ब्रिटीशांना पळवून पळवून हरवणारे एक महाराज होवून गेले तेच आपले यशवंतराव होळकर..

महाराजा यशवंतराव होळकर म्हणजे मराठा साम्राज्याचा धगधगता इतिहास. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचं बीज रोवलं आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराऊ,संताजी -धनाजी, बाजीराव पेशवे, मल्हारराव होळकर,महादजी शिंदे अशा वीरांनी ते भारतभरात पसरवलं.

पेशावर ते तंजावर मराठी घोड्यांचा संचार होता, मुघल, आदिलशाही, हैदराबादचा निजाम असे सगळे शत्रू मराठ्यांना दबकून होते. पुढे पेशवाईमध्ये अनागोंदी सुरु झाली, बारभाईचा कारभार, आपापसातील भांडणे यामुळे मराठी सत्ता मोडकळीस आली. सरदारांच्यातील एकोपा कमी झाला. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी भारतात पाय रोवले.

पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा एक वीर असाही होऊन गेला ज्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या परिस्थितीतही इंग्रजांच्यात दहशत निर्माण केली होती.

नाव महाराजा यशवंतराव होळकर.

होळकर म्हणजे उत्तरेत मराठी सत्ता पोहचवणाऱ्या मल्हारराव यांनी स्थापन केलेले घराणे. मल्हारराव यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी इंदूरचं साम्राज्य सांभाळलं, वाढवलं. संपुर्ण देशात मंदिरे, घाट, रस्ता, धर्मशाळा बांधून होळकरशाहीचा नावलौकिक वाढवला.

याच घराण्यात यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला.

यशवंतराव हे तुकोजीराव होळकर यांना यमुनाबाई या दासीपासून झालेले पुत्र होते. त्यांना विठोजीराव हे सख्खे, तर काशीराव व मल्हारराव हे सावत्रभाऊ होते. तुकोजीरावांनंतर इंदूरच्या गादीसाठी तंटे सुरू झाले, तेव्हा काशीराव यांनी पेशव्यांचा, तर दुसऱ्या मल्हाररावांनी सर्जेराव घाटग्यांचा आश्रय घेतला.

इंदूरच्या गादीच्या वादातून पुण्याला आलेल्या दुसऱ्या मल्हारराव होळकर यांची दौलतराव शिंदेंनी हत्या केली. त्यांची गरोदर पत्नी जिजाबाई याना कैदेत टाकले. होळकरी साम्राज्य घशात घालण्याचा हा प्रयत्न होता. याला पेशव्यांचे अनुमोदन होते.

यशवंतराव होळकर म्हणजे दुसऱ्या मल्हारराव होळकरांचे सावत्र भाऊ. ते पराक्रमी होते. अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी खर्ड्याच्या लढाईत निजामाला पाणी चाखायला भाग पाडल होतं.

पण स्वकीयांच्या राजकारणामुळे त्यांना रानोमाळ भटकावे लागले.

यशवंतराव हे नागपूरच्या रघुजी भोसल्यांकडे आश्रयास गेले दुसरा बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांनी रघुजी भोसल्यांस यशवंतरावांस कैद करण्यास भाग पाडले परंतु यशवंतराव मोठ्या चातुर्याने कैदेतून निसटले आणि धारच्या आनंदराव पवार यांच्याकडे तीनशे स्वारांसह चाकरीस राहिले.

पुढे त्यांनी गनिमी काव्याने मध्य प्रांतातील मुलखात लुटालूट करून आसपासच्या संस्थानिकांकडून द्रव्य संपादन केले आणि त्यातून पेंढारी, भिल्ल, राजपूत, अफगाण वगैरेंची मोठी फौज तयार केली.

पेशवाईने त्यांना कधीच मान्यता दिली नाही. अखेर यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःला महाराजा घोषित केलं.

दौलतराव शिंद्यांचा सूड घेऊन होळकरांची सत्ता पूर्ववत स्थापण्याचा त्यांचा कृतसंकल्प होता.

