बिल्डिंग खालची भांडणं निस्तरायला, गावसकर हातात बॅट आणि सोबत पोरं घेऊन पोहोचला होता…

सुनील गावसकर म्हणजे आपल्या भारतातल्या एका पिढीचा पहिला सुपरहिरो. त्या जमान्यात भारत क्रिकेटमध्ये फार भारी वैगेरे नव्हता. भारतात एखाद दोन मॅचेस जिंकल्या तरी पोटभर कौतुक व्हायचं, तिथं परदेशात जिंकणं म्हणजे फार मोठा पराक्रम होता.

त्या काळात क्रिकेट जगतावर वेस्ट इंडिजचं राज्य होतं. विंडीजचे बॅट्समन भारी होतेच, पण त्यांचा प्राण होता तो फास्ट बॉलिंगमध्ये. विंडीजची फास्ट बॉलिंग इतकी डेडली होती की, भारताचे माजी कर्णधार नरी काँट्रॅक्टर यांना विंडीजच्याच चार्ली ग्रिफिथचा बॉल डोक्याला लागला, तेव्हा त्यांच्या डोक्यात रक्ताची गाठ निर्माण झाली आणि त्यांना पॅरालिसीसचा झटका आला, त्या दुखापतीनंतर काँट्रॅक्टर यांचं करिअरच संपुष्टात आलं.

पण वेस्ट इंडिजच्या या खुंखार तोफखान्याचा कुणी निडरपणे सामना केला असेल, तर एकच नाव डोळ्यासमोर येतं… सुनील गावसकर.

पाच-साडेपाच फूट उंची, साधीशी तब्येत आणि बिना हेल्मेटचा गावसकर या वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलर्ससमोर आपल्या पहिल्याच इंटरनॅशनल मॅचमध्ये थांबला. अनेकांना वाटलं होतं, जिथे भलेभले गंडले तिथं गावसकर काय टिकत नसतोय. पण बॉम्बे स्कुल ऑफ क्रिकेटमध्ये गिरवलेला प्रत्येक धडा गावसकरनं अप्लाय केला आणि वेस्ट इंडिजला लई हाणलं.

भारताविरुद्ध कितीही रन्स केले तरी आपण एबी डिव्हिलिअर्सवर जसा जीव ओवाळून टाकतो, अगदी तसाच वेस्ट इंडिजची जनता गावसकरवर जीव ओवाळून टाकायची. त्याच्यासाठी तिकडच्या लोकांनी पोवाडाही रचला होता.

त्रिनिदादच्या बेटांवर गावसकरांचा पोवाडा गायला जातो

पण कितीही काही म्हणलं तरी आपल्या मराठी लोकांच्या मनात गावसकरची एक इमेज सेट झालीये. पांढरी शुभ्र जर्सी, त्यावर हाफ स्वेटर, वाऱ्यामुळे मागे फिरलेले केस, टिपिकल स्टाईलमध्ये एक हात कंबरेवर ठेवलेला आणि बॅट गदेसारखी खांद्यावर घेऊन उभा असलेला त्याचा फोटो.

गावसकरचा हाच अवतार एकदा मुंबईतल्या लोकांना लाईव्ह बघायला मिळालेला, तेही मैदानावर नाही, तर भर दंगलीत वरळीच्या रस्त्यांवर.

मुंबईत दंगल उसळली होती, लोकं घराबाहेर पडतानाही विचार करायचे. गावसकरचं घर वरळीतल्या सुप्रसिद्ध ‘स्पोर्ट्सफिल्ड’ बिल्डिंगमध्ये होतं. या बिल्डिंगचं वैशिष्ट्य म्हणजे इथं भारतातले सगळे दादा क्रिकेटर लोक रहायचे.

एकनाथ सोलकर, रमाकांत देसाई, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, यजुर्वेंद्र सिंग, पॉली उम्रीगर, अजित वाडेकर आणि आठव्या मजल्यावर सुनील गावसकर अशी बहुतांश मुंबई टीम तर याच स्पोर्ट्स फिल्डमध्ये राहत होती. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या बिल्डिंगमधून सी व्ह्यू दिसायचा आणि क्रिकेटर्सची बिल्डिंग म्हणूनही बिल्डिंगही चांगलीच फेमस होती.

