२३ आमदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराला हरवून आलेत ; खरं कारण मतदारसंघाचं राजकारण
मागच्या सहा दिवसांत एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या बंडखोर आमदारांचा आकडा ४८ वर गेलाय. यात शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार आहेत, तर अपक्ष किंवा छोट्या पक्षातल्या आमदारांचा आकडा आहे ९.
बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंकडून वेळ मिळत नाही, मातोश्रीवर प्रवेश मिळत नाही, पुरेसा निधी मिळत नाही असे अनेक आरोप केले. काही आमदारांचे व्हिडीओही एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केले.
पण बंडखोरीच्या कारणांमधलं एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे महाविकास आघाडी. निवडणूका झाल्यानंतर शिवसेनेनं भाजपसोबतची युती मोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं.
बंडखोरी केलेले तब्बल २३ आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरवून विधानसभेत गेलेत, त्यामुळं साहजिकच महाविकास आघाडी म्हणून पुढची निवडणूक लढवायची झाली, तर या आमदारांना तिकीट मिळवण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत मोठा संघर्ष करावा लागणार आहे. अर्थात मतदारसंघावर वर्चस्व असलेले काही आमदार याला अपवाद ठरतील.
काँग्रेस-राष्ट्रवादीला हरवून विधानसभेत गेलेले सेना आमदार कोण आहेत हे पाहुयात…
१) शंभूराज देसाई –
साताऱ्यातल्या पाटणमधून निवडून आलेल्या शंभूराज देसाईंना मोठा राजकीय वारसा लाभलाय, २०१९ च्या निवडणुकीत १,०६,२६६ मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर राहीले, ज्यांना ९२०९१ मतं मिळवण्यात यश आलं. मध्यंतरी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत पाटणकर यांनी देसाईंचा १४ मतांनी पराभव केला आणि तिथं संघर्षाची ठिणगी पडली.
२) संदीपान भुमरे –
उद्धव ठाकरेंसाठी जीवही देईल असं म्हणणाऱ्या भुमरेंनी २०१९ च्या निवडणुकीत ८३ हजार ४०३ मतं मिळवली आणि ६९ हजार २६४ मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार होते, राष्ट्रवादीचे नारायण गोर्डे. संदीपान भुमरे पैठणमधून पाचव्यांदा आमदार झाले.
३) महेश शिंदे –
२०१९ च्या निवडणुक प्रचारातली सगळ्यात गाजलेली घटना होती, ती म्हणजे शरद पवारांची पावसातली सभा. या सभेनंतर साताऱ्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना चांगलं यश मिळालं, पण याला अपवाद होते शशिकांत शिंदे.
शिवसेनेच्या महेश शिंदेंनी त्यांचा ६२३२ मतांनी पराभव केला. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय, त्यांचा पराभव जरी झालेला असला, तरी आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी ही जागा सेनेसाठी सोडण्याची शक्यता कमीच होती.
४) महेंद्र थोरवे –
कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांचा पराभव केला होता. या विजयात तब्बल १८ हजारांचा फरक होता.
५) भरत गोगावले –
महाडमधून निवडून आलेल्या गोगावले यांना १,०२,२७३ मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माणिक जगताप राहिले. माजी आमदार असणाऱ्या माणिक जगताप यांचं २०२१ मध्ये निधन झालं, त्यामुळं आगामी निवडणुकांमध्ये जगताप यांच्या कुटुंबियांपैकी कुणी सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी तिकीट मागण्याची शक्यता आहेच. त्यामुळं नैतिकतेच्या आधारावर सेनेला हे सीट सोडावं लागलं असतं, असं बोललं जातं.
६) तानाजी सावंत –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटेंचा ३२ हजार ९०२ मतांनी पराभव करत तानाजी सावंत यांनी परांडामधून बाजी मारली. मताधिक्य जास्त असलं, तरी मोटे २००४ पासून सलग तीन टर्म आमदार आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी या जागेवर हक्क सांगण्याची आणि तानाजी सावंत यांना उमेदवारी मिळाली, तरी बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
७) रमेश बोरनारे –
वैजापूरमधून राष्ट्रवादीच्या अभय पाटलांचा तब्बल ५९ हजार १६३ मतांनी पराभव करत बोरनारेंनी विजय मिळवला.
८) ज्ञानराज चौगुले –
उमरगा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यात ज्ञानराज चौगुले यांनी काँग्रेसच्या दत्तू भालेराव यांचा २५ हजार ५८६ मतांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा आमदारकीला गवसणी घातली.
९) बालाजी किणीकर –
अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रोहित साळवे यांच्यावर २९ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. या एकहाती विजयाला काही पदरही आहेत, २०१४ च्या निवडणुकीत किणीकरांनी फक्त ३ हजार मतांनी विजय मिळवला होता, दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजेश वानखेडे होते.
२०१९ च्या निवडणूका सेना-भाजपनं युती करुन लढवल्या, ज्याचा किणीकरांना फायदा झाला, सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि मनसेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळंही त्यांचा विजय सोपा झाला.
१०) प्रकाश आबिटकर –
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार राधानगरीचे प्रकाश अबिटकर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीवेळी शिवसेनेनं महाविकास आघाडीला प्राधान्य देत, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना तिकीट देण्याऐवजी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना पाठिंबा दिला होता. साहजिकच पूर्ण कोल्हापूरवर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं या मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता नोंदवण्यात येते.
