले. झटक्यात रनरेट खाली आला. इंग्लंडला वाटलं मॅच थोडीफार कंट्रोलमध्ये आली. आता क्रीजवर धोनी आणि युवराज होते. ते दोघेही रनरेट वाढवण्याचा प्रयत्न करू लागले.

भारताचा जुना शत्रू ऑल राउंडर अँड्र्यू फ्लिन्टॉंफ बॉलिंगला आला. स्लेजिंग समोरच्या टीमच्या खेळाडूंची खोड काढायची त्याची सवय जुनी होती. या फ्लिंटॉफमुळेच गांगुलीने २००२ मध्ये लॉर्ड्सवर शर्ट फिरवला होता.

या स्पर्धेत युवराज अजून आपल्या खऱ्या रंगात आला नव्हता. त्याचा फॉर्म थोडा वाईटच चाललेला. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्याच मस्कारेन्ह्सनं युवराजला एकाच ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स मारले होते. युवीच्या डोक्यात ते घुमत होतं. त्यात त्याची फ्लिन्टॉफशी खडाजंगी झाली.

झालं काय की, फ्लिन्टॉफच्या ओव्हरमध्ये युवराजने दोन फोर मारल्या. टी२०च्या मानानं ते किरकोळच होतं. तशी ती ओव्हर फ्लिन्टॉफने चांगली टाकली होती. पण काय झालं कुणास ठाऊक, फ्लिन्टॉफ आणि युवराज मैदानात भांडताना दिसले. धोनी युवराजला अडवत होता पण युवी तरी  फ्लिन्टॉफला बॅट दाखवत त्याच्या अंगावर धावून जात होता.

मग एक खतरनाक किस्सा झाला

त्या भांडणामुळं पंजाबी मुंडा असलेला युवी सरकला होता. त्यानंतर बॉलिंगला आला स्टुअर्ट ब्रॉड, भडकलेल्या युवीनं सगळा राग ब्रॉडवर काढला. युवराजनं एका पाठोपाठ एक सलग सहा लंबे लंबे सिक्स मारले.

त्यादिवशी भारतात दुसरी दिवाळी झाली. युवराजच्या प्रत्येक सिक्स बरोबर फटाक्यांची माळ फुटत होती. आणि इंग्लंडमध्ये सिक्स खाणाऱ्या ब्रॉडऐवजी युवराजला उचकवणाऱ्या फ्लिन्टॉफच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहिली जात होती.

युवराजनं अवघ्या १२ बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं आणि विश्वविक्रम नोंदवला. पुढे त्याला  फ्लिन्टॉफनंच आउट काढलं पण तोवर उशीर झाला होता. भारताने ती मॅच सहज जिंकली. युवराजला  त्या मॅचमध्ये जो फॉर्म गवसला त्यानंतर त्यानं मागं वळून पाहिलं नाही. धोनीनं पहिला वर्ल्डकप उचलला यात युवराजचा सगळ्यात मोठा वाटा होता.

पण त्या दिवशी फ्लिन्टॉफ युवीला नेमका काय म्हणाला होता, हे मात्र सिक्रेटच राहिलं. 

अनेकांनी युवीला प्रश्न विचारला की, असं काय म्हणाला फ्लिन्टॉफ की तु एवढा चिडलास ? युवराज नेहमी हसून उत्तर द्यायचं टाळायचा. पण सुप्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालच्या शोमध्ये मात्र तिच्या लडिवाळ आग्रहापुढे युवी पाघळला आणि तो फेमस संवाद त्याने सांगितला.

जेव्हा फ्लिन्टॉफची ओव्हर संपली तेव्हा त्याला युवीने दोन फोर ठोकल्या होत्या. त्यानंतर फ्लिन्टॉफ  त्याला सहज म्हणाला,

“Those were f***ing ridiculous shots.”

युवराज त्याला म्हणाला,

“F*** You.”

फ्लिन्टॉफ चमकला. त्याला कधी कोणी उलटी शिवी दिली नव्हती. त्याने युवराजला विचारलं,”Excuse Me.” युवराज म्हणाला,

“भावा, तुला जे ऐकू आलं मी तेच म्हणालो. फ* यु.”

टोपी घालून आपल्या फिल्डिंग पोजिशनला जात असलेला फ्लिन्टॉफ म्हणाला,

“परत बोललास तर तुझा गळा कापीन.”

इंग्लंडच्या खेळाडूंना कधी कोणाच ऐकून घ्यायची सवय नव्हती. त्यात फ्लिन्टॉफ तर अति माजुरडा. आपला युवराज पण गरम डोक्याचा होता. धोनी त्याला थांबवत होता पण हा गडी काही ऐकत नव्हता. अंपायरच्या समोरच तो फ्लिन्टॉफच्या दिशेनं गेला आणि त्याला बॅट दाखवून म्हणाला,

“ही बॅट बघितलीस ? तुला माहित आहे का की मी तुला ती कुठे मारणार आहे?”

फ्लिन्टॉफ राहिला साईडला आणि ब्रॉड तावडीत घावला. युवराजनं त्याच माहोलमध्येच बॅटिंग केली आणि इतिहास घडला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.