दिल्लीतलं तापमान शुन्याच्या खाली गेलं तरी कधीच बर्फवृष्टी होत नाही…

यंदाच्या वर्षी उत्तर भारतातल्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालंय. पंजाब, राजस्थान सोबतच दिल्लीमध्येही यंदा नेहमीपेक्षा अधिक थंडी असल्याची वृत्त आहेत.

दिल्लीतलं तापमान जवळपास २.५ डिग्री पर्यंत खाली उतरलंय. दिल्ली पुर्णपणे गारठलंय. यंदा दिल्लीतलं तापमान हे देशातल्या हिल स्टेशन्सप्रमाणे खाली उतरलंय आणि पुढते २-३ दिवस तापमान आणखी खाली घसरू शकतं असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.

आता हे तापमान शून्य डिग्रीला गेलं तर, तिथे बर्फ पडेल असं वाटत असलं तरी ते शक्य नाहीये.

दिल्लीत बर्फ पडू शकत नाही असं आमचं नाही तज्ज्ञांचंच मत आहे. असं म्हणण्यामागे कारणही तसंच आहे. दिल्ली शहराची भौगोलिक परिस्थिती अशा प्रकारची आहे की, इथे बर्फ पडणं शक्य नाही.

मुळात, बर्फ कशाप्रकारे पडतो हे बघुया.

जलचक्र कसं असतं आणि त्यामुळे पाऊस कसा पडतो तसंच काहीसं बर्फ पडण्याचंही असतं. म्हणजे, पाण्याच्या साठ्यातून सुर्यकिरणांमुळे पाण्याची वाफ होते. ती वाफ वर जाते. आकाशात वर गेली की हवा थंड झालेली असते आणि त्यामुळे त्या वाफेचे ढग तयार होतात. मग, या जलयुक्त ढगांना थंड वारा लागला की, पाऊस पडतो.

अश्याच प्रकारे वाफ होते, वर जाऊन वाफेचे ढग होतात आणि मग, बर्फ पडतो. बर्फ पडल्यावर मात्र, आकाशातून जमिनीवर येईपर्यंत गरम हवा लागली तर, बर्फाचं पाणी होतं आणि पाऊस झाला असं वाटतं. त्यामुळे, बर्फ पडण्यासाठी शून्य किंवा त्यापेक्षा कमी डिग्री तापमान आवश्यक असतं.

दिल्लीच्या बाबतीत तापमान ही अडचण नाहीये.

आता दिल्लीमधलं तापमान हे आताही अतिशय कमीच आहे आणि पुढल्या दोन दिवसात शून्य डिग्रीपर्यंतही जाऊ शकतं असा अंदाज आहे. असं असलं तरीही दिल्लीकरांना दिल्लीत बर्फ बघायला मिळणं काही शक्य नाहीये.

त्यामागचं कारण म्हणजे, ढग.

तज्ज्ञांच्या मते,

“दिल्ली शहरावर कमी ढग तयार होतात. हिवाळ्यात ढग तयार झाले तरी, दिल्लीतल्या कोरड्या हवामानामुळे त्या ढगांमधून बर्फ पडत नाही. उलट, हे ढग सुर्याकडून येणारी उष्णता जमिनीवर पोहोचू देत नाही.”

याशिवाय, बर्फ पडणारं ठिकाण हे शक्यतो समुद्रसपाटीपासून उंचीवर असतं. त्याचं कारण म्हणजे, बर्फ जमिनीवर पोहोचेपर्यंत वितळत नाही. दिल्ली मात्र उंचीवर वसलेलं ठिकाण नाहीये.

त्यामुळं दिल्लीत बर्फ पडणं शक्य नसल्याचं तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे.

याआधी दिल्लीत बर्फ पडतोय असं नागरिकांना वाटलं होतं.

२००६मध्ये हिवाळ्यात पहाटेच्या सुमारास रस्त्यावर आणि रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांवर बर्फ पडलेला असल्याचं लोकांनी सांगितलं होतं. दिल्लीतल्या विविध भागांत लोकांनी हा बर्फ पाहिल्याचं सांगितलं होतं, पण नंतर मग तो बर्फ नसून केवळ धुकं होतं असं स्पष्ट झालं होतं.

त्यामुळे, दिल्ली उत्तर भारतात येत असली आणि तिथलं तापमान कितीही खाली जात असेल तरी, बर्फ पडताना पाहायचा असेल तर, दिल्लीतल्या नागरिकांना दिल्ली सोडून आणखी थोडं उत्तरेला जावं लागणार हे नक्की.

बर्फवृष्टी बघायला दिल्लीत नाही मग नक्की कुठे जायचं?

भारतात उत्तरेकडील अनेक ठिकाणी बर्फवृष्टी पाहायला मिळते. हिमाचल प्रदेश मधील मनाली, शिमला आणि नरकांडा. उत्तराखंड मधील मसुरी, आऊली आणि धनौलती. जम्मू आणि काश्मीर मधील गुलमर्ग, सिक्कीम मधील झुलूक, आंध्रप्रदेशातील लंबासिंगी आणि बाईक रायडर्सचं फेव्हरेट डेस्टिनेशन असलेलं लडाख या ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडतो.

त्यातपण अडचण अशी आहे की, ही बर्फवृष्टी संपुर्ण हिवाळा ऋतूत पडत नाही. बर्फवृष्टी नेमकी कधी होईल हे सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळे फक्त बर्फवृष्टी बघायची म्हणून या ठिकाणी फिरायला गेल्यावर बर्फवृष्टी न पाहता परत यायला लागु शकतं. त्यामुळे, बर्फवृष्टी दिसणार किंवा नाही हे तुमच्या नशिबावर अलंबून असतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.