११) बालाजी कल्याणकर –
सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या दत्तात्रय सावंत यांचा १२ हजार मतांनी पराभव करत कल्याणकर यांनी नांदेड उत्तरमधून बाजी मारली. माजी राज्यमंत्री, नांदेडचं पालकमंत्रीपद भूषवणारे सावंत अशोक चव्हाण यांचे खास समजले जातात. त्यामुळं त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून प्रयत्न होणं साहजिकच आहे.
१२) संजय रायमुलकर –
मेहकर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येत रायमुलकर यांनी काँग्रेसच्या अनंत वानखेडे यांच्यावर ६२ हजार २०२ मतांनी विजय मिळवला होता.
१३) श्रीनिवास वनगा –
पालघर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामणी वनगा भाजपचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी वनगा यांना साथ दिली. २०१९ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार अमित घोडा यांच्या जागी सेनेनं वनगा यांना तिकीट दिलं, त्यांनी काँग्रेसच्या योगेश नाम यांचा ४० हजार मतांनी पराभव केला.
१४) सुहास कांदे –
बाद झालेल्या मतामुळं चर्चेत आलेल्या आमदार सुहास कांदेंनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांचा जवळपास १४ हजार मतांनी पराभव केला होता. पंकज भुजबळ हे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र.
विशेष म्हणजे निवडणुकीनंतर नांदगावमध्ये भुजबळ विरुद्ध कांदे हा वाद चांगलाच गाजला. ज्यामुळं संजय राऊत विरुद्ध छगन भुजबळ असा सामनाही रंगला होता. त्यामुळं आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि सलग दोनदा आमदार राहिलेल्या पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी भुजबळ यांनी आपलं राजकीय वजन वापरल्यास, कांदे यांना सेनेकडून पुढची निवडणूक लढवणं अवघड ठरू शकतं.
१५) चिमणराव पाटील –
एरंडोल मतदारसंघातून चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार सतीश पाटील यांचा १८ हजार मतांनी पराभव केला. जर आगामी निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या, तर जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद भूषवलेल्या सतीश पाटील यांच्यासोबत उमेदवारीची शर्यत चिमणराव पाटील यांना जिंकावी लागेल.
१६) लता सोनावणे –
चोपडा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांचा २० हजार मतांनी पराभव करत सोनावणे यांनी बाजी मारली. या मतदारसंघातून याआधी लता यांचे पती चंद्रकांत सोनावणे आमदार होते.
१७) प्रताप सरनाईक –
ओवाळा माजीवाडा मतदारसंघातून सरनाईक यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा तब्बल ८४ हजार मतांनी पराभव केला.
१८) योगेश कदम –
शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र असणाऱ्या योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांचा पराभव केला. रामदास कदम आणि सेना नेतृत्वात संघर्ष सुरू आहे, दुसऱ्या बाजूला संजय कदम आणि योगेश कदम यांच्यातही मतदारसंघात वादाची ठिणगी उडाली होती. त्यामुळं जागावाटपात दापोलीत सेना की राष्ट्रवादी असा पेच निश्चितच उभा राहू शकतोय.
१९) मंगेश कुडाळकर –
कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळे यांचा २१ हजार मतांनी पराभव केला.
२०) दादा भुसे –
दादा भुसेंनी मालेगाव बाह्य मतदार संघाच्या निर्मितीपासून तिथं एकहाती वर्चस्व निर्माण केलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा आमदार होत, त्यांनी काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा ४७ हजारांपेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला.
२१) उदय सामंत –
पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असणाऱ्या उदय सामंत यांनी २०१४ ची निवडणूक शिवसेनेकडून लढवली आणि जिंकली. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी आपलं रत्नागिरीमधलं वर्चस्व कायम ठेवत राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा ८७ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
२२) दिलीप लांडे –
चांदिवली मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. त्यावेळी दिलीप लांडे मनसेकडून लढले आणि काँग्रेसच्या मोहम्मद अरिफ खान यांच्या विरोधात दुसऱ्या क्रमांकावर राहिले. २०१४ मध्ये खान यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत लांडे सेनेकडून लढले; मोहम्मद आरिफ खान आणि त्यांच्यात कडवी झुंज झाली. ज्यात लांडे यांचा फक्त ४०९ मतांनी विजय झाला. साहजिकच मोहम्मद आरिफ खान आगामी निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न करणार हे नक्की…
२३) एकनाथ शिंदे –
बंडखोरांमधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव असणाऱ्या, एकनाथ शिंदेंनी आपल्या कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा ८९ हजार ३०० मतांनी पराभव केला होता.
आपल्या मतदारसंघात वर्चस्व असणारे आमदार सोडले, तर कित्येक शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या उमेदवारांवर संघर्ष करुन मात करत विजय मिळवलाय.
त्यामुळं जर शिवसेना महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं गेली, तर कित्येक आमदारांचं हातचं सीट जाण्याची शक्यता आहे आणि कित्येक आमदारांना बंडखोरांचा धोका आहे.
या दोन्ही समस्यांचा तोडगा म्हणून आमदारकी वाचवण्यासाठी सध्या तरी त्यांनी शिवसेनेविरोधातच बंडखोरी करण्याचा पर्याय निवडलाय, अशी चर्चा आहे.
हे ही वाच भिडू:
- श्रीनिवास वनगा यांना जी साथ दिली त्यावरूनच कळतं इतके आमदार एकनाथ शिंदेंकडे कसे आहेत..
- बंडखोर आमदारांमुळे येत्या महानगरपालिका निवडणुकांवर काय परिणाम पडणार ?
- भाजपचे दोन तुकडे होणार होते, राज्यात उभी फुट पडली… तेव्हा बाळासाहेबांनी बंड थोपवलं..