आपली बीसीसीआय श्रीमंत असती तर…

४८ हजार ३९०.५ कोटी. हा आकडा आहे, बीसीसीआयला आयपीएलचे ५ वर्षांसाठीचे मीडिया राईट्स विकून मिळालेल्या पैशांचा. ५ हजार ६२५ कोटी. हा आकडा आहे बीसीसीआयला गुजरात टायटन्स ही एक फ्रँचाइज विकून मिळालेल्या पैशांचा. २० कोटी. हा आकडा आहे, आयपीएल फायनल जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्सला बक्षीस म्हणून मिळालेल्या रक्कमेचा.

लय डोळे फिरवू नका, एवढं असलं तरी आपली बीसीसीआय श्रीमंत तेवढी नाही.

नाय म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आपल्या भारतात आहे, जगाच्या क्रिकेटची सूत्र भारतातनं चालतायत, पॉवरच्या बाबतीत नाद नाही ओ, पण गणित कुठं गंडतंय तर पैशात.

कसं ? तर आयपीएल फायनल आठवून बघा. मॅचचा पहिला दिवस वाया गेला तो पावसामुळं. इतका पाऊस पडला की, मॅच झालीच नाही. वेळ, पैसा वैगरे किरकोळ गोष्टी वाया गेल्या आणि मॅच सरकली पुढच्या दिवसावर.

इथं पहिली इनिंग झाली, दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि पाऊस पडला. मॅच थांबली आणि पुढच्या २०-२५ मिनिटात पाऊसही. आता पाऊस थांबल्यावर जरा २५-३० मिनिटं इकडं तिकडं धरुन मॅच सुरु झाली असती, तरी चाललं असतं पण मॅच सुरु व्हायला किती वेळ लागला तर २ तास.

आणि या दोन तासात स्क्रीनवर काय दिसलं, तर बीसीसीआयची गरीबी.

पाऊसपडल्या पडल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, पीच कव्हर करणं. मात्र बीसीसीआयकडे कव्हर्सला हॅन्डल नसल्यानं ग्राउंड्समन हातानं कव्हर्स ओढत पीचकडे घेऊन गेले. ताडपत्री टाईप कव्हरनं पीच झाकण्यात आलं. बाकीचं ग्राऊंड भिजत राहिलं आणि हे सगळं कुठं तर जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर.

पाऊस थांबल्यावर खरा सिन झाला, कव्हर्स काढताना ग्राउंड्समनकडून मिडविकेटला असणाऱ्या प्रॅक्टिस पिचवर पाणी सांडलं आणि तिथं डायरेक्ट चिखल झाला.

मग हे साचलेलं पाणी काढण्यासाठी ग्राऊंड्समननं वापरले स्पंज. ते सीटच्या खाली असतात बघा, तसले स्पंज पेंटच्या डब्ब्यात घालून पिचवर आणण्यात आले आणि त्यातून पाणी काढण्याचा प्रयत्न सुरु झाला. पाणी इतकं साठलेलं की स्पंजनं भागणार नव्हतंच, मग भुसा, माती टाकण्यात आली आणि ग्राऊंड कमी घसरगुंडी जास्त वाटायला लागली.

समजा बीसीसीआयनं सगळं मैदान कव्हर केलं असतं, समजा पिच कोरडं ठेवायला बीसीसीआयकडे हॉव्हर मशीन असतं, तर ना एवढा वेळ रिकामा गेला असता आणि ना मॅच १५ ओव्हरची खेळावी लागली असती, पण हे सगळं कधी तर बीसीसीआयकडे पैसा असता तर..

हा असला पाऊस इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पडला की काय होतं ?

तर ग्राऊंड्समन डायरेक्ट हॉव्हर मशीन घेऊन मैदानात येतात. या मशीनला चाकं नसतात, त्यामुळं ग्राऊंड खराब होत नाही. पिचला जराही धक्का लागत नाही, जितका पार्ट कव्हर करायचा आहे तितका अगदी स्मूथली करता येतो. ग्राऊंड्समनकडून चुका व्हायचा विषय नसतो आणि वारं येऊन कव्हर उडालं तर ? याचं टेन्शन पण घ्यावं लागत नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं हे हॉव्हर कव्हर आपल्याकडच्या ग्राऊंडच्या वेगवेगळ्या साईजनुसार बनवून घेतलेत.

Hover Cover for web
हे असतंय हॉव्हर कव्हर 

हा असा पाऊस भारतात पडला की काय होतं ?

तर ग्राऊंड्समन ताडपत्री घेऊन मैदानात धावतात, मग कव्हर्स काढल्यावरही मैदान सुकलं नसेल, तर कधी  हेअर ड्रायर, कधी कोळसा तर कधी स्पंज आणून ग्राऊंड सुकवलं जातं. भारतात ईडन गार्डन्स हे एकमेव ग्राउंड असं आहे जिथं, पूर्ण ग्राउंडच्या मापाचं कव्हर आहे.

coal t
चेन्नईतलं पिच सुकवायला कोळसा वापरताना

बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सब-एअर सिस्टीम आहे. या व्हॅक्युम बेस्ड सिस्टीमच्या जोरावर एका मिनिटाला १० हजार लिटर पाणी बाहेर काढता येतं. ही सिस्टीम पाऊस सुरु झाल्यावर ऍक्टिव्हेट होते, त्यामुळं कितीही जोरदार पाऊस झाला तरी १५ मिनिटात ग्राउंड पुन्हा खेळण्यासाठी रेडी होऊ शकतंय. हेच पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आऊटफिल्डचा एक थर हा रेतीचा आहे, त्यामुळं तिथंही अर्ध्या तासाच्या आत मॅच पुन्हा सुरु करता येते.

असाच रेतीचा थर मोदी स्टेडियममध्येही आहे, पण जरा जास्त पाऊस झाला, जरा कव्हर्स नीट बसली नाहीत आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर काय बघायला मिळालं तर चिखल.

आता आपली बीसीसीआय श्रीमंत असती, तर भारताच्या ग्राऊंडवरही हॉव्हर कव्हर दिसले असते, तर पावसात भिजत काम करणाऱ्या भारताच्या ग्राऊंड्समनकडेही रेनकोट्स असते, तर मॅच १५ नाही पूर्ण २० ओव्हर्सची झाली असती… पण हे सगळं कधी तर बीसीसीआय श्रीमंत असती तर…

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.