पेशवाईच्या गादीवर बसलेले दुसरे बाजीराव हे स्वभावाने चंचल व हलक्या कानाचे होते. त्यांचा बराचसा काळ विलासी जीवनात व्यतीत होत असे. दूरदृष्टी नसल्यामुळे त्यांनी घेतलेले अनेक निर्णय चुकले.

आपल्या दोन पराक्रमी सरदार घराण्यातील वाद मिटवण्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे होते मात्र तसे घडले नाही. यशवंतराव होळकरांनी केलेल्या काही मागण्या मान्य करून सामोपचाराने प्रश्न मिटवता आला असता.

सर्व मराठी सत्ता एकत्र आल्या असत्या तर इंग्रजांना भारतात स्थापने कधीही शक्य झाले नसते.

उलट यशवंतराव होळकर यांचे मोठे बंधू विठोजी होळकर यांना शनिवार वाड्यासमोर हत्तीच्या पायाखाली देऊन मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली.

यामुळे वेळ अशी आली की भावांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेले महाराजा यशवंतराव होळकर भलेमोठे सैन्य घेऊन पुण्यावर चालून आले.

दौलतराव शिंद्यांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी यशवंतरावांनी दक्षिण मोहीम काढून घोरपडी, वानवडी, हडपसर व बारामती या लढायांत शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा पराभव केला आणि पेशव्यांची राजधानी पुणे लुटली. युद्धावेळी पळून गेलेल्या दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला.

यशवंतराव होळकरांनी दुसऱ्या बाजीरावाचा भाऊ अमृतराव यांना पेशवेपदी बसवले पण त्यांना इतर मराठा सरदारांनी साथ दिल्यामुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

मराठा साम्राज्याचे आणि पर्यायाने भारताचे खरे शत्रू टोपीकर इंग्रज आहेत हे यशवंतराव होळकर यांनी ओळखलं होतं. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शिंदे व नागपूरकर भोसले यांना मदतीचे आवाहन केले पण हे घडू शकलं नाही.

इंग्रजांचे आणि शिंद्यांचे युद्ध झाले, त्यात त्यांचा पराभव झाला. शिंदेनाही इंग्रजांचा धोका जाणवू लागला. शिंदेंचा पाडाव केल्यावर इंग्रज सेनापती वेलस्ली याने आपले संपूर्ण लक्ष होळकर साम्राज्याकडे वळवले.

याचा अंदाज आलेल्या यशवंतरावांनी गुप्त रीत्या एक संयुक्त दल उभारण्यासाठी जयपूर, जोधपूर, उदयपूर, बेगम समरू, रोहिल्याचा मुख्य गुलाम मुहम्मद व काहीशीख राजांना पत्रे पाठविली. तसेच दौलतराव शिंद्यांकडे वकील पाठवून इंग्रजांबरोबरचा तह संपुष्टात आणण्याचे आवाहन केले.

त्याचा नेमका उलट परिणाम झाला व इंग्रजांनी यशवंतरावांस एकाकी पाडण्याचे व त्यांचे साथीदार फोडण्याचे धोरण अंगीकारले.

खरेतर इंग्रज होळकरांशी समेट करण्यास उत्सुक होते, तहाची बोलणी सुरु केली होती मात्र तेवढ्यात त्यांना यशवंतरावांच्या तयारीची कुणकुण लागली. त्यांनी तहात अपमानास्पद अटी घातल्या. स्वाभिमानी यशवंतराव होळकरांनी त्या धुडकावून लावल्या. गव्हर्नर जनरलला खरमरीत पत्र लिहिलं, 

“आमच्या फौज समुद्राच्या लाटेप्रमाणे संबंध देश व्यापतील आणि शेकडो मैलांच्या दौडी मारून अल्पावकाशात दुरदुरचे प्रदेश जाळून लुटून टाकतील, तुम्हास एका क्षणाचीही विश्रांती घेऊ देणार नाही.”

हे शब्द त्यांनी अगदी खरे करून दाखवले. एप्रिल १८०४ साली इंग्रजांनी त्यांच्याशी युद्ध पुकारलं. होळकरांच्या सेनेत काही युरोपियन अधिकारी होते त्यांनी इंग्रजांशी युद्ध करण्यास नकार दिला तेव्हा चिडलेल्या यशवंतराव होळकरांनी त्यांचा शिरच्छेद घडवून आणला.

