पर्वतीय नागरिकांचा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या आसाम रायफल्सकडून नागालॅंडमध्ये चूक झाली आहे

नागालॅंडच्या मोन जिल्ह्यातल्या तिरू या गावात शनिवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात १३ स्थानिक  नागरिकांचा मृत्यू झाला. असं सांगण्यात येते की, सुरक्षा दलाचे अतिरेक्यांविरोधात एक ऑपरेशन सुरु होते. त्या दरम्यान ही घटना घडली.

ओटिंग गावातून काही नागरिक एका पिकअप व्हॅन मध्यरात्री परत निघाले होते. मात्र, ते घरी पोहचले नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. तेव्हा तिरू गावाजवळ पिकअप व्हॅनमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले. यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता बोलून दाखवण्यात येत आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आसाम रायफल्स या निमलष्करी दलावर हल्ला केला असून त्यांची वाहने जाळण्यात आली आहेत. त्यात एका जवानाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

आसाम रायफल्स याबबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे

या घटनेनंतर आसाम रायफल्सने स्पष्टीकरण दिले असून यावर खंत व्यक्त केली आहे. ५ डिसेंबर रोजी आसाम रायफल्सने एक निवेदन सादर केले आहे. त्यात स्पष्ट केले की, आम्हाला एक गुप्तचरामार्फत माहिती मिळाली होती. त्यात अतिरेकी याभागात जाणार असल्याचे कळाले होते. त्याअंतर्गत एक प्लॅन तयार करण्यात आला होता. या दरम्यानच ही घटना घडली असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

या नागरिकांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी न्यायालयामार्फत करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्यात येईल. या घटनेत सुरक्षा दलाचे काही जवान हे जखमी झाले असून एका जवानाचा मृत्यू सुद्धा झाला आहे. घटना आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आम्ही खंत व्यक्त करत आहोत. अशा प्रकारचे स्पष्टीकरण आसाम रायफल्सकडून देनाय्त आले आहे.

भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल अशी आसाम रायफल्सची ओळख आहे.

निम लष्करी दल म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊयात

लष्करी दल आणि निमलष्करी दलाचे दोन्हीचे काम हे देशाची सुरक्षा करणे असते. मात्र ही दोन्ही दलं वेगवेगळ्या परिस्थितीत काम करत असतात.

  • निमलष्करी दल हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात.
  • निमलष्करी दलात स्पेशल सिक्युरिटी फोर्स, आसाम रायफल्स, इंडियन कोस्ट गार्ड या सारख्या दलाचा समावेश होतो.

या दलातील जवान देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न हाताळतात, तणावाच्या ठिकाणी बंदोबस्त, महत्वाच्या इमारतीची सुरक्षा, अति महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देण्याचे काम निमलष्करी दलाकडून करण्यात येते.

अशाच निमलष्करी दलापैकी एक असणारे आसाम रायफल्सची स्थापना १८३५ मध्ये करण्यात आली. आसाम रायफल्स ही देशातील सर्वात जुने निम लष्करी दल आहे. या दलाला पहिले ‘कचर लेवी’ असे म्हटले जात होते. त्यानंतर अनेकदा या दलाचे नाव बदलले. १८८३ मध्ये या दलाला आसाम फ्रंटीयर पोलीस असे नामकरण करण्यात आले.

त्यानंतर पुन्हा एकदा या दलाचे नाव बदलून आसाम मिलिटरी पोलीस, तर १९१३ मध्ये इस्टर्न बेंगॉल ॲन्ड आसाम मिलिटरी पोलीस असा नावात बदल करण्यात आला. शेवटी १९७१ मध्ये पुन्हा एकदा या दलाचे नाव बदलून आसाम रायफल्स असे करण्यात आले.

आसाम रायफल्स हे केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत येत असून त्याचे मुख्यालय मेघालयाची राजधानी शिलॉंग येथे आहे.

आसाम रायफल्स हे निमलष्करी दल दोन्ही महायुद्धात तैनात होते. पहिल्या महायुद्धात युरोप आणि मध्यपूर्वेतील रणांगणावर आपली ताकत दाखवून दिली होती, दुसऱ्या महायुद्धात म्यानमारमध्ये जपान विरोधात लढले होते.

तिबेटला १९५१ मध्ये चीन आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून आसाम रायफल्सकडे चीनला लागून असणाऱ्या पूर्वोत्तर राज्यांच्या सीमेची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच २००२ पासून भारत आणि म्यानमार सीमेवर आसाम रायफल्सकडून सुरक्षा पुरविण्यात येते.

आपल्याला पूर्वोत्तर राज्यातील भौगोलिक परिस्थिती माहितच आहे. या भागात दळवळण, वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करत असते. मुख्य म्हणजे पूर्वोत्तर राज्यात आसाम रायफल्सच्या जवानांना पर्वतीय भागातील नागरिकांचा मित्र असे म्हटले जाते.

ब्रिटीश राजवटीत स्थापन झालेले हे निम लष्करी दल अजूनही आपल्या कामामुळे ओळखले जाते. मात्र, शनिवारी झालेल्या घटनेनंतर आसाम रायफल्सवर टीका करण्यात येत आहे. यामुळे सुरक्षा दले आणि नागरिकांमधील अंतर वाढण्याचा धोका आहे.

हे ही वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.