हिटलर हरवण्यासाठी सैन्यात आलेल्या ज्यू माणसाने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं..

दुसरं महायुद्ध सुरु झालं होतं. जर्मनीमध्ये हिटलर ज्यू धर्मियांच्यावर करत असलेल्या अत्याचाराच्या गोष्टी आता जगभरात पसरू लागल्या होत्या. बोर्डिंगमध्ये राहणारा एक सतरा अठरा वर्षांचा ज्यू मुलगा रोज रेडिओवरच्या बातम्यामध्ये हे ऐकायचा.

आपला अख्खा वंश संपवायला निघालेल्या हिटलरला हरवायच म्हणून तो पेटून उठला आणि सैन्यात दाखल झाला.

नाव जॅक फर्ज राफेल जेकब. नावावरून गफलत करू नका. तो काही युरोपचा नव्हता तर तो भारतीयच होता. जन्म १९२३, कलकत्ता. जॅकचे पूर्वज अठराव्या शतकात बगदाद इराणवरून भारतात आले होते. कलकत्त्यात त्यांनी व्यापार सुरु केला आणि तिथेच सेटल झाले.

जॅकचा जन्म झाला तोवर त्यांनी प्रचंड पैसे कमवले होते. त्याच्या वडिलांचं कलकत्त्यामध्ये मोठं नाव होतं. जॅक सैन्यात जाणार म्हटल्यावर घरातून मोठा विरोध झाला. पण त्याच्या हट्टीपणामुळे अखेर घरच्यांना माघार घ्यावी लागली.

१९४२ महू इथल्या ऑफिसर्स ट्रेनिंग कँपमधून सेकण्ड लेफ्टनंट जॅक जेकब म्हणून पास आउट झाला. आपल्या देशावर तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं. भारतीय आर्मी ब्रिटिशांच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात लढत होती. जॅक जेकब यांची पहिलीच पोस्टिंग इराणला जर्मनी विरुद्धच्या वॉर फ्रंटवर झाली.

जॅक जेकब यांचं स्वप्न पूर्ण झालं. इराकच्या किर्कुक येथे त्यांनी पराक्रम गाजवला. युद्धभूमीवरच त्यांची लेफ्टनंट पदावर बढती देण्यात आली. त्यांची पुढची पोस्टिंग आफ्रिकेत ट्युनिशिया येथे केली गेली. तिथे हिटलरचा सेनापती जनरल रोमेलच्या सैन्याविरुद्ध इंग्रजांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याची ४थी इन्फन्ट्री डिव्हिजन लढत होती. रोमेलचा या युद्धात धुव्वा उडवण्यात आला.

१९४३ साली जर्मनीने आफ्रिकेत सरेंडर केलं.

जॅक जेकब यांनी यानंतर जपानविरुद्धच्या आघाडीवरही मोठी कामगिरी बजावली. महायुद्ध संपल्यावर त्यांना इंग्लड आणि अमेरिकेला आर्टिलरी ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर ते भारतात परत आले.

पण तोवर आपल्या देशाचे दोन भाग झाले होते, भारत आणि पाकिस्तान.

फाळणीमुळे सिंध व पंजाबबरोबरच बंगालच्या पूर्वेचा भाग पाकिस्तानला देऊन टाकण्यात आला होता. जॅक जेकब भारतीय सैन्यात ब्रिगेडियर झाले. १९६५च्या युद्धात त्यांच्या ब्रिगेडने राजस्थानमध्ये जबरदस्त कामगिरी केली. जॅक जेकब यांना वाळवंटातील युद्धाचा तज्ञ मानलं गेलं. त्यांनी भारतीय जवानांच्यासाठी यावर एक मॅन्युअल देखील बनवलं.

सॅम माणेकशॉ जेव्हा भारताचे लष्करप्रमुख बनले तेव्हा त्यांनी जॅक जेकब यांना ईस्टर्न कमांडचे नेतृत्व सोपवलं. हा खरं तर त्यावेळी संवेदनशील भाग होता. पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जात असलेल्या बंगालवर पाकिस्तानच्या मुख्यभूमीतून प्रचंड जुलूम केला जात होता. अनेक बांगलादेशी निर्वासितांचे लोंढे भारताच्या सीमेवरून आत घुसू लागले होते.

