दिल्लीला नावं ठेवण्याआधी, एकदा आपल्या पुण्या-मुंबईची परिस्थितीही बघा…

पंजाब आणि हरियाणामध्ये धानाचा पेंढा जाळल्यामुळे दिल्लीतली हवा प्रदूषित होते असं माध्यमांमध्ये बघायला मिळतं. मात्र वायुप्रदूषणाची अशीच परिस्थिती आता मुंबई-पुण्यात सुद्धा निर्माण होत आहे.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि पुण्याच्या काही भागात सकाळी हवेत धुके आणि धूर कायम असतात त्यामुळे सूर्योदयानंतरही सूर्य नीट दिसत नाही.

असं यासाठी होतेय कारण या हिवाळ्यात मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. सफर आणि आयआयटीएम या दोन संस्थांनी केलेल्या सर्व्हेत १ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबईतल्या हवेची गुणवत्ता खराब आणि अत्यंत खराब श्रेणीत मोजण्यात आली होती. मुंबईच्या वेगवगेळ्या भागांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच एक्यूआय घसरलेला आहे. 

सर्वाधिक ३४९ एक्यूआय माझगावमध्ये नोंदवण्यात आलाय. त्यानंतर चेंबूर ३२१, कुलाबा ३१४, मालाड ३१३ आणि बीकेसीमध्ये ३११ एक्यूआय नोंदवण्यात आलंय. यांच्यापाठोपाठ बोरिवली, भांडुप, अंधेरी आणि वरळीमध्ये सुद्धा वायुप्रदूषणात वाढ झालीय. तर पुण्यात कर्वे रोड परिसरात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालीय. 

या वाढत्या वायुप्रदूषणामुळे मुंबई आणि पुण्याची देखील दिल्ली होईल का? अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.

पण अचानक वाढलेल्या प्रदूषणामुळे एक प्रश्न पडतो की, आजपर्यंत या शहरांमधील हवा दिल्लीएवढी प्रदूषित नव्हती, मग अचानक प्रदूषणात वाढ का होत आहे ?

तर मुंबई, पुण्यातील वाढत्या वायुप्रदूषणाला या गोष्टी जबाबदार आहेत. 

१) मुंबई, पुण्यातील वाढतं प्रदूषण

मुंबई आणि पुणे शहरात औद्योगिकिकारणामुळे कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो. मुंबईत होणारे इमारतींचे बांधकाम आणि वेगवगेळ्या पायाभूत सुविधांचं बांधकाम करताना धूळ आणि सिमेंट हवेत मिसळते. तसेच अनेक ठिकाणी जाळण्यात येणारा कचरा आणि डम्पिंग ग्राऊंडमध्ये लागणाऱ्या आगी यांच्यामुळे दोन्ही शहरात धुराचं प्रमाण वाढत आहे.

या प्रदूषणाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. झटका आणि पर्यावरण या दोन संस्थांनी मुंबईत कृत्रिम फुफ्फुसाचं प्रयोग केला होता, ज्यात प्रदूषणामुळे प्रयोगातील फुफुसांचा रंग लवकरच काळा पडला होता.

२) हिवाळ्याच्या काळात वायूप्रदूषणात आणखी वाढ होते

हिवाळ्यात जगभरात वायूप्रदूषणात वाढ होत असते. कारण थंडी आणि धुक्याच्या प्रमाणात वाढ होते. हे धुके हवेच्या खालच्या भागात जमिनीजवळ साठतात त्यामुळे धुक्यांमुळे हवेतील प्रदूषित घटक हवेमध्येच राहतात. दिल्लीप्रमाणे मुंबईमध्ये सुद्धा हिवाळ्याच्याच काळात वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईचा एक्यूआय दिल्लीपेक्षा जास्त खालावलेला होता.

दरवर्षी हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात मुंबईतील हवेचं प्रदूषण वाढतं. यात सगळ्यात जास्त प्रदूषण वाढतं ते डिसेंबर महिन्यात. भारत सरकारच्या सफर संस्थेच्या अहवालानुसार यंदा नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा सगळ्यात जास्त प्रदूषित होता. या काळात मुंबईची नोंद देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये करण्यात आलीय.

३) मुंबईत वाहणारे वारे

पश्चिम भारतासह महाराष्ट्राच्या परिसरात गंगेच्या मैदानासारखे प्रदूषणकारी वारे वाहत नाहीत. तर मुंबईचं प्रदूषण दूर करण्याचं काम करतात. मुंबई हे बेटांचं शहर आहे त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांवर मुंबईतील प्रदूषणाची परिस्थिती अवलंबून असते. समुद्राकडून वाहणारे वारे मुंबईकडे येतात  तेव्हा शहरातील प्रदूषित हवा वाहून जाते आणि त्याच्या जागी चांगली आणि स्वच्छ हवा येत असते.

परंतु यंदा या वाऱ्यांमध्ये बदल झाला आहे. समुद्राकडून वाहणारे वारे कमी झाले आहेत त्यामुळे अगदी मुंबई बेटात असलेल्या असलेल्या माझगाव, चेंबूर, कुलाबा, मालाड, बीकेसी, परळ, बोरिवली, भांडुप, अंधेरी या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता घसरली आहे, असं विश्लेषक सांगत आहेत.

मुंबईसह जगभरात वाढत असलेल्या वायुप्रदूषणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेचे निकष आणखी कडक केलेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या जुन्या नियमानुसार हवेतील पर्टिक्युलेट मीटरचं प्रमाण २.५ ते १० मायक्रोग्रॅमपर्यंत असणं सुरक्षित मानलं जायचं. परंतु डब्ल्यूएचव ने यात बदल केला आणि ही मर्यादा ५ मायक्रोग्रॅमपर्यंत कमी केली आहे. तर २४ तासांमधील पर्टिक्युलेट मीटरचं प्रमाण पूर्वी २५ होतं ते आता १५ करण्यात आलं आहे. 

मुंबईमध्ये गेल्या वर्षी प्रति घनमीटर पर्टिक्युलेट मीटरचं प्रमाण ४१ मायक्रोग्राम होतं, जे नवीन नियमानुसार ८ पटीहून जास्त आहे. त्यामुळे या वाढत्या प्रदूषणावर उपाय करणे गरजेचे आहे. जर याला वेळीच आळा बसला नाही तर मुंबई आणि पुण्यावर सुद्धा दिल्लीसारखी वेळ येऊ शकते. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.