ठाकरेंना महाडमध्ये गोगावलेंच्या विरोधात पर्याय सापडलाय… स्नेहल जगताप

शिवसेनेमधून बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हळूहळू पावलं उचलायला सुरुवात केली आहेत. बारसूमध्ये अजूनही रिफायनरीविरोधात फार मोठे आंदोलन होत असल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी आंदोलकांची भेट घेऊन झाल्यावर त्यांची महाडमध्ये सभा पार पडली.

मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना सभेत चर्चा झाली ती स्नेहल जगताप यांची!

महाडच्या चांदे क्रीडांगणावर महाडचं नगराध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी स्नेहल जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप यांच्या महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे, असे दिसून येत आहे.

काँग्रेसमधून ठाकरे गटात आलेल्या स्नेहल जगताप कोण आहेत ? त्यांची राजकीय कारकीर्द काय ?

स्नेहल जगताप या महाडचे माजी नगराध्यक्ष, माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. स्नेहल जगताप यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केलं असून त्या महाडच्या नगराध्यक्षा होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे.

स्नेहल जगताप यांनी पक्षप्रवेशाची घोषणा करताना असं म्हटलं होतं, की “काँग्रेसने आम्हाला नेहमीच मान सन्मान दिला आहे, याबाबत आपली कोणतीही तक्रार वा नाराजी नाही. जो संघर्ष माणिक जगताप यांनी केला तसाच संघर्ष उद्धव ठाकरे करीत आहेत, तीच प्रेरणा घेत प्रवाहाच्या विरोधात जात मी उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय घेत आहे. महाविकास आघाडी हेच माझे घर आहे. भविष्यात सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत.”

स्नेहल जगताप यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे ?

स्नेहल जगताप यांचे वडील म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष दिवंगत माणिकराव जगताप. त्यांच्याकडे रायगड जिल्हा अध्यक्षपद होतं त्यामुळे त्यांना मानणारा एक मोठा जनसमुदाय रायगडमध्ये आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे माणिकराव जगताप यांनी युवक काँग्रेसमध्ये असल्यापासूनच आपलं नेतृत्त्वकौशल्य दाखवलं होतं. त्यांचं महाड नगरपालिकेवर १५ ते २० वर्ष वर्चस्व होतं.

रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय नेते अशी त्यांची ओळख होती. रायगड जिल्ह्यात इतर पक्षाचा प्रभाव असतानाही ते महाड-पोलादपूर या विधानसभा मतदारसंघातून २००४ मध्ये विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत माणिकराव जगताप यांचा २२ हजार मतांनी पराभव झाला होता.

स्वर्गीय माणिकराव जगताप यांनी एक टर्म आमदार म्हणून काम केल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांचा २००४ साली पराभव केला आणि महाड विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला.  भरत गोगावले मागील तीन टर्म महाड विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२१ साली अल्पशा आजाराने माणिकराव जगताप यांचं निधन झालं होतं.

महाडमधील हा मतदारसंघ शिवसेनेच्या पुढील राजकीय संघर्षात कसा महत्त्वाचा आहे, ते आता जाणून घेऊ.

महाड विधानसभा हा शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आणि गेल्या १५ वर्षांपासून आमदार असलेले भरतशेठ गोगावले यांनी शिंदेंना साथ दिल्यानंतर या ठिकाणी ठाकरे गटासाठी मोठे आव्हान उभे राहिले होते. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी महाड मतदारसंघामधून तीन वेळा विजय मिळविला.

पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर स्नेहल जगताप यांनी आपल्या वडिलांना उद्देशून सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली होती,

“महाराष्ट्रासोबत गद्दारी करणार्यांना झुकवण्यासाठी व महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर नेहमी फडकण्यासाठी आबा मी आज उध्दवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहे,आबा तुमच्या आशिर्वादा बरोबरच उध्दवसाहेबांची ही साथ आहे.आता बघू महाराष्ट्राकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाच्यात ताकत आहे”.

शिवसेनेमध्येच दोन गट पडल्यावर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या महाड मतदारसंघात शिवसेनेच्या अस्तित्वाला मोठं भगदाड पडलं. आमदार गोगावले यांना टक्कर देऊ शकेल, असा चेहरा उद्धव ठाकरेंकडे नव्हता. त्यामुळे आता स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंना भारत गोगावले यांच्या विरोधात एक मजबूत नेता सापडला आहे. शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा सामना आता महाड मतदारसंघात रंगेल.

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.