सुनील गावस्करनां त्या खेळीमुळे सगळ्यात जास्त टोमणे सहन करावे लागले होते.

साल होतं १९७५, तो पहिल्या वहिल्या क्रिकेट विश्वचषकातील पहिलाच सामना होता.  भारत आणि इंग्लंडचे संघ समोरासमोर होते. सामना होता क्रिकेटची पंढरी म्हणल्या जाणार्या लॉर्डस मैदानावर.

त्याकाळी एकदिवसीय क्रिकेट ही सगळ्यांसाठी एक नवीनच कल्पना होती. चारच वर्षे झाले होते, जेव्हा एक प्रयोग म्हणून इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला होता आणि तो प्रचंड लोकप्रिय ठरला होता. तिथूनच फुटबॉल प्रमाणे विश्वचषक खेळवला जावा ही कल्पना वर आली आणि १९७५ साली इंग्लंडमध्ये पहिला क्रिकेट विश्वकप खेळवला गेला. 

त्याकाळी एकदिवसीय सामना हा ६० षटकांचा असायचा.

तर ७ जूनला खेळायला मैदानावर उतरलेल्या इंग्लंडच्या संघाने ६० षटकांत ३३४ धावा केल्या. इंग्लंड कडून डेनिस एमिसने १४७ चेंडू खेळून १३७ धावा केल्या. स्ट्राईक रेट होता ९३.१९चा जो त्याकाळी फार होता. उत्तरादाखल भारताकडून सुनील गावस्कर ओपेनिंग उतरले. गावस्कर पूर्ण ६० षटके मैदानावर होते आणि १७४ चेंडूंचा सामना केला. पण एका चौकाराच्या मदतीने केवळ ३६ धावा केल्या.

हे काय झाले, कसे झाले ? यावर पूर्ण क्रिकेट विश्व थक्क होते. त्या सामन्यात अंशुमन गायकवाड सुद्धा खेळत होते. सामन्यातील संघाची स्तिथी आठवून ते सांगतात कि,

“पूर्ण संघाच्या खेळाडूंना काही लक्षात येत नव्हते. सगळे चकित झाले होते कि, गावस्कर सारखा फलंदाज अशी फलंदाजी कशी करू शकतो.”

स्वतः सुनील गावस्कर यांनी आपले आत्मचरित्र ‘सनी डेज’ यात कबुल केले आहे की ती खेळी त्यांच्या कारकीर्द मधील सगळ्यात वाईट खेळी होती. भारत तो सामना २०२ धावांनी हरला होता.

आश्चर्याची गोष्ट अशी की, या दरम्यान गावस्कर आउट सुद्धा झाले नाही. तसे त्यांच्या या धीम्या खेळी बद्दल सांगणार्यांनी वेगवेगळी कारणे सांगितली आहेत

त्याकाळी ३०० धावांचे लक्ष्य म्हणजे विजय निश्चित असायचा. अशात आपली हार भारताने आपली खेळी सुरु होण्यापूर्वीच मान्य केली होती. पण त्या विश्वचषकाची रचना अशी होती कि, दोन संघ बरोबरीत राहिल्यास ज्या संघाचा नेट रन रेट चांगला राहील तो संघ पुढे जाणार. पूर्ण संघ बाद झाल्यास भारतच्या नेट रन रेटचे नुकसान झाले असते. म्हणून गावस्कर धावा न करता मैदानावर टिकून राहिले.

दुसरी उडती अफवा अशी की, गावस्कर संघ निवडीवर नाराज होते. विश्वचषकासाठी निवड समितीने संघात वेगवान गोलांदाजाएवजी फिरकी गोलंदाज निवडले होते. हेच गावस्कर यांच्या नाराजीचे कारण होते. कारण त्याधीच्या इंग्लंड दौर्यावर फिरकी गोलंदाज फ्लॉप ठरले होते आणि तसेही इंग्लंडच्या सीजनमध्ये पहिल्या हिस्स्यात फिरकी गोलंदाज कमी चालतात.

काही जण असं ही म्हणतात की, विश्वचषकासाठी वेंकटराघवन यांना कर्णधार केल्याने गावस्कर रागावले होते.

गावस्कर यांना खास कसोटी क्रिकेटसाठी बनलेले आदर्श ओपनर म्हटल जाऊ शकत. त्यांचे मैदानावर टिकून राहणे आणि वेगवान गोलंदाजीचा सामना करू शकण्याचे कौशल्य त्याची ग्वाही देतात. अशात अनेक कसोटी क्रिकेटचे चाहते असे म्हणत होते कि, गावस्कर आपल्या कसोटी क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि एकदिवसीय सामन्याला विरोध म्हणून हि खेळी खेळले होते.

पण असे काहीच नव्हते. स्वतः गावस्करनी सांगितले होते की,

” मी अनेक वेळ स्टंप्स असे सोडून दिले होते कि मी बोल्ड होऊन जाव. तो एकच उपाय होता ज्याने मी त्यावेळी मानसिक तणावातून वाचू शकत होतो. पण मी ना धावा करू शकत होतो ना हि आउट होऊ शकत होतो. माझी स्थिती एका मशीन सारखी झाली होती जी चालत होती.”

तसे याला एक रोचक योग म्हणता येईल पहिल्या विश्वचषकात ३६ धावांची धीमी खेळी खेळणाऱ्या गावस्करांनी आपल्या शेवटच्या विश्वचषकात १०३ धावांची स्फोटक खेळी खेळली होती. १९८७ चा विश्वचषक भारतात खेळला गेला होता आणि हा गावास्कारांचा शेवटचा विश्वचषक होता. गावस्करांनी आपल्या एकदिवसीय सामन्याच्या कारकीर्द मधील अखेरचा सामना ५ नोव्हेंबर १९८७ रोजी मुंबईत इंग्लंड विरोधात खेळला होता.

त्यांनी पुढे जाऊन कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके असे अनेक विक्रम केले, अनेक पुरस्कार मिळवले. कपिलच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या विश्वचषकाचाही ते भाग होते.  असे अनेक अविस्मरणीय प्रसंग त्यांच्या क्रिकेटजीवनात घडले पण १९७५च्या त्या खेळीला ते विसरण्याचाच प्रयत्न करत असतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.