१० वर्षे लागली पण मोसादच्या गुप्तहेरांनी ६० लाख ज्यु धर्मीयांच्या मारेकऱ्याला शोधून काढलं..

जगातील सर्वात क्रुर हुकुमशाह म्हणून आजही हिटलरचं नाव घेतलं जातं. त्याच्या कृत्यांनी त्याला ही पदवी मिळवून दिली आणि जागतिक इतिहासाच्या काही काळ्या पानांवर तो अजरामर झाला. हिटलरला अमानुष आणि क्रुर म्हणण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याने केलेला ज्यू लोकांचा अमानुष नरसंहार.

या नरसंहाराला जितका तो जबाबदार होता तितकेच त्याचे साथीदार देखील. यात हर्मन गोयरिंग, जोसेफ गोयबल्स अशी नाव सांगता येतात. अशाच काही प्रमुख साथीदारां पैकी होता

एडोल्फ आइखमॅनची.

६० लाख निर्दोष ज्यू लोकांच्या नरसंहारक. आणि हिटलरचा सगळ्यात खास माणूस म्हणून जग एडोल्फ आइखमॅनला ओळखत होतं. सोबतच तो फायनल सोल्युशनचा आयोजक देखील होता.

आता हे फायनल सोल्युशन म्हणजे काय? तर हा एक कोडवर्ड होता. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जे काही इलाखे जर्मनीच्या ताब्यात असतील तिथल्या लोकांना पकडून मारण्याच्या ऑपरेशनचा कोडवर्ड. फायनल सोल्युशनचे धोरण १९४२ मध्ये वांजी कॉन्फरन्स दरम्यान बनवण्यात आले होते.

आइखमॅनचे काम होतं ज्यू लोकांची ओळख पटवणे, त्यांना एकत्र करून एका रेल्वेमध्ये भरणे आणि डेथ कॅप्सच्या दिशेने पाठवून देणे. पुढे तिथे गॅस चेंबर या लोकांची वाट बघत असायचे. पण त्याने मात्र त्याला दिलेले हे काम अगदी परफेक्ट केले. तसंही ज्यु लोकांना मारण्याचा अनुभव त्याला नवीन नव्हता. यापुर्वी ऑस्ट्रिया आणि पराग्वेमध्ये त्याने हेच काम केले होते.

अशा पद्धतीने दुसरे महायुद्ध संपता संपता जवळपास ६० लाख ज्यु लोक मारले गेले. बर्लिनच्या पाडावानंतर मात्र नाझी साम्राज्य लयास गेलं. हिटलरने स्वतः आत्महत्या केली. यानंतर नाझी पार्टीचे सगळ्यात मोठे नेते त्याचे साथीदार हर्मन गोयरिंग आणि जोसेफ गोयबल्स यांनी देखील आत्महत्या केली.

जे वाचले त्यांना सैन्याने अटक केली. न्यूरेम्बर्गमध्ये त्यांच्यावर खटला चालवला आणि प्रत्येकाच्या गुन्ह्यानुसार त्यांना शिक्षा दिली गेली.

पण या सुनावणी दरम्यान आइखमॅन नव्हता. त्याला अटक करण्यात आली होती पण तो त्याच वेळी जेल मधुन पळुन गेला होता. त्यानंतर त्याचा जवळपास १० वर्ष कसलाच ठावठिकाणा नव्हता.

तोपर्यंत १९४८ साल उजाडले. इस्त्राईल ज्यु धर्मीय लोकांचा नवीन देश बनला होता. डेविड बेन-गुरियन पहिले पंतप्रधान झाले. सत्तेवर आल्यानंतर गुरियन यांनी एका अशा केंद्रीय तपास संस्थेच्या निर्मीतीची इच्छा बोलून दाखवली, जी बाकी संरक्षण संस्थांसोबत ऑर्डिनेट करु शकेल.

मार्च १९५१ मध्ये मोसादची रचना बदलली. तेव्हा पासून ही यंत्रणा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करू लागली. वेळेनुसार मोसादची भूमिका देखील बदलत गेली.

अशातच १९५९ मध्ये मोसादला एक टिप मिळाली. अर्जेंटिना मधून बातमी आली की, आइखमॅन सारखी दिसणारी एक व्यक्ती तिथे राहत आहे. बातमी खरी होती. आता मोसादने आपले ऑपरेशन सुरू केले. एजंट्सना अर्जेंटीनाला पाठवलं. पुढच्या बऱ्याच महिन्यांपर्यंत रेकी केली. सगळी माहिती काढली. तो अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्सच्या जवळ रिकार्डो क्लीमेंट या नावाने राहत होता.

६० लाख ज्यु लोकांचा संहारक अगदी चैनीत आयुष्य जगत होता.

पण अर्जेंटिना आणि इस्त्रायलमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यार्पण करार नव्हता. त्यामुळे कायदेशीर रित्या त्याला इस्त्रायलमध्ये आणणे शक्य नव्हते. पण त्याला आणणं देखील तितकचं गरजेचं होतं.

मोसाद एका संधीच्या शोधात होती आणि त्यांना ती संधी मिळाली १९६० मध्ये. अर्जेंटिना स्पेन विरुद्धच्या क्रांतीला १५० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा साजरा करत होती. संपूर्ण जगातून पर्यटक अर्जेंटिना मध्ये दाखल होत होते. मोसादने देखील आणखी काही एजंट्सना पर्यटकांचा वेश धारण करून अर्जेंटिनामध्ये घुसवले.

