दादा कोंडकेंपासून सलमानपर्यंत प्रत्येकजण भांडायचे, सिनेमात रामलक्ष्मण यांचंच संगीत पाहिजे..

नाईनटिजच्या मेलडी संगीताची सुरवात जर कोणी केली असेल तर ती आपल्या मराठी संगीतकाराने केली. विजय काशीनाथ पाटील म्हणजेच राम लक्ष्मण यांनी. नव्वदीच्या सुरवातीला त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांना आपलं संगीत दिलं आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.

16 सप्टेंबर 1942 मध्ये विजय पाटील उर्फ राम लक्ष्मण यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना संगीताची विशेष गोडी होती. ते पियानो उत्तम वाजवत असत. दादा कोंडकेंशी त्यांची भेट झाली आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीची गाडी सुसाट सुटली.

सुरवातीच्या काळात सुरेंद्र हेंद्रे यांच्यासोबत त्यांची जोडी होती. सुरेंद्र हे बासरी वाजवत असे. एका कार्यक्रमात दादा कोंडकेंशी त्यांची भेट घडली आणि दादा कोंडकेंनी या जोडीला राम लक्ष्मण हे नाव दिलं. विजय पाटील यांच घरचं नाव होतं लक्ष्मण . पुढे किडनीच्या आजाराने सुरेंद्र हेंद्रे यांचं निधन झालं. पण विजय पाटील यांनी राम लक्ष्मण हेच नाव पुढे रूढ केलं.

दादा कोंडकेंनी मात्र शेवटपर्यंत राम लक्ष्मण यांना सोडलं नाही . दादा कोंडकेंनी त्यांना पांडू हवालदार या चित्रपटात संगीत देण्यास सांगितलं होतं. या चित्रपटातील गाणी गाजली मग दादांनी त्यांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी राम लक्ष्मण यांचीच सोबत ठेवली. राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी संगीत दिलं.

दादा कोंडके यांच्यापासून ते मनमोहन देसाई, महेश भट्ट,जि.पी. सिप्पी, अनिल गांगुली अशा दिग्गज दिग्दर्शकाना राम लक्ष्मण यांच्या संगीताची भुरळ पडली आणि त्यांनी राम लक्ष्मण यांना आपापल्या चित्रपटात संगीत देण्यास सांगितलं.

1981 च्या सुमारास तुमसे बढकर कौन नावाचा चित्रपट आला होता, चित्रपटात सगळी मातब्बर कलाकार मंडळी होती.रवींद्र रावळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करता होते. चित्रपटात एक गणपतीचं गाणं असावं असं त्यांना वाटतं होतं गाणं एकदम भव्यदिव्य हवं होतं. ते गाणं होतं देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढकर कौन….. गाण्यामुळे चित्रपट हिट झाला.

हे गाणं त्यावेळी तुफ्फान चाललं, म्हणजे हे गाणं काय तेव्हाच नाही चाललं तर आजही गणेशोत्सवात हे हे गाणं वाजल्याशिवाय गणपती आल्याचा फील येत नाही. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं होतं एका मराठी संगीतकाराने अर्थात राम लक्ष्मण यांनी.

विजय पाटील हे खऱ्या अर्थाने गाजले ते 1988 साली. ते उत्तम संगीतकार होते ,पियानो उत्कृष्ट वाजवायचे. राजश्री प्रोडक्शन सोबत सगळ्यात जास्त काळ काम करणारे राम लक्ष्मण हे एकमेव संगीतकार आहे. केवळ त्यांच्या संगीतामुळे राजश्री प्रोडक्शन ओळखलं जाऊ लागलं.

सूरज बडजात्या यांनी बॉलीवूड मध्ये एक नवा हिरो लॉन्च करायचं ठरवलं होतं. हिरो होता सलमान खान. हा चित्रपट म्युझिकल आहे हे आधीच ठरलं होतं. सुरज बडजात्या यांनी या चित्रपटाचं म्युझिक करण्याची संधी राम लक्ष्मण यांना दिली. या चित्रपटाने त्यावेळी संगीतप्रधान चित्रपटाचा नमुना पेश केला.

या पिक्चरचं नाव होतं मैने प्यार किया.

एकसे बढकर एक गाणी या चित्रपटात होती.

दिल दिवाना बिन सजना के मानेना….

कबुतर जा…

तू चल में आयी….

या गाण्यांनी चित्रपट सुपरहिट झाला.

राम लक्ष्मण यांनी तेव्हा एक विक्रम केला होता, त्या वर्षीचा फिल्मफेअर फॉर बेस्ट म्युझिक डायरेक्टर चा अवॉर्ड विजय पाटील यांना मिळाला. इतकंच नाही तर या चित्रपटाच्या संगीत विभागाने गीतकार, गायक आणि संगीतकार अशा तिन्ही ठिकाणी बाजी मारली. राम लक्ष्मण यांनी या चित्रपटातून एस पी बालासुब्रह्मण्यम या दक्षिणेतल्या सुपरस्टार गायकाला बॉलिवूड मध्ये रिलॉन्च केलं.

हम आपके हें कौन ( 1994 ), हम साथ साथ हें ( 1999 ) या चित्रपटांचं संगीत आणि यातील गाणी मैलाचा दगड ठरली. आजही ही गाणी आवडीने ऐकली जातात याचं श्रेय जातं ते विजय पाटील म्हणजे राम लक्ष्मण यांना.

राम लक्ष्मण यांना शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर हे दोन गायक खूप आवडायचे, त्यांचे आवडते गीतकार होते असद भोपाली. बहुतांशी चित्रपटात जिथं राम लक्ष्मण यांचं संगीत आहे तिथं ही मंडळी हमखास दिसतात.

मराठीत दादांसोबतच्या त्यांच्या सिनेमांनी विक्रम तर केलाच होता मात्र हिंदीतही मैने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है हे सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. इतके सिनेमे सुपरहिट असूनही स्वतःची पब्लिसिटी न केल्यामुळे हा मराठी चेहरा रसिकांसाठी शेवट्पर्यंत अनोळखी ठरला.

आज या महान संगीतकाराचं निधन झालं. बॉलीवूड मध्ये संगीत क्षेत्राने जो गाण्यांचा सुवर्णकाळ आणला त्यातील महत्वाचा वाटा हा राम लक्ष्मण यांचा होता. संगीत क्षेत्रातील ही सगळ्यात मोठी हानी झाल्याचं मानलं जातंय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.