बी. आर. चोप्रांनी शेवटच्या क्षणी सिनेमाचं नाव बदललं नसतं तर देशभर दंगा झाला असता…

ख्यातनाम चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी सामाजिक आशय असलेले अनेक अप्रतिम चित्रपट दिले. सिनेमाच्या गोल्डन इरा मध्ये एक ही रास्ता, नया दौर, साधना, धूल का फूल, धर्म पुत्र, गुमराह, वक्त, हमराज… या सिनेमातून ते रसिकांच्या पुढे आले.

१९७३ साली त्यांचे धाकटे बंधू यश चोप्रा यांच्यापासून बाजूला होऊन त्यांनी स्वतंत्र चित्र निर्मिती सुरू केली. सत्तरच्या दशकात बी आर चोप्रा यांचा मुलगा रवी चोप्रा हा देखील त्यांच्यासोबत आला आणि सिनेमाचे जॉनर बदलू लागले.  ‘द बर्निंग ट्रेन’ सारखा ॲक्शन मुव्ही, छोटी सी बात सारखा हलका फुलका तसेच पती-पत्नी और वो सारखा कॉमेडी सिनेमा देखील या बॅनरच्या खाली तयार होऊ लागले. 

बी आर चोप्रा यांची खासियत ही सामाजिक प्रश्नांवरील चित्रपटांचीच होती.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस त्यांनी ‘इन्साफ का तराजू’ या चित्रपटातून बलात्कारीत स्त्रीच्या प्रश्नाला वाचा फोडली. हा विषय त्या काळाच्या मानाने मोठा बोल्ड होता पण मोठ्या संयतपणे हाताळत त्यांनी हा विषय पडद्यावर मांडला होता. यानंतर त्यांनी मुस्लिम समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला रुपेरी पडद्यावर मांडायचे ठरवले. 

मुस्लिम समाजात पत्नीला घटस्फोट देणे अतिशय सोपे आणि सुलभ होते पण यातून घटस्फोटीत स्त्रीची वंचना, अवहेलना होत होती त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट बी आर चोप्रा यांच्यासाठी खूप महत्वकांशी सिनेमा होता. 

खूप मनापासून त्यांनी या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली होती. या सिनेमासाठी संगीतकार रवी यांचं बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा बी आर कॅम्पस मध्ये आगमन झालं होतं. साहिर लुधियानवी यांच्या निधनामुळे त्यांचाच शिष्य असलेल्या हसन कमाल यांची गाणी या चित्रपटासाठी घ्यायचे ठरवले. चित्रपटाच्या नायिकेचा शोध सुरू झाला. 

मुस्लीम सोशल सिनेमा साठी त्यांना नायिका मुस्लिम अटायर मध्ये शोभेल अशीच हवी होती. 

यासाठी त्यांना पाकिस्तानातील एक मुलगी पसंत पडली. तिचे खानदानी मुस्लीम लुक्स होते. ती चांगलं गात देखील होती. बी आर चोप्रा यांना नायिका आणि गायिका या दोन्ही एकाच स्त्रीमध्ये मिळाल्या. तिचं नाव होतं सलमा आगा! सलमा कडे खानदानी मुस्लिम सौंदर्य होतं आणि तिच्या आवाजामध्ये जुन्या काळातील नूरजहा आणि सुरैय्या यांच्या स्वराचे कॉकटेल होतं. त्यामुळे हा स्वर रसिकांना देखील खूप आवडला. 

या चित्रपटात सलमा आगा हिने तब्बल पाच गाणी गायली होती. दिल के अरमा आंसू ओ में बह गये, फजा भी है जवां जवां हि गाणी प्रचंड गाजली. महेंद्र कपूर यांच्या स्वरातील दिल की ये आरजू थी कोई दिलरुबा मिले, बीते हुए लम्हों की कसम हि गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटात गुलाम अली यांच्या स्वरातील एक गझल देखील होती. 

चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है….. रसिकांना फार वर्षानंतर एक चांगला मुस्लिम सोशल सिनेमा पाहायला मिळणार होता.

राजबब्बर आणि दीपक पराशर मुख्य भूमिकेत होते.

सर्व काही व्यवस्थित चालू असताना एक घटना अशी घडली ज्यामुळे बी आर चोप्रा एकदम चपापले. या चित्रपटाचे नाव त्यांनी ‘तलाक तलाक तलाक’ असे ठेवले होते. चित्रपट पूर्ण होत आला असतानाच बी आर च्या एका मित्राने त्यांना सांगितले , “तुमच्या चित्रपटाचे नाव तुम्हाला धोक्यात आणू शकते!” त्यावर बी आर यांनी प्रश्नार्थक मुद्रा केली.

त्यावेळी तो मित्र म्हणाला,

“हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा एखादा मुस्लिम पती चित्रपट पाहून आपल्या घरी जाईल त्यावेळी त्याच्या पत्नीने जर त्याला विचारलं तुम्ही कोणता चित्रपट पाहिला आणि त्याने उत्तर दिले ‘तलाक तलाक तलाक’ तर त्याच्या पत्नीवर मोठे धर्मसंकट कोसळू शकते. मुस्लिम धर्म कायद्यानुसार ‘तलाक’ या शब्दाचा तीनदा उच्चार जर पत्नीसमोर केला तर त्या स्त्रीला पती पासून दूर जावे लागते.

थोडक्यात त्यांचा घटस्फोट होतो. आपल्या भारतातील मुस्लिमांची संख्या पाहता या सिनेमाने फार मोठा धार्मिक कल्लोळ होऊ शकतो. त्यामुळे या सिनेमाचे नाव बदलणे तुम्हाला गरजेचे आहे!” बी आर चोप्रा यांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी मुस्लिम समाजातील काही तर तरक्की पसंद संघटना देखील या चित्रपटाच्या नावाच्या विरुद्ध कोर्टात जायला सज्ज झाले होते. 

बी आर चोप्रा यांच्या मित्राने त्यांना वेळीच सावध केले आणि मोठ्या धर्म संकटातून ते वाचले. त्यांनी चित्रपटाचे नाव बदलायचे ठरवले आणि मोठ्या वैचारिक मंधनातून सिनेमाचे नाव फायनल झाले ‘निकाह’!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.