सगळे प्लॅनिंग झाले. ऑपरेशनचा दिवस ठरला ११ मे. रोज संध्याकाळी आइख़मॅन एका बसने आपल्या घरी येत असायचा. जिथे बस थांबाती तिथून काही मीटर अंतर आतमध्ये त्याचं घर होतं.

तर प्लॅन असा ठरला की, याच रस्त्यावर त्याला बेशुद्ध करून त्याच अपहरण करायचं.

एजंट्स तिथेच थांबून वाट बघत होते. दोन गाड्या तयार ठेवल्या. आता केवळ बसची वाट बघत होते. इतक्यात ठरलेल्या वेळेनुसार बस आाली. पण त्यात आइख़मॅन नव्हता. म्हणजे आता ऑपरेशन फेल होणार होता का? तर नाही. एजंट्सनी आणखी काही वेळ वाट बघायचं ठरवलं. पुढे अर्ध्या तासाने एक दुसरी बस आली तेव्हा सगळ्यांच्याच ह्र्दयाची धडधड वाढली.

ते आतूरतेने बराच वेळ लक्ष ठेवून होते. यावेळी मात्र या बसमधून छोट्या उंचीचा आणि अर्ध्या वयाचा माणूस जिथे मोसाद एजंट्सच्या गाड्या उभ्या होत्या त्याच रस्त्याने तो पुढे निघाला. तो आइख़मॅनच होता. एजंटनी लगेच कार्यक्रम केला. त्याला पकडलं, गाडीत घातला आणि लगेच तिथून निघून गेले.

आइख़मॅनला मोसादच्या सेफ हाऊसवर आणण्यात आलं. पुढचे जवळपास नऊ दिवस या ऑपरेशनला जगापासून लपवून ठेवण्यात आलं. अर्जेंटिना मधून इस्रायल जाण्यासाठी पुढचे विमान २० तारखेला ठरवले गेले. जर यादरम्यान अर्जेंटिना सरकारला सेफ हाऊसच्या बाबतीत माहिती मिळाली असती तर फक्त मोसादच्या एजंट्सचाच जीव धोक्यात आला नसता तर एक मोठा टार्गेट हातातून कायमचे निघून गेलं असतं.

कधी तरी वेळ अशी आली देखील जिथे पूर्ण ऑपरेशन फेल होण्याची शक्यता होती. पण एजंट्सनी समयसूचकता दाखवत प्रकरण सांभाळलं. २० मे रोजी हे सगळे विमानात बसले. आइख़मॅनचा अवतार बदलला. औषध देऊन त्याला बेशुद्ध करण्यात आलं. एयरपोर्ट सिक्योरिटीला सांगितलं की, तो एक इस्रायल एअरलाईनचा कर्मचारी असून त्याच्या डोक्यावर जखम झाल्याने तो बेशुद्ध झाला आहे. अशा पद्धतीने आइख़मॅनला इस्त्रायला आणण्यात आलं.

तीन दिवसानंतर गुरियन यांनी जाहीर केले की एडोल्फ़ आइख़मॅन इस्त्रायलच्या ताब्यात आहे. सगळ्या जगात हलकल्लोळ झाला. अर्जेंटीनाने आइखमॅनला परत सुपूर्त करण्याची मागणी केली. पण इस्त्रायलने त्यांना साफ नकार दिला.

११ एप्रिल १९६१ ला जेरुसेलममध्ये आइख़मॅनवर खटला सुरु झाला. त्याच्यावर ज्यु धर्मीयांची हत्या, मानवतेला लाजवणारे गुन्हे आणि युद्धादरम्यानचे गुन्हे असे जवळपास १५ चार्जेस लावले.

फायनल सोल्युशनमधून वाचलेल्या लोकांनी साक्ष दिली. हे लोक जुन्या आठवणींना उजाळा देवून तो संपुर्ण दिवस रडत होते. हा खटला फक्त इस्त्रायलच नाही तर संपुर्ण जग बघत होते. पहिल्यांदा न्यायालयाची कारवाई टिव्हीवर दाखवली जात होती.

आइख़मॅनने बचावात्मक साक्ष दिली की तो केवळ आज्ञेचे पालन करत होता. मात्र न्यायालयाने त्याची साक्ष फेटाळून लावली. आणि अखेरीस १५ डिसेंबर १९६१ रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायालयाने आपल्या आदेशात लिहीले,

ज्या निर्दयतेने लोकांची हत्या करण्यात आली, त्या गुन्ह्यासाठी केवळ फाशीची शिक्षा पुरेशी होणारी नाही. आम्ही हे चांगलच जाणतो की, मानवी समाजाच्या भाषेत याने केलेल्या कृत्याची व्याख्याच होवू शकत नाही. कायदा देखील त्याच्या गुन्ह्यांची व्याख्या करण्यास असमर्थ आहे.

३१ मे १९६२ रोजी एडोल्फ़ आइख़मॅनला फासावर चढवण्यात आलं. त्याला जाळल्यानंतर त्याची राख देखील इस्त्रायलच्या सीमेबाहेरील समुद्रामध्ये फेकुन देण्यात आली.

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Rebel says

    Operation Finale, story copy paste 😂

Leave A Reply

Your email address will not be published.