अमरावतीची ऑलिम्पिक टीम हिटलर समोर भगवा झेंडा घेऊन उतरली होती..

आपणा सर्वांना ठाऊक आहे की शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने सुभाषचंद्र बोस यांनी हिटलरची मदत घेऊन भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडच्या विरुद्ध पूर्वेत जर्मनीची फळी उभी करायची आणि भारतातून इंग्रजांना घालवून टाकायचं स्वप्न सुभाषबाबूंनी पाहिलेलं.

पण याच्या पूर्वी असाच प्रयत्न बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराज यांनी देखील केला होता.

बडोदा हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थानापैकी एक. या संस्थानाला ब्रिटिश आमदानीत २१ तोफांचा सन्मान होता.

पण बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड हे स्वतंत्र वृत्तीचे होते. ते दूरदृष्टीचे होते. आपल्या राज्यात प्रजेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या. न्यायव्यवस्था, राजव्यवस्था सुधारली, सर्वसामान्यांना कळेल अशी सोपी बनवली. १८९२ साली प्राथमिक मोफत शिक्षणाचा कायदा केला. पहिल्यांदा शेती खाते सुरू केले. अनेक सामाजिक सुधारणा केल्या. गरजवंतांना सढळ हाताने मदत केली.

हिंदुस्थानातील अखेरचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले होते.

महाराजांच्या किर्तीमुळे देशभरातील उत्तम प्रशासक, शिक्षण तज्ज्ञ, कलावंत, साहित्यिक, शिल्पकार, गायक, नाटककार, भाषातज्ज्ञ, क्रांतिकारक बडोद्यात जमा झाले होते.

लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांच्यापासून ते महात्मा गांधीं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना सयाजी महाराजांनी मदत केली होती.

भारतीय मायभूमीला ब्रिटिशांच्या साखळदंडातून मुक्त करायचे स्वप्न महाराजांनी बाळगले होते.

सयाजीराव गायकवाड यांनी अनेक वेळा इंग्लंड, अमेरिका व युरोपमधील देशांना भेटी दिल्या होत्या. जागतिक राजकारणाकडे व त्यातील घडामोडीकडे त्यांचे बारीक लक्ष होते.  भारताला ब्रिटिशांचा शत्रू असलेल्या हिटलरची मदत होऊ शकते हे सर्वप्रथम त्यांनी ओळखले होते.

यातूनच बडोदा संस्थान आणि हिटलरची जर्मनी यांच्यात एक गोपनीय करार अस्तित्वात आला होता.

बडोदा हे ब्रिटिशांचे मांडलिक राज्य असूनही सयाजी महाराजांनी हिटलरसोबत करार करून एक महत्वाकांक्षी व तितकेच धाडसी पाऊल उचलले होते. इंग्रज सरकारला याचा देखील पत्ता नव्हता. याच कराराचे पाहिले पाऊल म्हणून सयाजीराव गायकवाड महाराज जर्मनीला गेले.

निमित्त होतं १९३६ साली बर्लिनमध्ये भरलेली ऑलिंपिक स्पर्धा.

या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात हिटलरच्या शेजारी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड बसले होते. एकेक करून वेगवेगळ्या देशाच्या टीम स्टेडियममध्ये प्रवेश करत होत्या. जर्मनीचा चान्सलर हिटलर त्यांना मानवंदना देत होता. टाळ्यांच्या गजरात भारतीय चमू ब्रिटिश युनियन जॅक घेऊन दाखल झाला. यात ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली फेमस हॉकी टीम होती.

पण या संघाव्यतिरिक्त आणखी एक भारतीय टीम बर्लिन ऑलिंपिकसाठी जर्मनीला आली होती मात्र ती बडोद्याचा भगवा झेंडा घेऊन आली होती.

ही टीम होती अमरावतीचे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ.

अमरावतीच्या अनंत वैद्य व अंबादास वैद्य यांनीं स्थापन केलेले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही एक जुनी तालीम होती. मल्लखांब, कुस्ती, कब्बडीचा प्रसार या मंडळाच्यावतीने केला जात होता. कबड्डी, मल्लखांब जागतिक स्तरावर जावं म्हणून सयाजीराव महाराजांनी त्यांना ऑलिंपिक स्पर्धेत आणलं होतं.

हिटलरने उत्सुकतेने सयाजी महाराजांना या टीम बद्दल चौकशी केली. महाराजांनी शिवछत्रपतींपासून चालत आलेले मराठ्यांचे पारंपरिक खेळ, महाराष्ट्राच्या परंपरा याची त्यांना माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी बर्लिन विद्यापीठाच्या ग्राउंडवर कबड्डीचे प्रेक्षणीय सामने भरवण्यात आले. प्रचंड गर्दी झाली. कुस्ती सारखे पहिलवान चपळाईने खेळत असलेल्या या खेळाने जर्मन लोकांना भारावून टाकले. एकूण तीन सामने झाले.

मल्लखांबच देखील थरारक प्रात्यक्षिक झालं. या सगळ्याच शूटिंग देखील करण्यात आलं.

हिटलरचा प्रसिद्धी प्रमुख गोबेल्स याने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष सिध्दनाथ काणे यांची भेट घेतली. सदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी या खेळांचा वापर कसा करता येईल याबद्दल तासभर त्यांच्या गप्पा झाल्या.

गोबेल्सने त्यांची हिटलरशी भेट घालून दिली. हिटलरने अमरावतीच्या खेळाडूंचे कौतुक केले, त्यांना मेडल्स दिली. बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांना तुमच्या टीमची व त्यांच्या खेळाची ख्याती जर्मन सैन्यातही पसरली आहे हे सांगितले.

हिटलरने सयाजीराव गायकवाड महाराजांना एका राष्ट्रप्रमुखाचा दर्जा देऊन त्या दृष्टीने बोलणी केली.

बर्लिन- बडोदा कराराने याच भेटीत मूर्त स्वरूप घेतले. महायुद्ध सुरू झाले की भारतातील इतर राजांना एकत्र करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड पुकारायचे अशी योजना होती.

सयाजी महाराजांच्या जर्मन भेटीत काही तरी काळेबेरे आहे का याची ब्रिटिश हेरांनी कसून तपास घेतला पण त्यांच्या हाती काही लागले नाही.

सयाजी महाराजांनी भारतात परतल्यावर बर्लिन बडोदा योजनेप्रमाणे कार्यवाही सुरू देखील केली होती मात्र दुर्दैवाने दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ७ फेब्रुवारी १९३९ रोजी या महान राजाचा अंत झाला आणि बर्लिन बडोदा करार बारगळला. भारतीय स्वातंत्र्याची एक धाडसी योजना स्वप्नच राहिली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.