मराठ्यांचा झाशीमधला दुर्लक्षित वारसा म्हणजे रघुनाथराव महाल

झाशी शहर म्हंटल कि आपल्या डोळ्यांसमोर येतात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद. पण याशिवाय झाशीतली स्मारक, महालं सुद्धा तितकीच आकर्षक आहेत, जी तिथल्या गौरवशाली  इतिहासाचा पुरावा आहे. यातीलच एक म्हणजे रघुनाथ राव महाल. जे वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई  यांचा मोठा दीर महाराजा रघुनाथ राव तृतीयने  बांधलं होत. ज्यामुळं त्याच नावही त्यांच्याच नावावरून (रघुनाथ राव महल) पडलं.

१८ व्या आणि १९ व्या शतका दरम्यान  झाशीत नेवाळकर राजांचे शासन होते. रघुनाथ राव नेवाळकर त्याच वंशातले, जे महाराष्ट्रातल्या कोकणातील पावस गावाचे मुखिया होते. नेवाळकर घराण्याने पेशव्यांची सेवा केली. त्यामुळे त्यांना सेनेत उच्च  पदावर नेमले गेले. १८ व्या शतकात बुंदेलखंडचा राजा छत्रसालने मराठा पेशवा बाजीराव पहिला यांना  बुंदेलखंडची काही ठिकाणं भेट दिले, कारण पेशव्यांनी  मुघल सेनेच्या विरुद्ध एक युद्धात त्यांची मदत केली होती. 

मराठा पेशवाने रघुनाथ राव यांचा पणतू, ज्यांचही नाव रघुनाथ राव होत. त्यांना झाशीतली एक कामगिरी पार पाडण्यासाठी पाठवण्यात आलं. रघुनाथ रावने झाशीत पेशव्यांचं शासन पुन्हा एका स्थापित केलं. यामुळे खुश होऊन रघुनाथ रावला झाशी शहर जागीरच्या रूपात  भेट म्हणून देण्यात आलं आणि १७६९ मध्ये त्यांना तिथलं सुभेदार बनवण्यात आलं. रघुनाथ राव एक चांगला शासक आणि एक बहादूर योद्धा होता.

१७९६ मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा भाऊ शिवरावभाऊ आणि नंतर त्यांचा नातू रामचंद्र राव यांना  सुभेदार बनवण्यात आलं. रामचंद्र राव यांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने शिवराव हरी यांचा मोठा मुलगा रघुनाथ राव तृतीय यांना झाशीचा राजा म्हणून नेमलं. 

अडीच एकरात  पसरलेला रघुनाथ राव महाल मराठा वास्तुकलेच एक अनन्य उदाहरण आहे. याच्या चारही बाजूने सुरक्षा भिंत तयार केली गेलीये.  महालाच्या जवळच रघुनाथ राव तृतीयची मुस्लिम प्रेयसी गजरा बेगमची हवेली होती. कारण रघुनाथ रावांना गजरा बेगम आपल्या डोळ्यासमोरच हवी होती. त्यामुळे त्यांनी हा महाल बनवला. इथल्या चांद दरवाजातनचं  गजरा  बेगम ईदचा चंद्र पाहायची.

रघुनाथ राव रात्रंदिवस रास- रंगात मग्न असायचे. त्यांचं महसूल सुद्धा वर्षाला तीन लाख रुपये इतकाच होत. राज्याचं महसूल कमी होत, पण राजा विनाकारण खर्च करण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना आपल्या राज्यातली ओरछा आणि ग्वालियर सारखी गाव गहाण ठेवायला लागली.

१८३८ मध्ये रघुनाथ रावांच्या निधनानंतर या महालाचा उपयोग सैन्यासाठी केला गेला. गंगाधर राव यांची सेना असो किंवा राणी लक्ष्मीबाई यांची, त्यांचे सैनिक, घोडे, हत्ती याच महालात ठेवण्यात आले. दरम्यान हि गोष्ट वेगळी कि, राणी लक्ष्मीबाई या महालात कधी गेल्या नाहीत.  १८५७ मध्ये जेव्हा झाशी इंग्रजांच्या ताब्यात गेलं, तेव्हा हा महाल सैनिकांच्या कामी आला.  मात्र स्वातंत्र्यानंतर  या महालाची बेकार अवस्था झाली. 

राजवाड्यात जाण्यासाठी मोगल शैलीचा दोन मजली विशाल गेट होते.  दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन मजली दालन होती,  ज्याचे दरवाजे आतल्या बाजूला अंगणात उघडतात. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गोल आकाराची तीन छोटे दरवाजे बनवून ते सुंदर बनवण्यात आलंय. या महालात एक नौबतखाना आहे. या महालाला सुंदर आणि सुधांनी परिपूर्ण असं बनवण्यात आलं होत. याच्यामागे एक मोठी मेहंदी बाग सुद्धा होती.

मात्र आता हा महाल एक खंडर बनलय. यातले काही भाग तर फक्त इतिहासाच्या पानातच जिवंत  आहेत. काही वर्षांपूर्वी हा महाल भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आलाय. यासाठी शासनाकडून ५ कोटींची मागणी  करण्यात आली होती.  ज्यामुळे आता त्याच्या दुरुस्तीच काम सुरु असल्याचं समजतय. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.