मात्र दंगली दरम्यान इथं एक विचित्र घटना घडली.

एका सकाळी स्पोर्ट्सफिल्डच्या समोर मोठी गर्दी जमा झालेली. दिवस तणावाचे होते, त्यामुळं गावसकरनं निरखून पाहिलं. तेव्हा दिसलं की तरुणांच्या एका घोळक्यानं एका गाडीला अडवलं होतं आणि त्या गाडीवर दगड मार, ड्रायव्हरला धमकव असे प्रकार सुरु होते.

गावसकरनं हे बघितलं आणि तो आहे त्या अवतारात बॅट घेऊन निघाला, त्यानं जाताजाता बिल्डिंगमधल्या इतर क्रिकेटर्सलाही इंटरकॉमवरुन राड्याची माहिती दिली. सगळ्यात आघाडीवर दोनच कार्यकर्ते होते, एक गावसकर आणि दुसरा एकनाथ सोलकर.

क्रिकेटच्या मैदानावर ही दोन माणसं मूर्तिमंत शांततेचा पुतळा होती. गावसकर एकाग्र झाला की कितीही तास सहज बॅटिंग करू शकायचा, दुसऱ्या बाजूला सोलकर एकदा फिल्डिंगला थांबला की विषय कट. सिली पॉईंटला थांबलेल्या सोलकरच्या हातातून कॅच सुटणं ही दुर्मिळ गोष्ट.

मात्र हे दोन गडी फुल फॉर्ममध्ये सोसायटीसमोरच्या मॅटरमध्ये पडले.

त्या गर्दीला सगळ्यात आधी सामोरा गेला, तो गावसकर. त्यानं आधी गाडीत बघितलं तर काही महिला आणि लहान पोरंही होती. त्यामुळं तो त्यांना धमकावणाऱ्या जमावासमोर गेला आणि त्यांना शांततेत आवाहन केलं. स्वतः गावसकर सांगतोय म्हणल्यावर काही जणांनी ऐकलं, पण काही कार्यकर्ते मात्र जोशातच होते.

तेव्हा गावसकर त्यांना एकच गोष्ट म्हणाला, ‘या गाडीतल्या कुटुंबासोबत जे काही करायचं असेल, ते आधी माझ्यासोबत करा.’

रिटायर झाला असला तरी गावसकर सुपरस्टार होता, मुंबईतली कित्येक पोरं त्याची बॅटिंग बघूनच लहानाची मोठी झालेली, त्यामुळं त्यांनी गावसकरचा शब्द नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण हे सगळं घडेपर्यंत तिथं बाकीचे क्रिकेटर्सही जमा झाले. कुणाच्या हातात बॅट होती, कुणाच्या हातात टेनिस रॅकेट तर कुणी डायरेक्ट मॅटर झालाय म्हणून हॉकी स्टिकच घेऊन आलं.

ज्या लोकांना आपण टीव्हीवर बघतो, ज्यांची नावं पेपरात अभिमानानं वाचतो तेच क्रिकेटर्स असल्या अवतारात भर दंगलीत रस्त्यावर दिसल्यानं लोकांची तारांबळ उडाली, गाडीतलं कुटुंब सुखरूप पुढे गेलं आणि ती जमलेली पोरंही मागं फिरली.

मैदानावर शांत, संयमी वाटणाऱ्या गावसकरनं आपल्यात फक्त वेस्ट इंडिजच्या फास्ट बॉलिंगसमोरच नाही, तर चिडलेल्या मॉब समोर थांबायचीही हिंमत आहे, हे त्यादिवशी दाखवून दिलं होतं.

गावसकर त्या कुटुंबासाठीच नाही, तर सगळ्या भारतासाठी पुन्हा एकदा हिरो ठरला होता.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.