मराठी साहित्य संमेलनाला बाळासाहेबांनी साक्षात बैलबाजाराची उपमा दिली होती

मराठी भाषा आणि मराठी साहित्य यावर चर्चा घडावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने अखिल भारतीय पातळीवर दरवर्षी एका उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. आपण सर्वजण या उत्सवाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या नावाने ओळखतो. संमेलन गाजवण्यासाठी असतात असं म्हणतात बरं. पण आपली मराठी साहित्य संमेलन गाजतात ती वादामुळंच.

खर तर संमेलन आणि वाद यांचं बाळंतपण न्यायमूर्ती रानड्यांनी १८७८ मध्ये पुण्यात केल होत. तेव्हापासून ते आजपावेतो हे वाद पिढ्यानपिढ्या संमेलनाच्या पाचवीलाच पुजले गेले.

पण एका साहित्य संमेलनावर तर खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी टीकास्त्र सोडत म्हंटल होत,

साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार!!

हा किस्सा आहे १९९५ सालातला. त्यावेळी राज्यात शिवसेना आणि भाजप असं युती सरकार सत्तेत आलं होत. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावर टीका केली होती आणि वाद रंगला होता.

या वादाचं मळभ १९९७ च्या जानेवारीत नगर येथे झालेल्या ना. सं. इनामदार यांच्या संमेलनावर होत. स्वागताध्यक्ष यशवंतराव गडाखांच्या पाठिंब्याने निषेधाचा ठराव झाला. उद्घाटक गिरीश कार्नाड यांनी तर आविष्कार स्वातंत्र्यावर तडाखेबंद भाषण केले होत.

पुढे दोन वर्षांनी पुन्हा मुंबईत ही हेच घडलं.

त्यावेळी म्हणजेच १९९९ साली अखिल भारतीय साहित्य संमेलन पाच ते सात फेब्रुवारी या दिवसांत शिवतीर्थावर ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या अध्यक्षतेखाली भरणार होतं. स्वागताध्यक्ष मनोहर जोशी संमेलनाच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले होते. सुधीर जोशी यांच्यासारखे सुसंस्कृत व नेमस्त शिवसेना नेते व मंत्री संमेलनाचे संयोजन आपल्या दादर येथील सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून अतिशय नेटकेपणाने सांभाळत होते.

अध्यक्षीय भाषणात वसंत बापट यांनी आविष्कार स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केल आणि एकच भडका उडाला. मुख्य संमेलनाच्या विरोधात होणारी विद्रोही व सकल संमेलने हा आधीच वादाचा चर्चेचा विषय होता. त्यात आणि बापटांनी आगीत तेल ओतलं.

झालं…बाळासाहेब ठाकरेंनी दुसऱ्याच दिवशी

सरकारचे २५ लाख रुपये घेताना साहित्यिकांना शरम वाटली नाही का? हे आमच्यावर कशासाठी टीका करताहेत ? यांनी समाजासाठी काय केले आहे ?

अशा जबरदस्त फैरी झाडून तो सामना शिवसेना विरुद्ध साहित्यिक असाच करून टाकला.

आता एवढंच बोलून थांबतील ते ठाकरे थांबले कसले. ते पुढे म्हंटले,

सरकारी अनुदानाचे २५ लाख परत करा आणि मगच टीका करा. साहित्य संमेलन म्हणजे नुसता बैलबाजार असतो.

खरंतर, संमेलनाचे हे सरकारी अनुदान अजून मिळायचेच होते आणि त्यातही ते परत मागून ठाकरे साहित्यिकांची नव्हे तर आपल्याच पक्षाच्या सुधीर जोशींचीच गोची करीत होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या या बेछूट आणि असंस्कृत विधानांवर चहुबाजूंनी प्रचंड टीका सुरू झाली. एव्हाना संमेलनाचा शेवटचा दिवस उजाडला होता. मनोहर व सुधीर जोशी तणावाखाली होते. सगळ्या मंडपात जबरदस्त संताप खदखदत होता.

एकीकडे शिवाजी पार्क हा शिवसेनेचा बालेकिल्ला. दुसरीकडे, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे शिवसेनेचे मान्यवर नेतेच संमेलनाचे कर्तेधर्ते आणि तिसरीकडे, ठाकरे यांच्या विरोधात शेवटच्या दिवशी वेगळ्या राहुट्यांमध्ये असले तरी एकवटलेले सकल, विद्रोही आणि मुख्य संमेलनवाले.

मात्र, सगळ्या वातावरणात, मंडपात आणि हजारो साहित्यप्रेमींच्या मनात काठोकाठ साचून आलेल्या उद्वेग आणि संतापाला वसंत बापट यांनी समारोपाच्या कार्यक्रमात जे तोंड फोडले. त्याला तोड नव्हती. ते बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अक्षरश: तुटून पडले. ते म्हंटले,

तुम्ही घेणारे असताना तुम्हाला देण्याची सवय कधी लागली? आम्ही तुमच्या २५ लाखच काय, २५ कोटी असतील तरी त्यांच्यावर थुंकतो, कोणीही एखादा दांडगेश्वर आमच्या तोंडात २५ लाखांचे बूच ठोकू पाहात असला तरी, आमचा आत्मा आम्ही काही विकायला काढलेला नाही. एखाद्या हुकूमशहाने कितीही शर्थ केली तरी सामान्य माणसे त्याचा रिमोट कंट्रोल मोडून-तोडून फेकून देऊ शकतात.

याआधी शिवाजी पार्कने ठाकरेंबद्दलची इतकी कडक भाषा आधी कधीच ऐकली नव्हती.

आता तुम्हाला प्रश्न पडेल तो म्हणजे शिवसैनिक म्हणजेच मनोहर आणि सुधीर जोशी तर तिथेच होते ना ? मग हे घडलं कसं? 

तर नाही, संतापाने फुटणारी भाषणे चालू असताना मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या जोडगोळीला नेमक्या त्याचवेळी तातडीच्या कामांसाठी मंडपातून बाहेर जावे लागले होते!

बापटांच्या साऱ्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता, ती केवळ साहित्यप्रेमींची भावना नव्हती. तो प्रतिसाद हा एक मोठा राजकीय सिग्नल होता. त्याचे प्रत्यंतर महाराष्ट्रात काही महिन्यांतच आले.

अशाप्रकारे या साहित्य संमेलनात वाद निर्माण होतात, आणि काही वर्षांनी त्याचेच किस्से बनतात. पण यातून आजवर तरी कोणी अद्दल घेतली आहे अस तरी कधी झालेलं दिसलं नाही.

हे ही वाच भिडू


 

Leave A Reply

Your email address will not be published.