या कारणामुळं तिरूपतीला जावून लोक टक्कल करतात, पण पुढे या केसांच काय होतं…?

सोशल मीडियावर एक अभिनेत्री खूप जास्त ट्रेंड होताना दिसतेय बघा. ही अभिनेत्री म्हणजे दिप्ती ध्यानी आणि सगळीकडे तिची चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिचा पती अभिनेता सूरज थापरसाठी तिने केलेलं मुंडण. हो खरंय, झालं असं होतं की, अभिनेता सूरज थापर यांची कोरोनाची लागण झाली होती आणि परिस्थिती अशी झाली होती की, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं.

तेव्हा दीप्तीने सुरज थापर बरे झाले तर तिरुपती बालाजीच्या मंदिरात आपले केस दान करेल, असा नवस केला होता. त्याची फेड म्हणून आता तिने केस दान केलेत. या पावलामुळे त्यांची तुफान प्रशंसा केली जातेय. प्रेम असावं तर असं, बायको असावी तर अशी आणि काय काय बोललं जातंय.

मात्र यात आपल्या एका भिडूला पडलेला प्रश्न म्हणजे – तिरुपतीला जाऊन लोक टक्कल करतातच का? त्या केसांचं पुढे काय होतं? आता कमेंटमध्ये विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे आणि तुम्हालाही हे प्रश्न केव्हा तरी पडलेलेच असतील, तेव्हा आज उत्तर जाणून घेऊया…

माहिती शोधायला लागलो तेव्हा कळलं तिरुपतीला दररोज जवळपास ३५,००० लोक मुंडन करतात. ज्यातून ५०० किलो केस निघतात.

असं करण्यामागे एक धार्मिक मान्यता आहे. तिरुपती बालाजी मंदिरात येऊन केसाचं दान केलं तर लक्ष्मी मातेची कृपा होते. भाविक जेवढे केस दान करतात, त्यापेक्षा १० पट अधिक तिरुपती बालाजी परत देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या श्रद्धेमागे एक कथा देखील सांगितली जाते.

प्राचीन कथेनुसार, बालाजी देवतेच्या ठिकाणी मुंग्याचा पर्वत बनला होता. तिथे एक गाय यायची आणि दूध द्यायची. रोज रोज असं होऊ लागलं तेव्हा एक दिवस त्या गाईच्या मालकाने रागात येऊन जवळच पडलेली कुऱ्हाड उचलली आणि गाईवर उगारली. आश्चर्य म्हणजे तो घाव गायीला नाही तर भगवान बालाजी यांना लागला आणि त्यांच्या डोक्यावरील काही केस कापले जाऊन त्याठिकाणी टक्कल पडलं.

त्यानंतर जेव्हा भगवान बालाजी तिरुमला पर्वतावर आराम करत होते तेव्हा गंधर्व राजकुमारी नीला देवीने ती टक्कल पडलेली जागा बघितली. भगवान बालाजी त्यांच्या सुंदर रूपासाठी ओळखले जातात आणि त्यांचे केस अजूनच सौंदर्य वाढवतात. अशात नीला देवीने तातडीने स्वतःचे केस कापले आणि आपल्या शक्तीने बालाजी देवतेला घाव झाला होता त्याठिकाणी लावले.

या कृतीने भगवान नारायण प्रसन्न झाले मात्र त्यांनी बघितलं की नीला देवीने ज्याठिकाणावरून केस उपटले होते तिथून रक्त निघतंय. मग त्यांनी निलादेवीला केस परत घेण्यास सांगितलं. मात्र निलादेवी म्हणाल्या..

“मी केस परत घेईल पण आता नाही. मनुष्याच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचा परिणाम त्यांच्या केसांशी जोडलेला आहे. अशात भविष्यात जेव्हा तुमचे भक्त त्यांचा अहंकार त्यागण्यासाठी, पाप दूर करण्यासाठी तुम्हाला केस अर्पण करतील ते मी स्वीकारेल” अशाप्रकारे लक्ष्मी मातेची कृपा भक्तांना मिळाली. 

