नाशिकमधल्या २२ जणांच्या मृत्यूला नेमकं जबाबदार कोण ?

नाशिकमध्ये आज दुपारी २२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी आली. शहरातील झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यानं इथं उपचार घेत असलेल्या २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. स्वतः नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. या घटनेनंतर हॉस्पिटल प्रशासन आणि नाशिक महापालिका प्रशासनाविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं नाशिकमध्ये?

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,

नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयामध्ये १५० रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. आज दुपारी ऑक्सिजन टाकीमधून एका ठिकाणहून गळती झाल्याने प्रेशर कमी झालं आणि अर्धा तास इथला ऑक्सिजन पुरवठा बंद झाला. त्या वेळात २२ जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला.

तर नाशिकचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,

सध्या टेक्निकल इंजिनियर पाठवून ही गळती थांबवण्यात आली असून २५ टक्के ऑक्सिजन शिल्लक आहे. ही गळती थांबेपर्यंत ऑक्सिजन तुटवड्यामुळे २२ रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनच प्रेशर कमी झालेलं चालतं. पण व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना १ मिनिट देखील प्रेशर कमी झालेलं चालत नाही. या घटनेची पुढील चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असं देखील जाधव यांनी सांगितलं आहे.  

तर झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी हि तांत्रिक गोष्ट असल्याचं सांगितलं आहे. आता वेल्डिंग करत आहोत. त्यामुळे हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल असं ते म्हणाले आहेत.

या घटनेनंतर शासनाकडून काय सांगण्यात आले आहे? 

आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर. 

या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तसच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

ते म्हणाले, नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे.

विरोधी पक्षाकडून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्देवी असल्याचं म्हंटल आहे. हे अतिशय व्यथित करणारं आहे. अन्य रुग्णांना मदत पुरवून त्यांना आवश्यक असल्यास योग्य ठिकाणी हलवण्यात यावं. आम्ही याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करतो. असं फडणवीस म्हणाले आहेत.

तर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? असा प्रश्न विचारात घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

सोबतच मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असल्याचं म्हणत त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या सर्व घटनेचे खापर राज्य सरकार फोडत आरोग्य मंत्री जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थिती केला आहे. 

ते म्हणाले, ऑक्सिजन पुरवठा मधे त्रुटी, महाराष्ट्रात नाशिक हॉस्पीटल २२ कोवीड रुग्णांचे मृत्यू. १२ एप्रिल नालासोपारा येथे ६२ मृत्यू, १० एप्रिल ठाणे येथे २६ रुग्णाचा जीव धोक्यात, १९ एप्रिल मुंबईत १६३ रूग्णांना हलविले…. आरोग्य मंत्री राजेश टोपे जवाबदारी स्वीकारणार का!!??

मात्र या २२ रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

राजकीय पक्षांकडून आरोप – प्रत्यारोप होत राहतील पण जर तांत्रिक दृष्ट्या बघायचं म्हंटलं तर संबंधित हॉस्पिटल हे महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या हॉस्पिटल मध्ये व्यवस्था उभारणीची जबाबदारी हि देखील महापालिकेची आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये यापूर्वी देखील ऑक्सिजनसंबंधी तक्रारी आल्याची घटना आता समोर येत आहे.

२३ मार्च २०२१ रोजी सकाळ माध्यम समूहानं दिलेल्या बातमीनुसार, 

गेल्यावर्षी रुग्णालयाच्या कमी क्षमतेच्या ऑक्सिजन यंत्रणेवर मोठा ताण पडला. त्यावर उपाय म्हणून महापालिकेकडून इथं अतिरिक्त ऑक्सिजन साठ्याची यंत्रणा उभी करण्याचा विचार केला गेला. त्याचं काम देखील सुरु झालं.

त्यानंतर रुग्णांची संख्या घटली. राज्यात मिशन बिगिन अगेन म्हणत अनलॉक झाले. त्यामुळे या रुग्णालयांची वैद्यकीय यंत्रणा देखील काहीअंशी बिनधास्त झाली. कारण रुग्णालयात अतिरिक्त ऑक्सिजन टॅंक बसविण्याचे काम काही दिवस संथ गती चालले आणि नंतर एकदम बंद झाले.

आठ दिवसात यंत्रणा सुरु होईल, असे उत्तर अनेक मिळत राहिले.

मात्र काही दिवसापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यानंतर वैद्यकीय यंत्रणा पुन्हा जागी झाली. त्यांनी पुन्हा एकदा ऑक्सिजन टॅंक बसविण्याचे काम हाती घेतले. जवळपास १३ हजार लिटर क्षमतेची टॅंक बसविली.

पण हा १३ हजार लिटरचा टॅंक केवळ शोभेची वस्तू ठरला. कारण त्याच पाइप लाईनसह अन्य काही यंत्रणेचे काम मागच्या महिन्यापर्यंत पूर्ण झालेल नव्हतं. त्यामुळे जुन्या आणि लहान क्षमतेच्याच टॅंकच्या माध्यमातूनच ऑक्सिजन पुरवठा होत होता. 

त्यामुळे आता या घटनेला तांत्रिक चूक म्हणायची कि महानगरपालिका आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून झालेली चूक? पण यामुळे २२ रुग्णांचा जीव गेला हे वास्तव नाकारून चालणार नाही.

मृतांना बोलभिडूकडून भावपूर्ण श्रद्धांजली….

Leave A Reply

Your email address will not be published.