गडहिंग्लजच्या गौराबाई उभ्या महाराष्ट्रातल्या देवदासी चळवळीच्या आधारवड बनल्या.

८ वर्षांची एक मुलगी गौरा, आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असते, तितक्यात तिचे वडील येतात आणि तिला ओढत घरात घेऊन जातात. गौराच्या आईला वडील सांगतात,

“गौराला सौंदत्तीला घेऊन जाऊया.”

८ वर्षाच्या या मुलीला देवदासी केले जाते अर्थात देवाशी तिचा विवाह केला जातो. इतक्यात गावात पसरलेली प्लेगची साथ या गौराच्या घरात येते. प्लेगपासून जीव वाचवण्यासाठी उतारा म्हणून गौराचे वडील आपल्या मोठ्या मुलीला देवीला वाहण्याचा निर्णय घेतात. ८ वर्षाची तरूण पोर गौरा देवीला सोडली जाणार असते, आईचे मन हेलावते पण काहीच करता येत नाही आणि गौरा देवीला सोडली जाते.

विचार करा कशाचाच आधार नाही, किंवा सुरक्षेसारखी भानगडच नाही. अशा अवस्थेत ही ८ वर्षांची लहान मुलगी दान केली जाते. एका भयानक देवदासी परंपरेची ती बळी ठरते. तीच गौरा आज ८० वर्षांची झाली आहे. तिची ओळख आता देवदासी निर्मुलन चळवळीचा एक खंबीर आधार असणारी

डॉटर ऑफ महाराष्ट्रगौराबाई भीमा सलवादे”.

गेली ४० वर्ष देवदासी, जोगते, वाघ्या-मुरळी यांच्यासाठी झटणाऱ्या देवदासी चळवळीतील पहिल्या कार्यकर्त्या गौराबाई भीमा सलवादे या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावच्या.

१९७० च्या दशकात डॉ. बाबा आढाव यांच्या प्रेरणेने गडहिंग्लजसह सीमाभागात देवदासी प्रथा निर्मूलनाची चळवळ सुरू झाली. १९७५ साली देशातील पहिली देवदासी परिषद गडहिंग्लज येथे भरविण्यात आली. या परिषदेला मोठ्या संख्येने देवदासी महिला उपस्थित होत्या. बाबांच्या भाषणाने या महिलांना आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली. तिथे उपस्थित असलेल्या गौराबाई स्वतःहून त्यांच नेतृत्व करण्यासाठी पुढे आल्या.

त्यांच्या कार्याचे फळ म्हणूनच आज देवीला मुली सोडण्याची प्रथा बंद झाली. थोडे का असेना देवदासींना मदत म्हणून पेन्शन सुरू झाले. देवदासी प्रथाबंदीसाठी कायदादेखील झाला त्याची अजून अंमलबजावणी झाली नसली तरी  ‘गौराबाई’ मात्र ही चळवळ आजही स्वताच्या खांद्यावर घेऊन चालवत आहेत.

त्यांनी सुमारे २०० जणींना जटामुक्त केले आहे. गौराबाईनी  अलीकडेच मुस्लिम समाजातील ‘शबनम’ नामक मुलीची जट काढली आणि आपल्या घराशेजारीच एका खोलीत राहायला जागा देऊन तिला ‘आधार’ देखील दिला आहे.

गौराबाई स्वत: देवदासी असल्याने त्यांच्या मुलीने शिक्षण घेणे हे तसे समाजाला मान्य होणे शक्य नव्हते. पण कुठल्याही शाळेत न गेलेल्या गौराबाईंना शिक्षणाचे महत्व माहिती होते, त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवण्याचे ठरवले. पण देवदासीची मुलगी शिकून मोठी कशी होऊ शकते ? या मानिसकतेतल्या लोकांनी विरोध केला. हाचं विरोध थेट मारहाणी पर्यंत गेला.

देवदासीच्या मुलीने देवदासी व्हावं शिक्षण घेतल तर देवीचा कोप होईल असा रेटा समाजाने लावून धरला होता. पण देवदासी निर्मुलून चळवळीसाठी स्वत:च एक उदाहरण होण्याचा पक्का इरादा असणाऱ्या गौराबाई मात्र या विरोधाला बळी पडण शक्यच नव्हत. त्यांनी आपली मुलगी सुरेखाला आपल्यापासून लांब ठेवून शिकवल.

एकेकाळी आईचा वारसा चालवावा म्हणून देवदासी होण्यासाठी ज्या सुरेखावर तत्कालीन समाज दबाव टाकत होता तीच सुरेखा मुनीव शिक्षिका झाली. याच मुनीवबाईंची कन्या आणि गौराबाईची नात योजना मुनीव हिने देखील नुकतीच पीएच.डी. मिळविली.

१९९७ मध्ये महाराष्ट्र फौंडेशनतर्फे ‘गौराबाई’चा गौरव झाला. धारवाडच्या कन्नड आकाशवाणी केंद्रावरून आणि एका मराठी वृत्तवाहिनीवरून त्यांची मुलाखतदेखील प्रसारित झाली. ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका विद्या बाळ संपादित ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्रा’ या मुलाखतींच्या कार्यक्रमात त्यांच्याही मुलाखतीचा समावेश आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.