मे १८०४ मध्ये या दोन्ही सेना एकमेकांच्या समोर आल्या. इंग्रजांचे नेतृत्व करत होता ब्रिगेडियर विल्यम मॉन्सन.   

पहिल्याच पावसाळ्यात होळकरांच्या सेनेने मॉन्सनला मुकुंदरा खिंडीत कोंडून धरले. त्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धनीतीपुढे इंग्रज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. ब्रिगेडियर विल्यम मॉन्सनचा पराभव झाला.

पराभूत झालेल्या इंग्रजांचा यशवंतराव होळकरांनी आग्र्यापर्यंत पाठलाग केला.

यशवंतरावांकडे ६०,००० घोडदळ, १६,००० शिपाई व १९२ बंदुका होत्या. भानपुरा इथं त्यांनी अद्ययावत तोफांचा कारखाना काढला होता. अफगाणिस्तान पंजाबच्या राजापासून ते छोट्या मोठ्या संस्थानिकांपर्यंत प्रत्येकाला त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध उभं करण्याचा प्रयत्न केला होता.  

यशवंतरावांनी उत्तरेत मोठी मजल मारली, एकूण  १८ वेळा ठिकठिकाणी इंग्रज सेनेचा पराभव करून त्यांना पळवून लावलं. स्वतः यशवंतराव होळकर पराक्रमी असल्यामुळे युद्धभूमीत आघाडीवर राहून ते लढत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत होळकरी सेना इंग्रजांवर तुटून पडत होती. 

पुढे दिल्लीत गेले, तिथे ठाण मांडून बसले. इंग्रजांचा अंकित झालेल्या मुघल बादशहाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरु केला. लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची त्यांची योजना होती मात्र इंग्रजांची मोठी रसद चालून आल्यामुळे त्यांना दिल्ली सोडावी लागली.

ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्यालय होतं कलकत्त्यात. या बहाद्दर राजानं थेट कलकत्त्यावर हल्ला करत साहेबाच्या घरात जाऊन त्याची मानगूट पकडण्याची योजना आखली होती.

पण बाकीच्या राजांनी साथ न दिल्या मुले व आप्तस्वकीयांनी फितुरी केल्यामुळे त्यांना हे यश लाभले नाही. फरुखाबाद येथे यशवंतरावांचा कर्नल लेकने पराभव केला. तेव्हा ते पंजाबच्या महाराजा रणजित सिंगांकडे मदतीसाठी गेले आणि डिगच्या किल्ल्यात आश्रयार्थ राहिले.

तथापि यशवंतरावांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरून त्यांना ब्रिटिशांबरोबर अखेर तह करावा लागला. 

पुढे  सततचे युद्ध, अपेक्षा-भंग, आयुष्यभराची दगदग यांमुळे यशवंतरावांचे अल्पवयातच भानपुरा येथे निधन झाले. 

यशवंतराव हे धाडसी व शूर होते. त्यांची तुलना काही इतिहासकार नेपोलियनशी करतात. नेपोलियनप्रमाणेच यशवंतराव होळकरांनी इंग्रजी सत्तेवर अंकुश गाजवला होता. दिल्लीच्या बादशहाने महाराजाधिराज राजराजेश्वर अलिबहादूर असा बहुमानाचा किताब दिला होता. रियासतकारांच्या मते मराठेशाहीच्या अखेरीस यशवंतराव होळकर हे एक असामान्य पुरुष निर्माण झाले, त्या वेळी त्यांच्या तोडीचा दुसरा कोणी सेनानायक नव्हता.

जर यशवंतराव होळकरांना इतर मराठेशाहीच्या सरदारांनी मदत केली असती तर इंग्रजांचा भारतातला नामोनिशाण तेव्हाच संपून गेले असते व मराठेशाहीचा डंका लाल किल्ल्यावर देखील वाजला असता. पुढची दीडशे वर्षांची पारतंत्र्याची गुलामगिरी कधीच भोगावी लागली नसती.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pandurang Gunjal says

    अतिशय छान माहिती दिली धन्यवाद.

    जय शिवराय
    जय यशवंत

Leave A Reply

Your email address will not be published.