तिरुपती राज्यातून गेल्यानं केसीआर यांनी तेलंगणात त्याहीपेक्षा मोठं मंदिर उभारलंय

२८ मार्चला तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील यदाद्री मंदिराचं उदघाटन केलंय. हे मंदिर म्हणजे जगातील सगळ्यात मोठं मंदिर आहे जे पूर्णपणे दगडाने बनवण्यात आलं आहे. मात्र या मंदिराला राजकीय खुन्नशीची पार्श्वभूमी आहे जी आंध्र आणि तेलंगाच्या विभागणीच्या इतिहासात सापडते.

भारतात नेहमी एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करणाऱ्या राज्यांमध्ये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे दोन राज्य टॉपवर येतात. कधीकाळी संयुक्त असणाऱ्या या राज्यांची विभागणी झाली २०१४ साली. तेव्हापासून वेगवेगळ्या कारणांनी या दोन्ही राज्यांमध्ये नेहमीच तंटे आपल्याला बघायला मिळतात.

याचाच एक मुद्दा आहे मंदिर.

जेव्हा तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यासाठी आंध्र प्रदेशपासून विभागलं गेलं तेव्हा अनेक महत्वाचे मंदिरं आंध्र प्रदेशच्या वाट्याला गेले. जसं की, तिरुमला इथलं श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, श्रीशैलम इथलं श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिर आणि चित्तूर  इथलं श्री कलहस्थी मंदिर. देशभरातच नाही तर परेदशातही ही मंदिरं प्रसिद्ध आहेत. दूरवरून लोक यांना बघायला, अभ्यास करायला, यात्रेकरू दर्शनाला हमखास येतात. 

अशी ही मंदिरं आंध्रकडे गेल्यावर तेलंगणाच्या पदरात काहीच उरलं नाही. याने झालं असं की सगळ्यात मोठ कमाईचं साधन तेलंगणाकडून काढून घेतलं गेलं. कारण याच मंदिरांवर राज्याचं पर्यटन क्षेत्र आधारलेलं आहे. त्यातही मोठी गोष्ट झाली तिरुपती मंदिराची. तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे. त्याची अर्थव्यवस्था इतकी मजबूत करण्यामागे मंदिराला भेट देणाऱ्या लोकांचा समावेश आहे. 

दरवर्षी सरासरी ३० ते ४० दशलक्ष लोक या मंदिराला भेट देतात. ज्यामुळे हे जगातील सगळ्यात जास्त भेट दिलं जाणारं धार्मिक स्थान बनलं आहे. अक्ख्या जगाला आकर्षण असलेलं हे मंदिर देखील जेव्हा आंध्रकडे गेलं तेव्हा मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चांगलेच बिघडले. आणि विभागणीच्या एकाच वर्षात म्हणजे २०१५ ला त्यांनी तेलंगणामध्ये जगातील सगळ्यात मोठं दगडी मंदिर बांधण्याची घोषणा केली. 

तेलंगणाच्या  तिरुपती मंदिराशी लढत देण्यासाठी श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी किंवा यादगिरीगुट्टा यांच्या मंदिराचा मेकओव्हर करण्याचं निश्चित केलं. त्यानुसार फेब्रुवारी २०१५ मध्ये तेलंगणा सरकारने मंदिराची सुधारणा पाहण्यासाठी यादगिरीगुट्टा मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना केली. २०१६ मध्ये या मंदिराचं बांधकाम करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी सगळ्या गोष्टी ‘एकदम हटके’ असायला हव्या अशी ताकीदच केसीआर यांनी दिली. 

केसीआर यांचा हा मंदिर प्रकल्प इतका महत्वकांक्षी मानला जातो की कोरोना काळातही सगळं जग बंद असताना या मंदिराच्या निर्मितीचं काम सुरु ठेवण्यात आलं होतं. 

तेव्हा जरा मंदिराबद्दलची काही वैशिष्ट्ये जाणून घेऊया…

हे मंदिर म्हणजे १००० वर्ष जुनं गुहा मंदिर आहे जे हैदराबाद शहराच्या बाहेरील निसर्गरम्य टेकड्यांमध्ये आहे. शिवाय हे मंदिर नव्याने बांधताना स्थापत्यशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना सादर करणाऱ्या या मंदिरात द्रविड आणि काकतीयन शैलीच्या वास्तुकलेचे मिश्रण दिसून येते. हे मंदिर २,५०,००० टन काळ्या ग्रॅनाइटने बांधल गेलं आहे. 