पाकिस्तानला अनेकदा सूचना देऊनही त्यांनी त्या कडे दुर्लक्ष केले. याचाच परिणाम भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.

माणेकशॉ यांच्या डोक्यात होतं की बांगलादेशच्या चित्तगॉन्ग, खुलना अशी गाव सुरवातीला जिंकायची. काही ऑफिसर्सचा याला विरोध होता. अखेर लेफ्टनन्ट जनरल जॅक जेकब यांनी संपूर्ण युद्धाचा वॉर प्लॅन बनवला. त्यांनी बनवलेल्या प्लॅनमध्ये थेट ढाका जिंकायची योजना बनवली होती.

पूर्व पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या ढाक्यावर चोहो बाजूनी हल्ला करायचा, राजधानी पाडून संपूर्ण बांगलादेश हातात घेण्याचा हा प्लॅन अखेर फायनल करण्यात आला. जॅक जेकब यांची योजना अवघ्या १५ दिवसांत यशस्वी झाली.

१४ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यात गव्हर्नर हाऊसवर २१ भारतीय विमानांनी हल्ला करून ते जमिनदोस्त करून टाकले. राज्यपालांना देखील एका छोट्याशा मशिदीत आश्रय घ्यायला लागला.

बंगालच्या उपसागरात पाकिस्तानी नौदलाचा सपशेल पराभव झाला होता. ढाक्याच्या बाहेर मीरपूर जवळ भारताची सेना येऊन ठेपली होती. तेव्हा तिथले फ्रंटवर असलेले मेजर गंधर्व नागरा यांनी तिथून पूर्व पाकिस्तानचे लष्कर कमांड जनरल व आपले जुने मित्र अब्दुल्ला अमीर नियाझी यांना पत्र लिहिले,

प्रिय अब्दुल्लाह, मैं यहीं पर हूं। खेल खत्म हो चुका है। मैं सलाह देता हूं कि तुम मुझे अपने आप को सौंप दो और मैं तुम्हारा ख्याल रखूंगा।

जनरल नियाझी यांनी त्यांना बोलावून घेतले. भारताने युद्ध जिंकलं होतं. आता पुढची बोलणी नेमकी कशी असणार हे ठरवण्यासाठी इंडियन आर्मी तर्फे जनरल जेकब यांना पाठवायचं ठरलं.

खास विमानातून मेजर जनरल जेकब आणि त्यांचा एक सहकारी ढाक्क्याला उतरले. त्यांच्या सोबत कोणतेही शस्त्र नव्हते. त्यांना बघून बांगलादेशी मुक्तिवाहिनीचे काही जवान धावून आले. पण जनरल जेकबनीं त्यांना ओरडून सांगितलं की मी भारतीय आर्मीकडून आलोय. त्यांना नियाझींच्या कडे नेण्यात आले.

मेजर जनरल जेकब जेव्हा नियाझीच्या घरी पोहचले तेव्हा ते आणि मेजर नागरा निवांत गप्पा मारत बसले होते. पंजाबी मधून जोक वगैरे सांगणे चालू होतं. जेकब यांनी नियाझींना तहाची बोलणी सांगितली. पाकिस्तानचे सर्व सैन्य भारतासमोर शरण आले पाहिजे असा त्यात नियम घातला होता.

ते ऐकून नियाझींच्या डोळ्यात पाणीच आलं. ते म्हणाले,

‘कौन कह रहा है कि मैं हथियार डाल रहा हूं।’

त्यांच्या सहकाऱ्यांनी या अपमानास्पद तहावर सही करू नका असं सांगितलं. पण जेकब यांनी नियाझींना तुमच्या जवळ फक्त अर्धा तास विचार करण्याचा वेळ आहे नाही तर तुमच्या कुटूंबाच्या रक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही असं सांगितलं.

नियाझी आपल्या खोलीत गेले आणि सिगार ओढत विचार करत बसले. जेकब सांगतात,

मी एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होतो पण खरं तर नियाझींकडे ढाक्यात ३० हजारांचं सैन्य होतं आणि आमच्या जवळ ३ हजार. मी देवाकडे प्रार्थना करत होतो की त्यांनी या शरणागतीवर सही करावी.

