मुख्यमंत्री गंमतीने म्हणायचे, “अण्णा तुम्ही माझी अनेकदा तासली आहे, पण आता जाऊ द्या “

एस.एम.जोशी आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात आदराचं स्थान. एस.एम.जोशींच्या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामुळे  मराठी माणसाला स्वतःच हक्कच राज्य मिळालं व यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राचा मंगल कलश मुंबईला आणला.

यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले तर एस.एम.जोशी विरोधी पक्ष नेते.

त्याकाळी महाराष्ट्राचं विधिमंडळ अभ्यासू भाषणांनी गाजायचं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून आलेले अनेक दिग्गज आमदार झाले होते. कोणताही राजकीय वारसा नसलेले तरुण विधानसभेत दाखल झाले होते. या विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास ९०% आमदार स्वातंत्र्यलढ्यात लढलेले होते.

आदर्श विधिमंडळ कस असावं याचं उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे बोट दाखवलं जायचं. विरोधी पक्ष नेते म्हणून एस.एम.जोशी यांचं कामच असायचं की सरकारच्या उणीव दाखवून देणे.

कोणताही आक्रस्ताळीपणा न करता, घोषणाबाजी न करता अभ्यासू प्रश्न मांडून सरकारला खिंडीत पकडणे हि त्यांची शैली होती.

समोरच्या बाकावर यशवंतराव देखील कमी नव्हते. एस.एम.जोशींच्या प्रश्नाला तितक्याच अभ्यासूपणे उत्तरे दिली जायची. सर्व मंत्र्यांना व आमदाराना योग्य तयारीनेच सभागृहात यायचे.

एकदा एस.एम.जोशी यांनी यशवंतरावांच्या मंत्रीमंडळातील तरुण नेत्याला कसला तरी प्रश्न विचारला. त्याने तयच उत्तर दिलं. एसएम यांचं समाधान झालं नाही. त्यांनी पुन्हा तो प्रश्न विचारला. पुन्हा त्या मंत्र्याने उत्तर दिले पण यावेळी देखील एस.एम जोशी यांच्या मनात काही शंका राहिली असावी त्यांनी परत तिसऱ्यांदा तोच प्रश्न सभागृहात विचारला.

तेव्हा मात्र त्या मंत्र्यांचा तोल गेला. तो त्रस्त होऊन म्हणाला कि,

“मी दोन वेळा उत्तर दिलं  आहे, तुमच्या डोक्यात शिरत नाही आहे का ?” 

अख्ख सभागृह स्तब्ध झालं. एस.एम.जोशी यांच्या सारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला मंत्र्याने खडसावले होते. एका क्षणात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उभे राहिले आणि म्हणाले,

“आपल्या प्रश्नांना उत्तर देणं हि सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे हे आमच्या तरुण मंत्र्यांना समजत नाही आहे. त्यांच्या वतीने मी सभागृहाची व एस.एम यांची माफी मागतो.”

यशवंतराव यांच्या मनाचा मोठेपणा पाहून एस.एम जोशी भारावले. टाळ्यांचा दणदणाट झाला. आपल्या विरोधी पक्ष नेत्याचा देखील सन्मान करावा हा यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेला आदर्श होता.

याचा अर्थ असा नव्हे की तेव्हाच्या विधानसभेत कायम गंभीर वातावरण असे. कधीकधी हलके फुलके प्रसन्ग देखील येत असत.

एकदा काय झालं की एस.एम.जोशी यांनी कोणत्यातरी प्रश्नावर सरकारला पेचात पाडलं होत. प्रश्न तसा गंभीर नव्हता मात्र एस.एम. माघार घ्यायला तयार नव्हते. सरकारची बाजू लंगडी होती अशावेळी सावरून घ्यायला यशवंतराव पटाईत होते. ते हात जोडून एस.एम.जोशी याना म्हणाले,

“अण्णा तुम्ही माझी अनेकदा तासली आहे, पण आता जाऊ द्या “

सगळं सभागृह हास्याच्या पुरात वाहून गेलं. नेहमी गंभीर असणारे एस.एम.जोशी देखील हसू लागले. या उत्तराला एक गंमतीशीर इतिहास देखील होता.

१९४२च्या चले जावं आंदोलनावेळी यशवंत चव्हाण आणि एस.एम.जोशी यांनी क्रांतिकारी लढा सुरु केला होता.

यशवंत राव साताऱ्याच्या प्रतिसरकारमध्ये काम करतात म्हणून त्यांना अटक झाली तर एस.एम.जोशी यांनी पुण्याच्या कॅपिटॉल बॉम्बखटल्यात हात असल्याचा आरोप होऊन त्यांना देखील अटक झाली. या दोन्ही क्रांतीकारकांना योगायोगाने येरवड्यात एकाच बराकीत ठेवण्यात आलं होतं .

तुरुंगातच दोघांची चांगली मैत्री झाली. साहित्य,राजकारण, नाटक अशा अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा व्हायच्या. दोघेही तरुण होते. यशवंतराव चव्हाण बलदंड अंग काठीचे तर एस.एम.जोशी कृष्ण, तोळामासा प्रकृतीचे. दोघांनाही सक्त मजुरीची शिक्षा झाली होती मात्र एस.एम.जोशी याना त्यांच्या प्रकृतीमुळे  कष्टाची कामे दिली जात नव्हती, त्या ऐवजी त्यांना कैद्यांची दाढी करण्याचं काम दिलेलं असायचं.

एवढा मोठा स्वातंत्र्यलढ्यातला नेता मात्र तुरुंगात यशवंतराव व आपल्या अन्य साथीदारांची दाढी करायचा. याच आठवणीला उद्देशून यशवंतराव एस.एम.जोशींना म्हणाले कि तुम्ही माझी कित्येकवेळा तासली आहे पण आता जाऊ द्या.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.