मंदिराचे मुख्य वास्तुविशारद आनंद साई यांनी सांगितल्या प्रमाणे मंदिर एकूण १७ एकर एकरात उभारण्यात आलं आहे. ज्याचं मुख्य मुख्य आकर्षण आहे ‘प्रल्हाद चरित्र’. ‘भक्त प्रल्हादा’च्या जन्मापासून ते हिरण्यकश्यपाच्या वधापर्यंतच्या शिल्पकलेच्या आधाराने कथा मांडण्यात आली आहे. शिवाय हे ‘प्रल्हाद चरित्र’ सोन्याने बांधलेलं आहे.

मंदिराची जागा इतकी प्रशस्त आहे की, एकावेळी १०,००० भाविक मंदिरात सामावून घेतले जाऊ शकतात. त्यात एक जलकुंभ देखील आहे जिथे भाविक पवित्र स्नान करू शकतात. गेल्या साडेपाच वर्षांत मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आतापर्यंत १२८० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २००० हून अधिक शिल्पकार आणि हजारो कामगार आजही पुनर्बांधणीच्या कामात गुंतले आहेत.

मंदिर सजावटीसाठी तंजोर शैलीची चित्रकला वापरण्यात अली आहे. तर मंदिर विमान गोपुरम म्हणजेच मंदिराचं घुमट १२५ किलो सोन्याने मढवलेले आहे. हे सोन सीएम केसीआर, त्यांचे मंत्रीमंडळ, सहकारी आणि अनेक उद्योगपतींनी मंदिराला दान केले होते. केसीआर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या वतीने १११६ ग्रॅम सोनं दान केलं होतं.

बांधकामात वापरल्या जाणार्‍या दगडापासून ते शिल्प आणि त्यांचे धार्मिक महत्त्व तसंच वास्तुशास्त्रानुसार तपशीलाकडे लक्ष दिल्यास मंदिर प्रत्येक टप्प्यावर भाविकांना मंत्रमुग्ध करणार असं आहे. मंदिरात सात गोपुरम म्हणजेच बुरुज आहेत. एक सात मजली बुरुज आणि सहा पाच मजली बुरुज. 

स्वतःच प्रतिबालाजी बनवण्याची महत्वकांक्षा केसीआर यांनी त्यांच्या या यदाद्री मंदिराच्या माध्यमातून पूर्ण केल्याची  टीका  अनेक जण करतात. मात्र केसीआर यांनी आजवर याबद्दल काहीच वक्तव्य केलेलं नाहीये. त्यांनी निरंतर हे काम चालत राहावं याकडे लक्ष दिलं. अखेर आता हे मंदिर बांधून तयार असून त्याच्या उदघाटनाची वेळी भव्य पूजेचं आयोजन करण्यात आलं. 

हे मंदिर २०१५ पासून जास्त प्रकाशझोतात आलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१५ नंतर वीकेंडच्या दिवशी या मंदिराला ५०,००० लोक भेट द्यायला लागले. महसुलातही वाढ झाली. उदाहरणार्थ, मंदिराचे उत्पन्न २०१३-१४ मध्ये ६६ कोटी होतं जे २०१४-१५ मध्ये ७३ कोटींवर गेलं.

त्यातच हे मंदिर हैदराबादपासून जवळपास ५०-६० किलोमीटर अंतरावर असून रेल्वे आणि रस्त्याने जोडलेले आहे.

एकूणच पाहता केसीआर यांनी अगदी योग्य जागी हातोडा मारला आहे. आधी मंदिराला प्राचीन संस्कृतीची जोड, बऱ्यापैकी प्रसिद्धी आणि सहज प्रवाशी पोहचु शकतील अशी व्यवस्था पाहता केसीआर यांनी यदाद्री इथल्या श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराला त्यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी निवडलं आहे. त्याची पुनर्बांधणी करून आता पर्यटकांना तेलंगणात खेचण्याचा मास्टरप्लॅन केसीआर यांनी आखला आहे. 

तेव्हा याचं काय होतंय हे बघणं महत्वाचं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.