नेहमीच चर्चेत राहणाऱ्या गोपीचंद पडळकरांचा असा आहे इतिहास..

गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या राजकारणातील असं नाव ज्यांनी एखादं वक्तव्य केलं आणि महाराष्ट्रात वाद सुरू झाला नाही, असं क्वचितच घडलं आसावं. त्यातल्या त्यात गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबियाचा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. पडळकरांनी पवार कुटुंबियावर केलेले वक्तव्य आणि त्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेला गोंधळ हे समिकरण ठरलेलं आहे. पुन्हा एकदा पडळकरांनी पवार कुटुंबाला टार्गेट करत धनगर आरक्षणावरून टीका केलीय. तसेच अजित पवारांवर बोलताना, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत” अशा शब्दात थेट हल्लाबोल केलाय. त्यामुळे आता या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे.

यावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत पडळकरांची तक्रार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. सत्ताधारी पक्षातील मित्र पक्षांच्या आमदारांचं आपआपसात पटत नसल्याचं दिसून येतंय पण, भाजप सोबत सत्तेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला केलाय म्हणून हा चर्चेचा विषय ठरलाय.

या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्र्याला घरचा आहेर देणारे गोपीचंद पडळकर कोण आहेत? ते नेहमी चर्चेत का असतात? जाणून घेऊया…

सुरवातीला पाहू गोपीचंद पडळकर कोण आहेत?

सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी सारख्या अतिशय दुष्काळी खेडेगावात १६ ऑक्टोबर १९८२ रोजी गोपीचंद पडळकर यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ब्रेन ट्यूमर सारख्या भयंकर आजाराने वडिलांचे छत्र हरपले. आई सोबत मोलमजुरी करून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे दुसरे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी दुकानदारी केली. त्यातून त्यांनी उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण करून नागज फाटा येथे  ढाबा सुरू केला. त्यातून हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली.

धनगर समाजातूनच येणाऱ्या गोपीचंद पडळकरांना सुरवातीपासुनच नेतृत्व करण्याची आवड होती. आपल्या कर्तृत्वाच्या व नेतृत्वाच्या जिवावार त्यांनी २००९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला इथुन सुरुवात झाली. गाडीच्या बोनेट वर उभं राहून आपल्या खास शैलीत भाषण देणारे गोपीचंद पडळकर हळू-हळू जनमानसात, मुख्यतः धनगर समाजात प्रसिद्ध होऊ लागले आणि रासपमधील धनगर आंदोलनातलं महत्वाचं नाव म्हणून ओळखले जाऊ लागले.

२०१४ च्या निवडणूकी आगोदर पडळकरांनी आपल्या नावाची छाप सर्वत्र सोडली होती.

त्यामुळे धनगर समाजात पडळकरांचं नाव झालं. पुढील राजकीय महत्वकांक्षा पाहता गोपिचंद पडळकर यांनी २०१४ च्या निवडणूकीत भाजपचे वारे वाहताना पाहिले व भाजपमध्ये प्रवेश केला. सांगली जिल्ह्यात २०१४ पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचीचा दबदबा होता. मोदींच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या एका जाहीर सभेत गोपीचंद पडळकरांनी सांगलीचे तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि धनगर समाजाची मतं भाजपकडे वळवून घेतली. या सभेत पडळकर म्हणाले,

 प्रतीक पाटील जत मधल्या एका सभेत म्हणाले, की धनगर समाजाला कुठे अक्कल असते, धनगर समाज आधीच खूप अडाणी आहे. अशा नेत्यांना आपण मत देणार का ?

पडळकरांच्या त्या भाषणाची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली. मोदींनीही धनगर आरक्षणाचं आश्वासन धनगर समाजाला दिलंच होतं. ते आश्वासन लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम पडळकरांनी केलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा परंपरागत धनगर मतदार भाजपकडे वळला. पुढे २०१४ ची विधानसभा निवडणूक पडळकरांनी लढवली पण ते निवडून येऊ शकले नाहीत. इथून निवडून न येण्यामागे भाजपचे खासदार संजयकाका पाटलांचा हात आहे अशी पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये यायला लागल्या आणि पडळकरांच्या पक्षांतर्गत संघर्षाला सुरुवात झाली. पडळकरांनीही माध्यमांसमोर संजयकाका पाटील आणि त्यांच्यामध्ये मतभेद असल्याचं मान्य केलं.

गोपीचंद पडळकर नेहमी का चर्चेत असतात ते जाणून घेऊ..

पडळकर पहिल्यांदा चर्चेत आले २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत.

पडळकरांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप कडून तिकिट मिळण्याच्या शक्यता मावळत आल्या होत्या त्यावेळी लगेचच त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या नव्याने उभारी घेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आणि वंचित कडून सांगली लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरले.

