स्वतःच कष्ट करुन बनवलेलं गाणं वहिदा रहमाननं सिनेमातून उडवायला सांगितलं होतं…

सर्वसाधारणपणे आपण असं पाहतो की, चित्रपटांमध्ये एक कलाकार हा कायम दुसऱ्या कलाकारावर कुरघोडी करत असतो. कॅमेराचा फोकस आपल्यावरच कसा जास्त राहील याकडे त्याचे लक्ष असतं. हा सर्व प्रकार आयडेंटिटी क्रायसेसचा असतो. 

प्रत्येकासाठी अस्तित्वाची लढाई महत्वाची असते. मलाच जास्त महत्त्व मिळाले पाहिजे माझाच जास्त प्रभाव पडला पाहिजे ही भावना यातून वाढीला लागत असते. पण कधी कधी अनपेक्षित पणे काही वेगळ्या स्वरूपाचे अनुभव देखील वाचायला मिळतात.

वहिदा रहमान ने  एकदा आपल्यावर चित्रित एक गाणं सिनेमातून काढून टाका असा दबाव दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावर आणला होता.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नायिका म्हणून वहिदाचा हा पहिलाच चित्रपट होता आणि एकूणच हिंदीमधील तिचा दुसरा चित्रपट होता. संघर्षाचा कालावधी चालू असताना वहिदाने आपल्यावर चित्रित झालेले एक गाणे सिनेमातून काढून टाका असा आग्रह गुरुदत्त यांच्याकडे धरला होता. काय होता हा किस्सा? हा किस्सा भारतीय सिनेमातील क्लासिक चित्रपट ‘प्यासा’ च्या वेळचा आहे.

या चित्रपटात गुरुदत्त, वहिदा रहमान, माला सिन्हा ,रहमान, जॉनी वॉकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. वहिदा रहमान हिचा हा दुसराच चित्रपट होता. गुरुदत्त फिल्म्सच्या यापूर्वीच्या ‘सीआयडी’(१९५६) या चित्रपटात ती एक दोन गाण्या पुरती दिसली होती. ‘प्यासा’मध्ये तिला फुल लेन्थ भूमिका मिळाली होती. यात तिने गुलाबो या वेश्येची भूमिका केली होती. चित्रपट पूर्ण झाला.

गुरुने आपल्या सर्व कलाकार आणि मित्रांसाठी एक ट्रायल शो ठेवला. गुरुदत्त यांची पद्धत होती; चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा ट्रायल शॉट ठेवायचा आणि प्रत्येकाचे मत आजमावून घ्यायचे. ट्रायल शो नंतर सर्वांनी आपापली मते मांडायला सुरुवात केली. 

वहिदा रहमाने चित्रपटाच्या बाकी गोष्टींबद्दल समाधान व्यक्त केले फक्त यातील तिच्यावर चित्रित असलेले एक गाणे चित्रपटातून काढून टाका अशी मागणी केली! सर्वांना खूप आश्चर्य वाटले.

माला सिन्हा वहिदाच्या शेजारी बसली होती. ती म्हणाली ,”तुझे  डोके बिके फिरले की काय? तुझा हा पहिला चित्रपट आहे आणि तुझ्यावर चित्रित असलेलं गाणं तू काढून टाकायला सांगतेस?” गुरुदत्त यांचे मित्र त्यांना म्हणाले,” वहिदा ला  सिनेमाच्या क्षेत्रातले काय नॉलेज आहे? त्यामुळे तिचा सल्ला विचारात घेऊ नये.” तरी गुरुदत्त विचारात पडला. तो म्हणाला ,”असं नाही मी माझ्या ड्रायव्हरचे देखील मत ऐकत असतो.” पण सर्वांनीच गुरुदत्त यांना ते गाणे चित्रपटातून काढू नका असेच सांगितले. 

चित्रपटात हे गाणे ज्यावेळी चित्रपटाचा नायक विजय आत्महत्या करतो त्या वेळी आहे. त्यावेळेला गुलाबो दुःखात तिथून निघून जाते आणि एका नावेत बसून ती गाणे गाते. गाण्याच्या बोल होते  ‘ऋत फिरे पर दिन हमारे …’ गाणं ऐकायला खूपच गोड होते. 

गुरूने वाहिदाला विचारले,” तुला या गाण्यातले काय खटकले?” तेव्हा ती म्हणाली,” गाणं खूप चांगलं आहे ऐकायला. पण या गाण्यामुळे चित्रपटाची लय बिघडते आहे. लोकांना सिनेमा खूप स्लो वाटेल. आणि हे गाणं सिनेमाला  स्लो करेल. त्यामुळे हे गाणं चित्रपटातून काढलेले चांगले!”

 मित्रांच्या आग्रहामुळे गुरुदत्तने या गाण्यासहित प्यासा चित्रपट प्रदर्शित केला. 

आठ – दहा  दिवसानंतर गुरुदत्त ने सर्वत्र सिनेमा बाबत लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून घ्यायला सुरुवात केली. त्याने स्वतः थिएटरमध्ये जाऊन अनेक वेळा हा सिनेमा गुपचूप जाऊन पहिला. त्याच्या लक्षात आलं की हे गाणं ज्या ज्या वेळेला सर्वात सुरू होतं त्यावेळेला लोक चूळबुळ करतात. 

सिगारेट प्यायला, चहा घ्यायला तसेच  बाथरूमला बाहेर जातात. लोकांची बडबड  वाढते आणि त्यामुळे सिनेमाचा टेम्पो कमी होतो. गुरुदत्त ने पुन्हा  आपल्या सर्व मित्रांची  मीटिंग बोलावली आणि वहिदा रहमान हिचे मत बरोबर आहे असे सांगितले. सर्वांना देखील ते मत पटले. आणि  हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.