भाजपला मतदारसंघ सोडून शिंदे पोटनिवडणुकीपूर्वीच कार्यक्रम करणार आहेत.?

आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पुर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख असणार आहे, तर 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. 

याच पोटनिवडणूकीच्या निमित्ताने सुप्रिम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपाला दिलेला स्टे मागे घ्यावा म्हणून शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला होता. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाच्या कारवाईस संमती देण्यात आली. अर्थात शिवसेना कोणाची, पक्षचिन्ह कोणाचं हे सर्व प्रकरण सध्या निवडणूक आयोगाच्या दरबारी आहे. 

पोटनिवडणूकीत या वादाचा काय परिणाम असेल. 

14 ऑक्टोंबर पर्यन्त शिवसेनेच्या उमेदवारास अर्ज दाखल करावा लागेल. ठाकरे व शिंदे दोन्ही गटाकडून आपआपले उमेदवार निवडणूकीसाठी मैदानात उतरवण्यात आले तर निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण हे चिन्ह फ्रिज करण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जावू शकते.

पर्यायी या निवडणूकीत शिवसेना अधिकृत पक्षाचा उमेदवार उद्धव ठाकरेंना देता येणार नाही. मात्र यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून देखील उमेदवार द्यावा लागेल का? तर नाही. शिंदे गटाकडून उमेदवार न देता देखील उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या विरोधात पक्षचिन्ह वापरू नये म्हणून शिंदे गट निवडणूक आयोगाकडे मागणी करु शकतो. 

अशा वेळी शिवसेना पुरस्कृत किंवा ठाकरे गट या पर्यायांना घेवून उद्धव ठाकरेंना उमेदवार घोषीत करावा लागेल. सध्याच्या राजकीय समीकरणानुसार आ. रमेश लटके यांच्या पत्नी या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार असतील अस बोललं जात आहे. 

एकनाथ शिंदे कोणती खेळी करतील.. 

या मतदारसंघातून 2009 साली कॉंग्रेसच्या सुरेश शेट्टी यांचा विजय झाला होता. 2014 आणि 2019 साली रमेश लटके शिवसेनेकडून निवडणून आले होते. 2014 साली दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे सुनील यादव होते.

त्यांचा अवघ्या 5 हजार मतांनी पराभव झाला होता. तर 2019 साली दूसऱ्या क्रमांकावर अपक्ष म्हणून उमेदवार असणारे मुर्जी पटेल होते. त्यांना 45 हजार मतं मिळाली होती तर 16 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. आज मुर्जी पटेल हेच भाजपकडून उमेदवार असतील अस सांगण्यात येत आहे. 

भाजपने उमेदवार घोषीत केल्यास मुर्जी पटेल यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवता येईल. मात्र शिंदे गटाकडून उमेदवार घोषीत केल्यास ठाकरे व शिंदे या दोन्ही गटाला धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक लढावी लागेल. अशा वेळी दोन्ही उमेदवार नव्या चिन्हाने उभारतील. त्याऐवजी भाजपला मतदारसंघ सोडला तर ही निवडणूक कमळ विरुद्ध ठाकरे गट अशी होईल. ठाकरे गटाकडे चिन्ह नसेल तर ही निवडणूक उद्धव ठाकरेंना अवघड जाईल. 

Leave A Reply

Your email address will not be published.