तब्बल २८ वर्षानंतर मुंबई दंगलीतल्या आरोपीला साक्षीदार असेल म्हणून सोडून देण्यात आलंय..

असं अनेकदा होतं कि आपल्याला आपल्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत उदासीनता जाणवते. त्याला अजून एक कारण म्हणजे, देशातील विविध न्यायालयांमध्ये ५८ लाख ७० हजारांपेक्षा जास्त प्रकरणे अजूनही  प्रलंबित आहेत. म्हणूनच आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत.

प्रलंबित प्रकरणांमध्ये अडकलेल्या अनेक निष्पाप आणि निर्दोष लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. असंच एक प्रकरण १९९३ च्या मुंबई दंगलीशी संबंधित आहे. यामध्ये मुंबईतील एका स्थानिक न्यायालयाने २८ वर्षांनी एका व्यक्तीला निर्दोष मुक्त केले.

न्यायालयाने म्हटले आहे की ही व्यक्ती केवळ दंगलीच्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती, त्यात आरोपी नव्हती !

इंडिया टुडेच्या एका अहवालानुसार, रशीद अहमद मोहम्मद इलाख खान असे या व्यक्तीचे नाव आहे. या दंगलीच्या घटनेच्या वेळी ते ३४ वर्षांचे होते. राशिद आता ६२ वर्षांचे आहेत. मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना नुकतेच सर्व आरोपातून मुक्त केले आहे.

काय होतं प्रकरण?

तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुनील बाजरे आणि इतर पोलीस या भागात गस्त घालत होते. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. राशिद अहमद खानचे प्रकरण १२ जानेवारी १९९३ रोजी घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. त्या दिवशी मुंबईच्या पूर्व वडाळा भागात दोन गटांमध्ये दगडफेक झाली.

दीनबंधु नगरमध्ये त्यांनी ३०० ते ४०० लोकांचा जमाव एकमेकांवर दगडफेक करताना, बाटल्या फेकताना पाहिले.

पोलिसांनी जमावाला पांगण्याचा इशारा केला, पण जमाव आक्रमक झाला. त्याने अग्नीचे गोळे आणि ट्यूबलाईट फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. मात्र, जमाव अजूनच आक्रमक झाला. यानंतर पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेत एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला तर काही जण जखमी देखील झाले होते.

पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांनी जमावातील १५ लोकांना अटक केली आहे. यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांचा समावेश होता. रशीद अहमद खान देखील याच १५ लोकांमध्ये होता.

बातमीनुसार, १५ पैकी १० आरोपींची न्यायालयाने आधीच निर्दोष मुक्तता केली आहे. ४ जणांचा अद्याप माहिती मिळाली नाही. बाकी राशिद अहमद चा तपास लागला होता. पण २०२० मध्ये त्याला अटक करण्यात आली. मात्र, या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच रशीद खानने निर्दोष असल्याचे कबूल केले होते.

पोलिसांनी या प्रकरणात असलेले तीन साक्षीदार हजर केले होते. पण न्यायालयाला ते पुरेसे वाटले नाही. घटनेत आरोपी रशीद खानचा सहभाग असल्याचं सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर कोणताही पुरावा मिळाला नाही. घटनेत ३०० ते ४०० लोकं होते. मालमत्तेची तोडफोड करण्यात कोणाची भूमिका होती हे शोधणे कठीण आहे.

तसेच आरोपींना ओळखण्यासाठी स्वतंत्र साक्षीदारही नाहीत, असे म्हणत त्यांनी रशीद खान साक्षीदार म्हणून सुटका केली.

आरोपींवर कोणतेही विशिष्ट आरोप निश्चित केलेले नाहीत. जर असे गृहीत धरले गेले की आरोपी त्यावेळी उपस्थित होता, तर कदाचित तो निर्दोष आहे आणि फक्त प्रत्यक्षदर्शी होता. 

न्यायाधीश वाघ यांनी निकाल सुनावताना पुढे सांगितले की, आरोपीला घटनास्थळावरून पकडण्यात आले, परंतु ओळख परेड आयोजित करण्यात आली नाही. न्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणात सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर असे म्हणता येणार नाही की आरोपी कोणत्याही प्रकारे कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होता.

त्यामुळे न्यायालयाने म्हटले की, रशीद खानवर लावण्यात आलेला आरोप सिद्ध होऊ शकला नाही. आणि मग रशीद निर्दोष सुटले. ८ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या रशीद खानची न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.