हिंदू पौराणिक कथा आणि देवी देवतांवर आधारित असूनही ब्रम्हास्त्र बॉयकॉट का होतोय?

सर्वसाधारण हिंदू धर्माला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवायचा या हेतूने बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेण्ड सेट होतोय. मग यामध्ये कधी आमिर खान सापडतोय तर कधी ह्रत्विक रोशन. पण हिंदू कथा, परंपराचा गौरव करणारा आणि ब्रह्मास्त्र सारख्या मिथकाला समोर आणणारा ब्रह्मास्त्र सिनेमा देखील जेव्हा बॉयकॉटच्या ट्रेण्डमध्ये सापडतो तेव्हा शंका उपस्थित होतात की नेमकं का?

बॉयकॉट करण्यामागे नेमकी काय कारण आहेत, कारण एका बाजूला सिनेमातून हिंदूत्वाचा गौरवच होतोय तरिही सिनेमावर बहिष्कार का..? 

विषय समजून घेण्यापूर्वी ब्रह्मास्त्र काय होतं आणि त्याचा हिंदूत्वाची कोणता संदर्भ जोडला जातो ते पाहणं गरजेचं आहे..

हिंदू पुराणकथा आणि मान्यतांनुसार ब्रह्मदेवाचे अस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्र अस मानण्यात आलं आहे. या ब्रह्मास्त्राचा उल्लेख महाभारतात देखील आहे आणि रामायणात देखील. महाभारतात अर्जून आणि अश्वत्थामा युद्धात ब्रह्मास्त्रासाचा वापर करतात असं सांगण्यात आलं आहे तर रामायणात हनुमानाला कैद करण्यासाठी, समुद्र आटवण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केल्याचे संदर्भ देण्यात येतात.

अर्थात ब्रह्मास्त्र म्हणजे हिंदू आणि हिंदू म्हणजे हिंदूत्व अशी सरळ लाईन असताना देखील ब्रह्मास्त्र ट्रोल का केला जातोय..

तर त्याची प्रमुख कारण सांगितली जातायत.. 

प्रमुख कारण म्हणजे सिनेमा काहीही असो मुख्य टार्गेट बॉलिवूड.. 

बॉलिवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा ट्रेण्ड सोशल मिडीयात सेट झाला तो सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिझमचा मुद्दा चर्चेत आला. दूसरीकडे सुशांतसिंग आपल्या काही सिनेमामुळे हिंदूत्ववादी होता अस मत ट्रेण्ड सेट करणाऱ्यांच होतं. बॉलिवूडमधील खान मंडळी व मुस्लीम धोरणच याला कारणीभूत असल्याचा समज सेट होत गेला आणि त्यामुळेच बॉलिवूड टार्गेटवर आलं.

या वर्षी काश्मिर फाईल्सच्या निमित्ताने बॉलिवूड महत्वाचे मुद्दे हाताळत नाही तर हिंदूच्या विरोधात सिनेमातून मत प्रस्थापित करत असल्याचा आरोप झाला, थोडक्यात सिनेमा कोणताही असो तो जर बॉलिवूडचा असेल तर विरोध हा ट्रेण्ड सेट झाला..

दूसरं महत्वाचं कारण कलाकारांना विरोध.. 

बॉलिवुडमधील खान मंडळी, कपूर मंडळी ही नेपोटिझममुळे चर्चेत आली. अशा मंडळींना सोशल मिडीयावर टार्गेट करण्यात आलं. त्यातूनच इतिहास त्यांनी जे काही स्टेटमेंट दिले होते त्यांचा दाखला सध्याच्या प्रमोशनवेळी देण्यात येवू लागला. रणबीर कपूरने देखील ११ वर्षांपूर्वी गोमांस खायला आवडेल अस स्टेटमेंट दिलं होतं.

त्याचा हा व्हिडीओ व्हायरल करत तो हिंदू धर्माच्या विरोधात आहे हे मत स्पष्टपणे मांडत ब्रह्मास्त्र बॉयकॉट करण्याचा ट्रेण्ड आणण्यात आला..

तिसरं कारण म्हणजे आलीया भटने केलेली कमेंट

एका मुलाखतीत आलियाला बॉयकॉटवर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देतांना आलीया म्हणाली की “जर लोकांना तिची फिल्म आवडत नसेल तर ती लोकांनी बघू नये.” या व्हिडीओमुळे लोकं आलियाला गर्विष्ठ मानत आहेत आणि तिचा अहंकार उतरवण्यासाठी ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्याची मागणी होतेय. ट्रेलर्सकडून स्प्रेड करण्यात येणार आलियाचा तो व्हिडीओ अर्धवट स्वरूपाचा आहे.

चौथं कारण आहे आलियाचा भाऊ राहुल भटने डेव्हिड हेडलीबरोबरचा त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. 

मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याची मैत्री आलियाचे वडील महेश भट यांच्याबरोबर होती. त्यामुळे राहुल भटने त्याचा आणि डेव्हिड हेडलीचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यात राहुलने म्हटलं होतं की, “त्याला हेडलीमध्ये त्याचे वडील महेश भट यांची प्रतिमा दिसते.” राहुलच्या या पोस्टमुळे सुद्धा या फिल्मचा बॉयकॉट करण्याची मागणी होतेय.

कारण फिल्ममध्ये काम करणाऱ्या आलियाचा भाऊ एका आतंकवाद्याला आपलं मानतो त्यामुळे या फिल्मला बघू नये असे आवाहन ट्रोलर्सकडून केले जात आहे.   

पाचवं कारण बॉलिवूड स्टार्सच्या फिल्म प्रमोशन करण्याच्या पद्धतीला मानलं जातंय.

बॉलिवूडची फिल्म आल्यावर अनेक ठिकाणी जाऊन त्या फिल्मचं प्रमोशन केलं जातं. त्याचमुळे बॉलीवूडचे हिरो फिल्मचं प्रमोशन करण्यासाठीच मंदिरांमध्ये येतात आणि आपला एजेंडा पूर्ण करतात. बाकी वेळेस बॉलीवूड अभिनेते मुस्लिम मजारींवरच जातात. त्यामुळे त्यांना अद्दल घडवण्यासाठी ब्रह्मास्त्रला बॉयकॉट करण्याची मागणी केली जातेय.

पण या सर्व गोष्टींवर मात करत जगभरातल्या 8 हजार पडद्यांवर ब्रह्मास्त्र सिनेमा रिलीज होतोय. यातील ५ हजार स्क्रिन्स भारतातच आहेत. अस सांगण्यात येतय की सिनेमाचे २३ कोटींचे तिकीट ॲडव्हान्समध्येच विकले गेले आहेत. त्यामुळे बॉयकॉट ट्रेण्डला संपवून हा सिनेमा तुफान चालेल. आत्ता ब्रह्मास्त्रचं कलेक्शन ठरवेल की सिनेमा ट्रेण्डमुळे पडतो की चालतो..

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.