मोहिंदर अमरनाथने होल्डिंगला एलबीडब्ल्यू केलं आणि भारतीय संघाने इतिहास रचला…!!!

२५ जून १९८३.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस. याच दिवशी कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेटच्या सुवर्णमय भवितव्याच्या वाटचालीची बाराखडी लिहीली होती. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैनादानावर क्रिकेट जगतातील बलाढ्य समजल्या जाणाऱ्या क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाचा पराभव करत भारतीय संघाने आपला पहिला-वहिला विश्वचषक जिंकून इतिहास घडवला होता. या घटनेला आज ३५ वर्षे पूर्ण होताहेत.

१९८३ चा विश्वचषक विजय हा फक्त भारतीय क्रिकेटसाठीच नाही तर एकूणच क्रिकेटविश्वाच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठरला. कारण त्याकाळी वेस्ट इंडीजचा संघ क्रिकेटविश्वात ‘दादा’ समजला जायचा. संपूर्ण क्रिकेटविश्वावर त्यांचंच अधिराज्य होतं. त्यामुळेच वेस्ट इंडीजच्या संघाला पराभूत करणं ही कुठल्याही संघासाठी अभिमानाने मिरविण्यासारखी  बाब होती. भारतीय संघाने तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ही किमया घडवली होती.

विशेष म्हणजे या विश्वचषकात हा कारनामा भारताने २ वेळा घडवला होता. स्पर्धेच्या आपल्या सलामीच्या लढतीतच भारताने मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्डच्या मैदानावर वेस्ट इंडीजच्या संघाचा ३४ धावांनी पराभव करत आपल्या विश्वचषक अभियानाची धडाक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर अंतिम सामन्यात पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचाच पराभव करत, साखळी फेरीतील वेस्ट इंडीजवरचा विजय हा काही अपघात नव्हता यावर भारतीय संघाने शिक्कामोर्तब केलं होतं. क्रिकेटविश्वावरील वेस्ट इंडीजची सद्दी मोडून काढली होती.

Screenshot 2
सेमी फायनल आणि फायनलमधील भारतीय विजयाचा शिल्पकार मोहिंदर अमरनाथ

साखळी फेरीतील समीकरणं

या विश्वचषकात ८ संघांचा समावेश होता, त्यांची विभागणी २ गटांमध्ये करण्यात आली होती. ‘अ’ गटात इंग्लंड, पाकिस्तान, न्युझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश होता तर ‘ब’ गटात वेस्ट इंडीज, भारत, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाम्बे यांचा समावेश होता. गटातील ४ संघांचे एकमेकांविरुद्ध प्रत्येकी  २ सामने खेळविण्यात आले.

‘अ’ गटातून इंग्लंडने आपले ६ पैकी ५ सामने जिंकत तर पाकिस्तानने ६ पैकी ३ सामने जिंकत सेम-फायनलसाठी आपलं स्थान पक्कं केलं होतं. ‘ब’ गटातून वेस्ट इंडीजने ६ पैकी ५ तर भारतीय संघाने ६ पैकी ४ सामने जिंकले होते आणि हे दोन संघ सेमीजसाठी पात्र ठरले होते. भारताकडून झालेला पराभव हा वेस्ट इंडीजचा साखळी फेरीतील एकमेव पराभव होता. अर्थात साखळी फेरीतील भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा ६६ धावांनी पराभव करून  वेस्ट इंडीजच्या संघाने या पराभवाची परतफेड करत हिशेब चुकता केला होता. साखळी फेरीतील भारताचा दुसरा पराभव ऑस्ट्रेलियन संघाकडून झाला होता.

सेमी-फायनल

विश्वचषकाच्या दोन्हीही फायनल एकाच दिवशी म्हणजे २२ जून रोजी खेळवल्या गेल्या. पहिल्या सेमी-फायनलमध्ये भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध भिडला. सामन्यासाठी अर्थातच इंग्लंडचा संघ फेवरीट होता कारण इंग्लंडचा संघ देखील बलाढ्य समजला जात असे  आणि आपल्या लौकिकास जागत साखळी फेरीत देखील या संघाने चमकदार कामगिरी नोंदविली होती. त्यांनी देखील साखळी फेरीत फक्त एकच पराभव स्वीकारला होता. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लंडचा संघ घरच्या मैदानात खेळत होता.

टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला कपिल देव, मोहिंदर अमरनाथ आणि रॉजर बिन्नी यांच्या भेदक माऱ्यासमोर निर्धारित ६० षटकात २१३ धावांपर्यंतच मजल मारता आली. हे लक्ष भारतीय संघाने यशपाल शर्मा आणि संदीप पाटील यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ५५ ओव्हर्समध्येच ४ विकेट गमावून पूर्ण केलं आणि साहेबांच्या संघाचा त्यांच्याच घरात पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवलं. मोहिंदर अमरनाथ या सामन्यातील भारताचा हिरो ठरला. फलंदाजीत ४६ रन्स आणि गोलंदाजीत २ विकेट्स अशा अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

दुसऱ्या सेमी-फायनलमध्ये अपेक्षेनुरूप वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानच्या संघाचा अतिशय सहज पराभव केला. पाकिस्तानचे १८५ रन्सचे लक्ष वेस्ट इंडीजने अवघ्या २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत विश्वविजेत्या संघाच्या थाटातच फायनलमध्ये प्रवेश केला.

