छत्रपतींच्या १३व्या वंशज वृषालीराजेंच्या एंट्रीने उदयनराजेंना आव्हान निर्माण होईल का?

छत्रपती शिवराय यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची चौथी व अखेरची राजधानी म्हणजे शाहूनगरी.. अर्थात आजचा सातारा. हे शहर उभारताना दिवाणी स्वरूपाच्या न्यायदानासाठी संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी वास्तु बांधली ‘अदालत वाडा’. आणि अदालत वाडा म्हंटल कि आठवतात ते वाड्यात बसून न्यायदान करणारे थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज, आठवतात करारीपणे वावरणाऱ्या पण तिक्याच प्रेमळपणे जनतेला राजवाड्याची दारं खुल्या करणाऱ्या रयतेला पुत्रवत प्रेम करणाऱ्या राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले.

आज हा अदालत वाडा पुन्हा चर्चेत आलाय तो म्हणजे छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्यामुळे. हा वाडा जो कधीच राजकारणात दिसला नाही पण आता दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे बघूया कोण आहेत या छत्रपती वृषाली राजे.

आज शिवजयंतीच्या निमित्तानं साताऱ्यातील पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे यांच्या कन्या वृषालीराजे भोसले आल्या होत्या.याचवेळी राजघराण्यातील सदस्य असणाऱ्या वृषालीराजे यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर सातारा पालिका निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तसा जर साताऱ्याच्या राजघराण्याचा इतिहास बघायला गेलं तर साताऱ्याचं राजघराण कधीच राजकारणात नव्हतं. साताऱ्याच्या भोसले गादीबद्दल जनतेमध्ये आदरच होता पण त्यांनी आपल्यावर राज्य करावे ही मानसिकता स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हती आणि राजकारण करावे अशी राजघराण्याची देखील इच्छा नव्हती.

यशवंतराव चव्हाणांच जेव्हा इंदिरा गांधी यांच्याशी वितुष्ट आले तेव्हा त्यांनी साताऱ्याच्या राजमाता सुमित्राराजे यांना यशवंतरावांविरुद्ध निवडणूक लढवण्याची गळ घातली पण त्या तयार झाल्या नाहीत. आणि इथूनच खर तर सातारच्या राजघराण्याची इंट्री राजकरणात होताना दिसते. 

सुमीत्राराजे या मध्य प्रदेशातील धार संस्थांनाचे अधिपती उदाजी राजे पवार आणि सौ. लक्ष्मीदेवी राणीसाहेब या दाम्पत्यांचे सातवे अपत्य. त्यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ वे वंशज सातारचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या सोबत पार पडला. छत्रपती सुमित्राराजे भोसले यांना प्रतापसिंहराजे भोसले, अभयसिंहराजे भोसले, विजयसिंहराजे भोसले आणि लहान शिवाजीराजे भोसले ही चार मुल. यातील विजयसिंहराजे भोसले हे लंडनला असतात तर उर्वरीत तीनही मुले साताऱ्यात. सुमित्रा राजेंची ही चार ही मुलं छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज.

स्वर्गवासी प्रतापसिंहराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र उदयनराजे भोसले नरसेवक पदापासून ते आमदार खासदार पदापर्यंत पोहोचले आहेत. ते सातऱ्यातल्या जलमंदीर इथं राहतात.

१९७८ साली प्रतापसिंहराजे यांचे धाकटे बंधू अभयसिंहराजे भोसले हे जनता पक्षाकडून साताऱ्याचे आमदार बनले. अभयसिंह राजेंच्या रूपात पहिल्यांदाच छत्रपतींच्या वंशजापैकी कोणीतरी अधिकृतपणे राजकारणात आलं होत. त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले हे हि आमदार आहेत. ते साताऱ्यात सुरुची बंगला इथं वास्तव्याला आहेत.

आता राहिला तो अदालत वाडा. प्रतापसिंहराजे आणि अभयसिंहराजे यांचे धाकटे बंधू छत्रपती शिवाजीराजे भोसले हे या अदालत वाड्यात राहतात. 

शिवाजीराजेंचा विवाह बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड घराण्यात जन्मलेल्या चंद्रलेखाराजे यांच्याशी झाला. आणि त्यांच्या कन्या म्हणजे छत्रपती वृषालीराजे भोसले. छत्रपती शिवाजीराजे साताऱ्याचे नगराध्यक्ष राहिले पण म्हणावा त्या प्रमाणात त्यांनी राजकारणात रस दाखवला नाही. याउलट अदालत वाडा हा सामाजिक उपक्रमाचा केंद्रबिंदूच राहिलेला दिसतो. पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. काही संस्थावर त्यांनी स्वत: प्रतिनिधित्व केल. विविध सामाजिक संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता.

आता हा वाडा कधीच सक्रिय राजकारणात दिसला नाही पण शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंच्या मनोमिलनात प्रमुख भूमिका पार पडण्याची जबाबदारी मात्र छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्याकडून नेहमीच घेतली जात असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

आता शिवाजीराजेंच्या कन्या छत्रपती वृषालीराजे भोसले या राजकारणात येण्याच्या चर्चा सुरु झाल्यात. 

वृषालीराजे यांचा विवाह नाशिक येथील राजे घराण्यात करण्यात आला होता. मात्र वृषालीराजे यांच्या मातोश्री चित्रलेखा भोसले यांच्या निधनानंतर त्या सध्या त्यांच्या कौस्तुभआदित्यराजे यांच्यासह याच अदालत वाड्यात वास्तव्याला आहेत. छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने आज वृषालीराजे या अदालत वाड्यातून बाहेर पडल्या आहेत. आगामी सातारा पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले या छत्रपतींच्या १३ व्या वंशजांना राजघराण्यातीलच सदस्यांच मोठ आव्हान असल्याची चर्चा आता साताऱ्यात रंगली आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.