राजेश खन्नानं दिग्दर्शकाशी भांडण करुन कुदरत हिट करून दाखवला होता…
हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याची रूपेरी पडद्यावर एंट्री एका कॉन्टेस्ट मधील विजेता म्हणून झाली. ही स्पर्धा युनायटेड प्रोड्युसर आणि फिल्मफेयर यांनी संयुक्तरीत्या आयोजित केली होती. देशभरातून दहा हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. या स्पर्धेत राजेश खन्ना विनर ठरला. त्याच्यासोबत सुभाष घई आणि धीरज कुमार हे देखील त्याच्या पाठोपाठचे विजेते होते.
राजेश खन्ना तोवर रंगभूमीवर काम करीत होता. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक चेतन आनंद यांनी राजेश खन्नाला पहिला ब्रेक दिला. चित्रपट होता ‘आखरी खत’. यात राजेश खन्नाची नायिका होती इंद्राणी मुखर्जी. हा चित्रपट अजिबात चालला नाही पण ऑस्कर साठी भारताकडून हा चित्रपट निवडला गेला होता. यानंतर १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ पासून राजेश खन्नाचे स्टार बुलंद झाले.
तो आला, त्याने पाहिले त्याने जिंकले!
सुपरस्टार पदावर असताना सलग १६ सिल्वर ज्युबिली सुपरहिट सिनेमे देण्याचा विक्रम राजेश खन्नाच्या नावावर आजही अबाधित आहे. १९७३ साली अमिताभ बच्चन यांचा ‘जंजीर’ प्रदर्शित झाला आणि राजेश खन्नाच्या सुपरस्टार पदाच्या खुर्चीला हादरे बसू लागले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या यशाचा आलेख उंचावत गेला आणि राजेश खन्ना यांचे चित्रपट हळूहळू अपयशी होत गेले. असं जरी असलं तरी राजेश खन्नाचा रूतबा त्याचा स्टारडम हे कायम होतं.
१९७६ साली ‘मेहबूबा’ या शक्ती सामंत यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातून राजेश खन्नाने पुन्हा ‘कमबॅक’ करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाचे कथानक पुनर्जन्मावर आधारित होते. हेमामालिनी या चित्रपटात त्यांची नायिका होती. राजेश खन्नाला हा स्टोरी प्लॉट आणि हेमा लक्की वाटली.
याच काळात त्याने त्याचे पहिले चित्रपट दिग्दर्शक चेतन आनंद यांच्याशी संपर्क केला आणि आपण पुन्हा एकदा एक चित्रपट करूयात असे त्यांना सांगितले. त्यावर चेतन आनंद यांनी सांगितले,” मी चित्रपट दिग्दर्शित करायला तयार आहे. परंतु माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत!” त्यावर राजेश खन्ना त्यांना म्हणाला ,”पैशाची अजिबात काळजी तुम्ही करू नका. मी निर्मात्याची सोय करतो.” अशा पद्धतीने राजेश खन्नाने एक दिवस बी एस खन्ना यांना घेऊन तो चेतन आनंद यांच्याकडे गेला.
चेतन आनंद यांनी त्यांच्या कडची स्टोरी राजेश खन्नाला ऐकवली जी त्याला खूप आवडली कारण ही स्टोरी देखील पुनर्जन्मावर आधारित होती.
अशा प्रकारे साधारणता १९७७ साली चेतन आनंद यांनी ‘कुदरत’ या चित्रपटाची सुरुवात केली. यात स्टारकास्ट तगडी होती. राजेश खन्ना, विनोद खन्ना, राजकुमार, हेमा मालिनी, प्रिया राजवंश यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
‘कुदरत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात १९७८ साली झाली.
पण या चित्रपटांमध्ये अनेक व्यत्यय येत गेले. राजेश खन्नाचा इगो कायम आडवा येत होता. तर चेतन आनंद त्यांच्या लाडक्या प्रिया राजवंशी भूमिका वाढवत होते. राजेश खन्नाला प्रिया राजवंश अजिबात आवडत नव्हती. चित्रपटाच्या सुरुवातीला चेतन आनंद यांनी तिला एका छोट्या भूमिकेत घ्यायचे आहे असे सांगितले होते. परंतु ज्यावेळी चित्रपट चित्रीकरण सुरू झाले त्यावेळी तिची भूमिका दिवसेंदिवस वाढताना राजेश खन्नाला दिसत होती.
राजेश ला हे अजिबात आवडत नव्हते. यातून चेतन आनंद आणि राजेश खन्ना यांच्यात मतभेद सुरू झाले. त्यामुळे चित्रपट रेंगाळत गेला. कसा बसा तो १९८० साली पूर्ण झाला. आता एडिटिंगची वेळ आली होती. त्यावेळी राजेश खन्नाने चित्रपटाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. निर्माता त्याच्या मर्जीतला होता. त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे कात्री चालवायला सुरुवात केली.
यात प्रिया राजवंश, विनोद खन्ना, राजकुमार यांचे रोल ते सपासप कापत गेले. हे बाब ज्या वेळी दिग्दर्शक चेतन आनंद यांना कळाली त्यावेळेला ते संतापले आणि त्यांनी राजेश खन्नाला या कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. राजेश बधला नाही. भांडण विकोपास केले.
चित्रपट निर्मात्यांच्या संघटनेकडे हा वाद गेला. तिथे देखील हा वाद मिटला नाही. शेवटी हा वाद कोर्टामध्ये गेला.
निर्माता राजेशच्या गोटातील असल्याने तिथे राजेश खन्नाचा विजय झाला. आणि त्याने स्वत:ची इमेज वाढेल अशा पद्धतीने चित्रपट एडिट केला. त्यामुळे राजकुमार, विनोद खन्ना नाराज झाले. चित्रपट पूर्ण झाला. ३ एप्रिल १९८१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु या सगळ्या मतभेदामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन आनंद सिनेमाच्या कोणत्याही प्रमोशनला आणि प्रीमियरला उपस्थित राहिले नाही! सिनेमा सुपर हिट झाला. पण राजेश खन्ना चे विनोद खन्ना, राजकुमार आणि चेतन आनंद सोबत संबंध कायमचे बिघडले!
– भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू
- घराणेशाही अशी गोष्ट आहे ज्याला एकनाथ शिंदे देखील डावलू शकलेले नाहीत..
- ज्या पिक्चरमध्ये जीव तोडून काम केलं, त्याच्याच प्रीमिअरला जायला राजेश खन्ना घाबरत होता…
- एखाद-दुसरा सिन किंवा गाणं नाही, तर पाकिस्ताननं भारतातला अख्खा सिनेमाच चोरला होता