जगाला वाटलेलं गोळीबारानंतर त्याचं क्रिकेट संपलं, त्यानं ५ शतकं मारुन दाखवली

मध्यंतरी भारताचा विकेटकिपर बॅट्समन रिषभ पंतचा अपघात झाला, त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंट्स तुटल्या आणि त्यानंतर शंका उपस्थित झाली की, पंत पुन्हा क्रिकेट खेळू शकेल का ? एखाद्या विकेटकीपरला गुडघ्याच्या सिरीयस इंज्युरीमधून कमबॅक करणं तसं अवघड असलं, तरी पंत लवकरच टीम इंडियामध्ये दिसेल अशी आशा आहे.

त्याचं कारण म्हणजे त्याची जिद्द! नुकताच पंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुबड्यांच्या सहाय्याने चालतानाचे दोन फोटो पोस्ट केलेत… त्यामुळं, तो लवकरच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसेल अशी आशा त्याचे फॅन्स करतायत.

शिवाय, याआधीही काही प्लेअर्सनं जीवघेण्या अपघातानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक केलं होतं. यातलं एक नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा प्लेअर निकोलस पुरन. ज्याचे दोन्ही पाय अपघातात जायबंदी झाले मात्र तरीही त्यानं क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केलं.

पण यापेक्षा भारी स्टोरी आहे, ती श्रीलंकेच्या थिलन समरवीराची.

पाकिस्तानमध्ये श्रीलंका व्हर्सेस पाकिस्तान टेस्ट मॅच सुरु होती. पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली आणि श्रीलंकेनं त्यांना बेक्कार चोपकाम दिलं. पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा स्कोअर झाला ६०६ रन्स. कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिल्शान या दोघांनी सेंच्युरीज मारल्या, पण सगळ्यात मोठा दंगा होता तो थिलन समरवीराचा. कारण त्यानं मारली होती डबल हंड्रेड.

पाकिस्तानची ११० वर एक विकेट पडलेली तेव्हा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला होता. त्यामुळं तिसऱ्या दिवशी दोन्ही टीम्सला चांगली संधी होती, आणखी ५०० रन्स करायचे असल्यानं पाकिस्तान टेन्शनमध्ये होतं.

श्रीलंकेची टीम बसमधून गद्दाफी स्टेडियमकडे येत होती आणि अचानक बसवर गोळीबार सुरु झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यानं श्रीलंकन टीम हादरली. जवळपास १२ दहशतवादी बसवर गोळीबार करत होते. बसमधले सगळे प्लेअर्स एकत्र आले, एकमेकांच्या अंगावर पडून गोळ्यांपासून वाचायचा प्रयत्न करत होते. दहशतवाद्यांनी फक्त ग्रेनेड आणि रॉकेट लॉन्चरचाही वापर केला.

या सगळ्यात बस ड्रायव्हरनं शिताफीनं बस बाहेर काढली आणि थेट स्टेडियममध्ये नेली. तिथं खेळाडूंना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं आणि जखमी खेळाडूंसाठी ऍम्ब्युलन्सही आली.

त्यावेळी सगळ्या प्लेअर्सच्या लक्षात आलं की थिलन समरवीराच्या आजूबाजूला सगळीकडे रक्त आहे. सगळ्यांना भीती वाटली आणि समरवीराला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

लाहोर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो डॉक्टरांना म्हणाला की, ‘मला माझे पाय हलवताही येत नाहीयेत आणि जाणवतही नाहीयेत.’ त्याच्या पायाला गोळी लागली होती, पण तरीही डॉक्टरांचं म्हणणं होतं की, ‘त्याला परत क्रिकेट खेळता येईल.’

ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं, पण समरवीराला आपण पुन्हा मैदानात उतरु शकू याबद्दल विश्वास नव्हता.

तो स्वतः विचार करायचा की, आपण यातून कधीच बाहेर पडू शकत नाही. त्याला विचित्र स्वप्न पडायची, भीती वाटायची. ऑपरेशन आणि रिहॅब झालं तरी त्याची मानसिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळं त्यानं मानसोपचार तज्ञांची मदत घेतली.

त्यांनी समरवीराला सल्ला दिला की, ‘जे घडून गेलंय त्यावर हस. हसण्यानं प्रॉब्लेम सुटेल.’ समरवीरानं हे अप्लाय केलं आणि तो या मानसिक धक्क्यातून बाहेर आला.

याचाच परिणाम म्हणजे, कुणालाच अपेक्षा नसताना समरवीरा पुन्हा मैदानात उतरला. त्यानं पुन्हा हातात बॅट धरली आणि दुखापत, मानसिक धक्का या सगळ्यावर मात करत ४ सेंच्युरीज मारल्या. 

दुखापत, गोळीबार या सगळ्याच्या पुढं जात त्यानं आपली गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली आणि स्वतःसकट सगळ्या जगासमोर प्रेरणादायी उदाहरण दिलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.