एका जाहीर सभेत बोलताना पडळकरांनी भाजप आणि मोदींवर जोरदार टीका केली. “भाजप सरकार आपल्याला आरक्षण देऊ शकलं नाही म्हणून आपण भाजपला मत देता कामा नये, मीच काय पण माझी आई किंवा भाऊ कुणीही भाजप मध्ये प्रवेश केला तरीही भाजपला आणि मला मत द्यायचं नाही” असं म्हणत बिरोबाची शपथ त्यांनी धनगर समाजाला घातली आणि त्यांच ते भाषण चांगलच गाजलं.

पवार आणि पडळकर वाद सुरू झाला विधानसभा निवडणूकीत,

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर वारे वाहू लागले विधानसभा निवडणूकीचे. त्या दरम्यान पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात ते उभे राहीले. त्यावेळी पडळकरांची भाजप प्रवेश सभाही चांगलीच गाजली होती.

“गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ आहेत, ते बारामतीतून लढतील आणि बारामती आपण जिंकून घेऊ”,असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सभेत जाहीर केलं.

बारामती विधानसभा अजित पवारांच्या विरोधात लढवणं सोप्पी गोष्ट नव्हती, आणि झालंही तसंच. अजित पवारांच्या विरोधात पडळकर अवघी ३० हजार २८२ मतं मिळवू शकले आणि त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. पडळकरांनी धनगर समाजाला घातलेली बिरोबाची शपथ खरी ठरली अशा चर्चा सोशल मिडियावर सुरू झाल्या त्यावेळी एक प्रकारे गोपीचंद पडळकर संपुर्ण महाराष्ट्र चर्चेत आले.

त्यानंतर शरद पवारांवर टीका करण्याचा पडळकरांनी जणूकाही सपाटाच लावला होता.

कोरोना काळात शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कोरोना आहे असं विधान करून पडळकर पुन्हा चर्चेत आले.अनेकांनी या घटनेनंतर पडळकरांवर टीकेची झोड उठवली. भाजपने ही पडळकरांच्या या विधानाचं समर्थन केलं नाही. तसेच शरद पवारांच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चेवरूनही त्यांनी चांगलच रान पेटवलं होतं.

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे.

अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यावेळीही पडळकर चांगलेच चर्चेत आले होते.

पडळकरांच्या हिट लिस्टवर पवारच आहेत हे संपुर्ण महाराष्ट्राला समजलं. असाच एक पुन्हा राडा झाला. जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होताना. शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती आणि त्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी रात्रीत ते जेजुरीत पोहचले होते. त्या वेळीही ते चांगलेच चर्चेत आले होते.

पडळकर एक राजकारणी म्हणून तर सर्वांनाच माहीत आहेत. तसेच ते एक कलाकार म्हणूनही प्रसिध्द आहेत.

२०१९ ऐन निवडणुकीच्या काळात पडळकरांनी धुमस नावाच्या पिक्चरची निर्मिती करून त्यात त्यांनी अभिनयही केला होता. पण, आचारसंहितेमुळे त्याचं प्रदर्शन थांबविण्यात आलं होतं. आपले प्रश्न आणि आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं चित्रपट हे मोठं मध्यम आहे याच विचारातून धुमस ची निर्मिती केल्याचं पडळकर सांगितलं होतं. त्यावेळीही नेत्यापासुन थेट अभिनेता म्हणूनही त्यांची चर्चा झाली होती.

गोपीचंद पडळकर एकदा आपल्या भावामुळेही चांगलेच चर्चेत आले होते. मिरज शहरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या सहाय्याने पाडली, असा आरोप भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर करण्यात आला होता. त्यावेळीही ते आपल्या भावामुळे चांगलेच चर्चेत आले होते.

गोपीचंद पडळकर चर्चेत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचे कार्यकर्ते.

गोपीचंद पडळकर यांचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. गोपिचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार तो पर्यंत  चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा करत दत्तात्रय कटरे यांनी २००६ पासून पायात चप्पल घातली नव्हती. तर नारायण पुजारी यांनी २००९ पासून चपला घातल्या नव्हत्या. मात्र, पडळकर आमदार होताच या दोघांचा सत्कार करण्यात आला. या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी देत पडळकर यांच्याकडून सन्मान करण्यात आला होता.

तसेच, पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत, तोपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही, असं २००९ मध्ये म्हणणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांना पॅशन गाडी देत सन्मान करण्यात आला होता. तेव्हाही पडळकर चांगलेच चर्चेत आले होते.

पडळकरांवर झालेला हल्ला असो किंवा एसटी कामकारांचा मुद्दा असो या सर्व घटनेत पडळकर नेहमीच चर्चेत आलेले आहेत. आता पुन्हा एकदा पडळकरांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. काही ठीकाणी त्यांच्या विरोधात आंदोलनही केली जात आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर फडणवीसांना जाब विचारला जातोय आता यावर फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण, सध्या तरी हा वाद पेटतच असल्याचा पहायला मिळत आहे.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.