अंतिम सामन्याचा थरार

indian team 1
विश्वविजेता भारतीय संघ

१९७५ आणि १९७९ सालचे विश्वचषक वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकलेले होते आणि हा सामना जिंकत विश्वविजयाची हॅट्रिक साधण्याच्या इराद्यानेच कॅरेबियन संघ मैदानात उतरला होता. याउलट भारतीय संघ प्रथमच विश्वचषकाचा अंतिम सामना खेळत होता.

वेस्ट इंडीजचा कॅप्टन क्लाईव्ह लॉईडने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आपल्या कॅप्टनचा हा निर्णय किती योग्य होता हे अँडी रॉबर्टसने  लगेच सिद्ध करत भारताच्या  स्कोअरबोर्डवर फक्त २  रन असताना सुनील गावस्करला तंबूत पाठवलं. त्यानंतर के.श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ यांनी थोडा फार संघर्ष केला परंतु ही दोघे आउट झाल्यानतर भारतीय संघाने अँडी रॉबर्टस, माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि लॅरी गोम्स यांच्या तिखट माऱ्यासमोर अक्षरशः शरणागती पत्करली. भारतीय संघाला निर्धारित ६० षटके देखील खेळता आली नाहीत. संदीप पाटील आणि खालच्या फळीतील मदन लाल यांनी थोडा प्रतिकार केल्याने ५५ ओव्हर्समध्ये भारतीय संघाला फक्त  १८३ रन्स उभारता आले.

गोर्डन ग्रीनीज, व्हिव्ह रिचर्डस, क्लाईव्ह लॉईड अशा एकापेक्षा एक रथी-महारथींचा भरणा असलेल्या वेस्ट इंडीजच्या संघासमोर १८३ रन्सचं लक्ष वाचवणं ही काही खायची गोष्ट नव्हती. त्यामुळे खरं तर अशा परिस्थितीत अनेकांसाठी हा सामना केवळ वेस्ट इंडिजच्या विजयाची औपचारिकता म्हणूनच शिल्लक राहिला होता, पण कपिल देवच्या शिलेदारांच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं.

वेस्ट इंडीजच्या डावाला सुरुवात झाली आणि स्कोअरबोर्डवर फक्त ५ रन्स असताना बलविंदर संधूने ग्रीनीजला तंबूचा रस्ता दाखवत भारतासाठी चांगली सुरुवात करून दिली. पण त्यानंतर व्हिव्ह रिचर्डस आणि डेसमंड हेंस यांनी संघाचा डाव सावरला. ही जोडी धोकादायक ठरू लागतेय, असं वाटत असतानाच मदन लाल भारतीय संघाच्या मदतीला धावून आला. त्याने थोड्या अंतरातच या दोघांना आणि त्यानंतर आलेल्या गोम्सला पॅव्हेलीअनमध्ये पाठवलं. इथंपासून भारतीय संघाच्या विश्वविजयाच्या आशा पल्लवित व्हायला सुरुवात झाली.

स्कोअरबोर्डवर ७६ धावा जमा होईपर्यंत वेस्ट इंडीजने आपल्या ६ विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. असं असताना जेफ डूजॉन नावाच्या माणसाने मात्र मैदानात नांगर टाकला होता आणि माल्कम मार्शलला साथीत घेऊन तो संघर्ष करत होता. या दोघांनी मिळून ४३ रन्सची पार्टनरशिप उभारली होती. एक लो स्कोअर डिफेंड करताना ४३ रन्सची पार्टनरशिप किती धोकादायक ठरू शकते हे इथं वेगळं सांगायला नको.

अशा स्थितीत कपिल देवने आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढत बॉल मोहिंदर अमरनाथच्या हातात सोपवला.

अमरनाथने देखील आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरविताना धोकादायक ठरू पाहणाऱ्या या जोडीला तंबूत पाठवत भारतीय विजयाचा रस्ता सुकर केला. त्यानंतर आलेले प्लेअर्स फक्त हजेरी लावून परतले आणि ५२ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मोहिंदर अमरनाथनेच मायकेल होल्डिंगला एलबीडब्ल्यू केलं आणि क्रिकेटच्या इतिहासातील सोनेरी पानावर भारताचं नांव लिहलं गेलं. भारताच्या विश्वविजेतेपदाच्या स्वप्नांना प्रत्येक्षात उतरविण्यात मोलाची कामगिरी करणारा अमरनाथ परत एकदा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

लॉर्डसच्या मैदानात उपस्थित असलेल्या हजारो भारतीय क्रिकेटरसिकांना अनपेक्षितपणे ही जल्लोषाची संधी मिळाली होती. दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव करत क्रिकेटच्या पंढरीत भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नांव कोरलं होतं. वेस्ट इंडीजच्या संघाला देखील पराभूत करता येऊ शकतं, हा धडा या विजयाने भारतीय संघाने अवघ्या क्रिकेटविश्वाला दिला होता.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.