विमानतळावर पाणी बॉटल २०० रु. ला मिळते, ग्राहक न्यायालयात गेलात तर काय होतं माहित आहे का..?

आमचा एक कार्यकर्ता लय वांड आहे. कुठेही गेला तरी नियम दाखवून राडा करणं हा त्याचा जन्मजात आगावूपणा आहे. तर झालं अस की परवा हा गडी पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर गेलेला. तिथं त्यानं पाण्याची बाटली घेतली.

समोरच्यानं पाण्याची किंमत २०० रुपये सांगितली. गडी खवळला. २० रुपये किंमत असताना थेट २०० रुपये. चवताळून भांडू लागला. म्हणाला तुम्ही कायद्याने MRP पेक्षा जास्त किंमत घेवू शकत नाही. दूकानदार सनी लिओनी सारखं मंद हसत त्याला म्हणला,

आधी MRP तर बघ भावड्या.. MRP बघितली तर 200 रुपये होती. गड्याला पटनाचं. कितीही झालं तरी सगळं आयुष्य चार रुपयाचा बिस्कीट पुडा आणि २० रुपयाची पाण्याची बाटली हेच बघत गेलतं. बर ब्रॅण्ड पण सेम. तरी इथं किंमत २०० अन् बाहेर २० अस कस काय.

एकतर इथल्या दूकानदारानं घोळ घातलाय, किंवा मॅटर डिपय. हे त्याचा लक्षात आलं. मग आम्हाला मॅसेज करून विचारलं नेमकी भानगड काय आहे, आणि मी याच्या विरोधात कोर्टात जावू शकतोय का. तेव्हा म्हणलं मॅटर विस्कटून सांगावा..

तर विमानतळावर खाद्य पदार्थ महाग असण्याची ही ४ कारणे सांगितली जातात. 

१) मागणी आणि पुरवठा   

विमानतळ हे हाय सिक्युरिटी झोन मध्ये येत. यामुळे प्रवाशांना बाहेरचे खाद्य पदार्थ विमानतळावर नेता येत नाही. यामुळे भूक लागल्यावर प्रवाशांना काही खाण्याची किंवा पिण्याची गरज असते, तेव्हा  विमानतळावर असणाऱ्या स्टॉल वरून जास्त किमतीचे खाद्यपदार्थ घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. 

तसेच सिक्युरिटी कारणामुळे विमानतळावरील दुकानात, स्टॉल मध्ये सुरक्षेतेच्या कारणामुळे जास्त माल ठेवता येत नाही. यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असं गणित तयार होत. साहजिकच, जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होते, तेव्हा किमती वाढतात. यामुळे विमानतळावर खाद्य पदार्थ हे महाग मिळतात. 

२) विमानतळावर स्टोर घेऊन चालविणे खर्चिक बाब आहे   

विमानतळावर एखाद्या स्टॉल भाड्याने घेणं हे खर्चिक काम आहे. विमानतळ प्रोफीटेबल ठेवणे हे फार अवघड काम असल्याचे सांगितलं जातं. त्यामुळे इथं दुकानाचे भाडे जास्त असते. जागा कमी भाडे जास्त हे समीरकरण इथं पाहायला मिळत. 

किरकोळ विक्रेत्यांना १०० ते १५० स्क्वेअर फूट जागेसाठी हजारांमध्ये भाडे द्यावे लागते. सुरक्षा बरोबर स्वच्छतेच्या बाबत विमानतळावर अधिक काळजी घेतली जाते. यासाठी मेंटेनंस फी द्यावे लागते. २४ तास हा स्टॉल सुरु ठेवावं लागत. यासाठी स्टॉल वाल्याना अतिरिक्तखर्च द्यावा लागतो. हा खर्च भरून काढण्यासाठी मग हे स्टॉल चालक आपल्या वस्तू,खाद्य पदार्थ महाग विकत असल्याचे सांगितले जाते 

३) कर्मचाऱ्यांसाठी अधिक खर्च करावा लागतो 

विमानतळ हे शहराच्या दूर अंतरावर असतं. यामुळे विमानतळावरील स्टॉल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येण्या-जाण्याचा खर्च द्यावा लागतो. तो खर्च स्टॉल मालकांना करावा लागतो. तसेच इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा जात द्यावा लागतो. 

विमानतळावर सुरक्षा, इथं येणारे व्हीआयपी, इथले नियम हे सगळं समजून सांगण्यासाठी वेळोवेळो विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. यामुळे व्यवसाय खर्चात वाढ होते परिणामी उत्पादन महाग विकल्या जातात.   

४) लेस कॉम्पिटिस्टीशन 

विमानतळाच्या बाहेर स्टॉल, रेस्टोरंट चालकांमध्ये स्पर्धा असते. एकमेकांकडे ग्राहक खेचून घेण्याचा प्रयत्न स्टॉल व्यावसायिकांमध्ये असते. त्यामुळे ग्राहक जिकडे परवडेल तिथे वस्तू खरेदी करत असतात. विमानतळावर उलट परिस्थिती असते. 

विमानतळावर स्टॉल, दुकानांची हि संख्या खूप कमी असते. प्रवाशांन समोर मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे स्टॉल चालविणाऱ्यांना पदार्थ महाग विकण्याची संधी असतेच.म्हणून प्रवासी मिळेल त्या किंमतीत हे पदार्थ खरेदी करत असतात.

आत्ता मुळ मुद्दा ग्राहक कोर्टात दाद मागता येते का..”

विमानतळावर मिळणाऱ्या महाग पदार्थ विरोधात काही जण ग्राहक कोर्टात गेले होते. 

तसेच या प्रकरणाची तक्रार एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे सुद्धा केली होती. यानंतर  एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने जे विमानतळ भारत सरकार चालविते त्या विमानतळावर चहा आणि इतर पदार्थ एमआरपी रेड मध्ये देण्यासाठी सरकारी मालकीचे स्टॉल सुरु करण्यात येईल असे सांगितले होते. 

विमानतळावर खाद्य पदार्थ का महाग विकले जातात याची कारणे समजून घेण्यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरातील प्रमुख विमानतळाच्या देखभाल दुरुस्ती जबाबदारी असणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.

त्यानंतर देशातील मुंबई, दिल्ली, बंगलोर सारखे विमानतळ हे खासगी कंपनी मार्फत चालविण्यात येते. यामुळे याठिकाणच्या स्टॉल वर मिळणाऱ्या पदार्थांची किंमत बदलता येणार नसल्याचे ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.  

  हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.