पवन खेरांना अटक, विमानतळावर आंदोलन अन् काही तासांतच जामीन! असं आहे संपुर्ण प्रकरण…

दिल्ली विमानतळावर आज सकाळी साधारण ११ वाजल्यापासून हाय व्होल्टेज पॉलिटीकल ड्रामा पाहायला मिळाला. झालं असं की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन खेरा हे दिल्ली विमानतळावरून विमानात बसून रायपूरच्या दिशेने पार्टी मीटिंगसाठी रवाना होणार होते. विमान उडण्याआधीच विमानतळावर आसाम पोलिस दाखल झाले आणि त्यांनी पवन खेरा यांना विमानातून खाली उतरवत ताब्यात घेतलं.

यानंतर मग काँग्रेसच्या नेत्यांनी विमानाजवळच बसून आंदोलनाला सुरूवात केली. विमान उडू देणार नाही वगैरे अशा घोषणा देण्यात आल्या.

त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आलं त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,

“मला विमानातून खाली का उतरवलंय हे ठाऊक नाही. मला विमानात येऊन माझं सामान तपासायचं आहे असं सांगण्यात आलं त्यावर माझ्याकडे फक्त एक हँडबॅग आहे असं मी म्हटलं. विमानातून खाली उतरल्यावर मला सांगण्यात आलं की, मी आता विमानात जाऊ शकत नाही… डीसीपी येणार आहेत. ते २० मिनीटात इथे पोहोचतील. तोपर्यंत थांबावं लागेल.”

यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच झालेल्या सुनावणीमध्ये पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी पवन खेरा आणि काँग्रेसला खडे बोल सुनावले. आम्ही तुमची सुरक्षा करत आहोत पण कोणतीही गोष्ट करण्याला एक मर्यादा असावी असं ते म्हणाले.

आता हे सगळं प्रकरण झालं, पवन खेरा यांना ताब्यात घेतलं, आंदोलन झालं, अंतरिम जामीन मंजूर झाला पण त्यांच्यावर कारवाई कोणत्या प्रकरणात झाली? त्यांना दिल्लीतून ताब्यात घेण्यासाठी आसाम पोलिस का आले? हे सगळं बघुया…

सगळ्यात आधी तर, पवन खेरांना ताब्यात का घेण्यात आलं होतं?

अदानी यांच्या हिंडनबर्ग प्रकरणाबद्दल एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केली. या प्रकरणात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात असलेल्या संबंधांबद्दलही काँग्रेसनं संशय व्यक्त केलाय.

या पत्रकार परिषदेत बोलताना पवन खेरा म्हणाले होते,

“जर नरसिम्हा राव संयुक्त संसदीय समिती बनवू शकतात,  जर अटल बिहारी वाजपेयी संयुक्त संसदीय समिती बनवू शकतात तर, नरेंद्र गौतमदास… सॉरी नरेंद्र दामोदरदास मोदी का करू शकत नाहीत ?”

त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांनी जाणून बुजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचं नाव घेताना नावात फेरबदल केला आणि त्यामुळे पवन खेरा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भाजपची मागणी होती. यासंदर्भात आसाममधल्या दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आसाम पोलिसांच्या पथकाने दिल्लीत पोहोचून पवन खेरा यांना ताब्यात घेतलं.

आसामशिवाय वाराणसी आणि लखनौ या ठिकाणीही याच प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यांच्यावर १५३-अ म्हणजे धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान या कारणास्तव विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि १५३-ब म्हणजे आरोप, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रतिकूल विधान. या कलमांखाली ही कारवाई करण्यात आली होती.

खरंतर स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनंतर खेरा यांना आसामला घेऊन जाण्याचं प्रयोजन होतं. परंतू, अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्याकडे या प्रकरणाची आजच तात्काळ सुनावणी व्हावी आणि तक्रार तीन ठिकाणी दाखल करण्यात आली असली तरी, त्या एफ आय आर एकत्र केल्या जाव्यात अशी मागणी केली होती.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड, न्यायमुर्ती एम आर शाह आणि न्यायमुत्री पी एस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने ही मागणी मान्य केली. त्यानंतर ३ वाजता ही सुनावणी सुरू झाली. जवळपास ३५ मिनीटांच्या सुनावणीनंतर पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला.

खेरा यांची बाजू मांंडताना वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले,

“पवन खेरा हे खरंच दामोदरदास आणि गौतमदास या दोन नावांमध्ये गोंधळले होते. त्यांच्याकडून चुकून गौतमदास असा उल्लेख झाला आणि ते नॅशनल मीडियावर प्रदर्शित झालं. ही केवळ एक चूक होती आणि त्यासाठी त्यांनी माफी मागितली आहे.”

दरम्यान, या सगळ्या प्रकरणाबाबत खेरा यांच्याकडून चुकून उच्चारल्या गेलेल्या विधानाचं भांडवल करत त्यांना काँग्रेसच्या बैठकीला पोहोचू न देण्याचा भाजपचा हा कट असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.