तर निलादेवीच्या त्यागाला बघून तिरुपती बालाजी यांनी देखील वरदान दिलं की, जी व्यक्ती अशा प्रकारे केसांचा त्याग करून अर्पण करेल, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

या धार्मिक कथेनुसार प्राचीन काळापासून हजारो भाविक आपल्या इच्छा, आकांक्षा घेऊन तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जातात आणि केसाचे दान करतात. केसांचे दान करणे म्हणजे पाप आणि चुकीच्या गोष्टींचा त्याग करणं असं मानलं जातं.

भाविकांची श्रद्धा या एकमेव कारणाने तिरुपती बालाजीला लोक केस दान करतात. 

अर्पण केलेल्या केसांचा खच मंदिर परिसरात पडलेला असतो. अशात प्रश्न राहतो, मंदिर प्रशासन ह्या सर्व या केसांचं पुढे करतं काय? 

याचं उत्तर म्हणजे – मंदिराच्या ट्रस्ट तर्फे या केसांचा लिलाव केला जातो. 

हा लिलाव ऑनलाईन होतो. स्त्रियांच्या लांब केसांना चांगली किंमत मिळते. कमी लांबीच्या आणि पांढऱ्या केसांना तितकी किंमत मिळत नाही. एक किलो केसांना बेंगलोरमध्ये अडीच ते तीन हजार रुपये मिळतात. पण हेच केस परदेशामध्ये २५ ते ३० हजार रुपये किलोने विकले जातात. 

२०१६ मध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये जेव्हा मंदिर कमिटीने या केसांचा लिलाव केला होता तेव्हा सुमारे १७.८२ कोटी रुपयांची कमाई झाली होती. २०१९ मध्ये मंडळाने जानेवारीत १४३.९ टन केस विकले होते ज्यातून ११.१७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. 

तर २०२१ च्या जुलै महिन्यात तब्बल ११ कोटी ९५ लाख रुपयांपर्यंत पैसे मिळाले. अशाप्रकारे दरवर्षी या केसांतुनच मंदिराला जवळपास १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं.

बरं या विकत घेतलेल्या केसांचं पुढे काय होतं?

तर त्यांच्यापासून कृत्रिम केस बनवले जातात. 

म्हणजेच विग बनवले जातात किंवा हेअर एक्सटेंशन बनवले जातात. ज्याचा वापर फिल्म इंडस्ट्रीमध्ये केला जातो, कँसर पेशंट्ससाठी केला जातो तर आजकाल सामान्य लोकही फक्त चेंज आणि स्टाईल म्हणून त्यांचा वापर करतात. 

ही विक्री झालेल्या पैशातून मग मंदिर संस्थान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दूध देणं, तूप वाटप करणं, अशा गोष्टी आयोजित करत असतं… २०१६ साली ११.२८ कोटी रुपये खर्चून ३९.३२ लाख लिटर टोन्ड दूध खरेदी केलं होतं तर २.२५ लाख किलो गाईचे तूप खरेदी करून भाविकांमध्ये वाटण्यात आलं होतं.

आपला नवस पूर्ण व्हावा, याकारणाने काही भाविक तिरुपतीला केस दान करतात, याचाच भाग म्हणून अभिनेत्री दीप्ती ध्यानीने देखील स्वतःचे केस दान केलेत. तर काही मनोभावाने देखील केस दान करतात. आणि त्या केसांचा पुढचा प्रवासही तुम्हाला सांगितला आहे.

तेव्हा आता तुम्ही जेव्हा तिरुपतीला जाऊन केस दान कराल तेव्हा हे तथ्य नक्की लक्षात असू द्या. शिवाय, ही माहिती महत्वाची वाटली असेल आणि आपल्या मित्रांना माहित असावी असं वाटत असेल तर हा लेख जरूर शेअर करा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.