भारताचे जनरल ऑफिसर कमाण्डिंग-इन चीफ जे के अरोरा यांचं विमान अर्ध्यातासात उतरणार होतं त्याच्या आधी सगळी कारवाई पूर्ण करायची होती. थोडा वेळ गेल्यावर जेकब थेट नियाझींच्या खोलीत घुसले. त्यांच्यासमोर तो आत्मसमर्पणाचा करारनामा पडला होता. जेकब यांनी त्यांना पुन्हा विचारलं की तुमची याला संमती आहे ?

तर नियाझी फक्त रडत होते. तुमच्या शांत बसण्याला मी होकार समजतो असं म्हणत जेकब यांनी ते पत्र उचलले. ढाक्याच्या रेस कोर्सच्या ग्राउंडवर पब्लिकसमोर शरण येण्याचा कार्यक्रम होणार आहे असं सांगितलं. नियाझी यांचा या कार्यक्रमालाही नकार होता. अखेर मेजर नागरा यांनी नियाझींना या समजावलं.

“अब्दुल्ला तुम एक तलवार सरेंडर करो, “

नियाझी म्हणाले आमच्या सैन्यात तलवारीची परंपरा नाही. अखेर पिस्तूल सरेंडर करण्यावर एकमत झालं. सगळ्यांनी सरेंडर लंच केलं.

जेकब यांनी धुर्तपणा केला म्हणून पाकिस्तानी आर्मीला गुडघ्यावर यावं लागलं.

साधारण साडेचार च्या दरम्यान जनरल जेकब विमानतळावर पोहचले. अजूनही विमानतळ बांगलादेशी मुक्ती वाहिनीच्या ताब्यात होते. जेकबनी त्यांच्या नेत्याला टायगर सिद्दीकीला  विमानतळ खाली करण्यास सांगितले. तो जागचा हलला नाही. अखेर जेकब यांनी आपला लष्करी खाक्या दाखवत त्याला धमकी दिली. टायगर सिद्दीकीने आणि मुक्तिवाहिनीच्या कार्यकत्यांनी विमानतळ भारतीय लष्कराच्या हवाली केले.

जनरल जे.एफ.अरोरा यांचेकाहीच वेळात विमानतळावर आगमन झाले. त्यांना थेट रेसकोर्स मैदानात आणण्यात आले. जनरल नियाझी देखील तिथे पोहचले. दोघांनी आत्मसमर्पणाच्या करारनाम्यावर सही केली. नियाझींनी आपले सर्व बिल्ले आणि पिस्तूल काढून भारतीय सैन्याच्या हवाली केले.

दुसऱ्या महायुद्धांनंतर पहिल्यांदाच एखादा देश युद्धातला पराभव मान्य करून शरण आला होता.

पाकिस्तानचे जवळजवळ ९३ हजार सैनिक युद्धबंदी म्हणून भारताच्या ताब्यात आले होते. सहीनामा झाल्यावर बांगलादेशी जनतेने जोरदार जल्लोष केला. जनरल नियाझींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी झाली पण भारतीय लष्कराने त्यांना सुरक्षितस्थळी हलवले.

लष्करप्रमुख माणेकशॉ यांनी इंदिरा गांधींना फोन करून विजयाची बातमी दिली.

१९७१ सालचे युद्ध जिंकण्यात आणि त्यातही नियाझींना शरण आणण्यात मेजर जनरल जॅक जेकब यांचा सिंहाचा वाटा होता. पुढे त्यांना लेफ्टनंट जनरल या पदावर पदोन्नती देण्यात आली. ईस्टर्न कमांडचे ते प्रमुख म्हणून रिटायर झाले. त्यांना परम अतिविशिष्ठ सेवा मेडल देण्यात आलं.

नव्वदच्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये त्यांनी सिक्युरिटी ऍडव्हायझर म्हणून जबाबदारी पार पाडली. वाजपेयी पंतप्रधान बनल्यावर त्यांना गोव्याचे आणि नंतर पंजाबचे राज्यपाल बनवण्यात आलं. लेफ्टनंट जनरल जॅक जेकब यांच्या प्रयत्नांमुळे भारताचे इस्रायल सरकारशी संबन्ध सुधारण्यास सुरवात झाली. पुढे सरकारे बदलली तरी त्यांनी आपले काम पुढे नेले. आजही इस्रायल सरकार याबाबतीत त्यांच्याप्रती कृतज्ञ असते. २०१६ साली वयाच्या ९४ व्या वर्षी या वॉर हिरोचं वृद्धापकाळाने निधन झालं.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.