रेकॉर्ड्सचं शिखर गाठूनही पाय जमिनीवर ठेवणाऱ्या गावसकरचा किस्सा…

सुनील मनोहर गावसकर. भारतीय क्रिकेटचा खऱ्या अर्थानं पहिला सुपरस्टार. वेस्ट इंडिजचे बॉलर्स म्हणजे भीती हे समीकरण जेव्हा भारतीयच काय तर जगभरातल्या बॅट्समनच्या डोक्यात फिट्ट बसलेलं, तेव्हा गावसकरनं हेल्मेट न घालता त्यांची बॉलिंग चोपून काढली. तेही त्यांच्याच होम ग्राऊंडवर.

आपल्या पदार्पणाच्या टेस्ट सिरीजमध्ये खेळताना ८ इनिंग्समध्ये ७७४ रन्स मारणं हे काय खायचं काम नाही आणि समोर वेस्ट इंडिज असलं तर गणित आणखी अवघड. पण तरीही गावसकर तुटून पडल्यासारखा खेळला आणि भावानं चार सेंच्युरीजही मारल्या. लहान चणीच्या या मुंबईच्या मुलानं त्या सिरीजमध्ये फक्त आणि फक्त कौतुक मिळवलं होतं. गावसकरकडे काय लेव्हलचं जिगर आहे, हे त्यावेळी सगळ्यांना कळून चुकलं.

पुढं जाऊन गावसकरनं रन्सची टांकसाळ उघडली. टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा १० हजार रन्स करणारा प्लेअर तोच ठरला आणि सर डॉन ब्रॅडमन यांचं २९ सेंच्युरीजचं अशक्य वाटणारं रेकॉर्डही याच सुनील गावसकरनं मोडलं.

पुढं जाऊन एका पिढीला जसा सचिन क्रीझवर आहे, तोवर आपण हरत नाही असा विश्वास वाटायचा तसं त्याकाळी गावसकरचं होतं.

त्याची बॅटिंग, संघासाठी असलेलं डेडिकेशन यासोबत एक गोष्ट आजही चाहत्यांच्या लक्षात आहे ते म्हणजे ‘लिटिल मास्टर’ गावसकरचा स्वभाव…

जाहिराती, लोकप्रियता या सगळ्याच्या बाबतीत गावसकर शिखरावर होता, पण त्याचे पाय कायम जमिनीवर राहिले ते त्याच्या कुटुंबामुळे आणि गावसकरच्या डेडिकेशनमुळे.

पहिला किस्सा गावसकर आणि त्याचे मामा माधव मंत्री यांचा

माधव मंत्री हे भारताचे माजी क्रिकेटर. गावसकरला क्रिकेटचे बाळकडू मिळाले आपल्या मामांकडूनच. त्याबद्दल तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता,

मामा-भाच्याची ही घराणेशाही मुंबईकरांसाठी आजही कौतुकाचा विषय आहे.. 

एकदा गावसकरनं एका इंटरकॉलेज मॅचमध्ये २०० रन्स मारले, ५०० रन्सची पार्टनरशिपही केली. घरी आल्यावर मामांनी विचारलं की, ‘आऊट कसा झालास ?’ गावसकरनं सांगितलं, ‘कंटाळलो होतो म्हणून उचलून बॉल मारला.’ गावसकर सोबतच्या बॅट्समननं ३०० मारले ही माहिती सुद्धा मामांनी काढून घेतली आणि मग गावसकरला सल्ला दिला की,

‘तू जर स्वतःहून असा फटका मारला नसतास, तर तुझेही ३०० रन्स झाले असते. बॉलरवर उपकार करत अशी विकेट फेकत जाऊ नकोस.’

भविष्यात गावसकर चिवट बॅट्समन म्हणून नावाजला गेला, त्यानं एकदा नांगर ठोकला की तो भल्याभल्यांना आऊट व्हायचा नाही. हे गणित कसं जमलं होतं, तर मामानं दिलेल्या सल्ल्यामुळं.

पुढचा किस्सा गावसकरच्या आई-वडिलांचा

टिपिकल ९ ते ५ जॉब करायचा असला काय किंवा वेगळी वाट चालायची असली काय, कुणालाही आपल्या घरच्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन हवं असतं. शाळेकडून खेळत असताना गावसकरच्या वडिलांनी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सांगितलं, ‘तुझ्या प्रत्येक शतकासाठी मी तुला १० रुपये देत जाईन.’

आता आपल्याला १० रुपये ही किरकोळ किंमत वाटत असली, तरी त्या जमान्यात १० रुपये म्हणजे कित्येक मध्यमवर्गीय कुटुंबांचं महिन्याचं बजेट होतं. आपल्या घरचे आपल्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून महिन्याचं बजेट हलू देतायत, ही ऍडजस्टमेंटच गावसकरला प्रेरणा देणारी ठरली.

पण फक्त वडीलच नाही तर आईनंही त्याला मोठा पाठिंबा दिला. जेव्हा गावसकरनं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केला तेव्हा त्याच्या आईनं सांगितलं की, ‘तुझ्या प्रत्येक इंटरनॅशनल रनसाठी मी तुला एक रुपया देत जाईन.’ सिरीज खेळून गावसकर घरी आला की जितके रन केले तितक्या रुपयांचं पाकीट आईकडून मिळायचं.

विशेष म्हणजे ते प्रत्येक पाकीट गावसकरनं आजही जपून ठेवलंय.

एखाद्याच्या जडणघडणीत कुटुंबाचं किती योगदान असतं आणि यश मिळालं तरी जमिनीवर पाय ठेवण्यात या गोष्टी किती महत्त्वाच्या ठरतात हेच सांगणारे हे किस्से…

संदर्भ: डेमोक्रसीज इलेव्हन, राजदीप सरदेसाई

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.