वडिलांच्या मृत्यूचं दुख: बाजूला सारून तो देशासाठी परत आला होता.

१९९९ सालचा क्रिकेट वर्ल्ड कप इंग्लंड मध्ये खेळला जात होता. सोळा वर्षापूर्वी याच ठिकाणी कपिल देवच्या टीमने विश्वकप उचलला होता. तीच जादू परत करून दाखवण्याची जबाबदारी अझरूद्दीनच्या टीमवर होती. आणि या टीमची पूर्ण मदार होती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरवर.

तेव्हाचा सचिन पूर्णपणे वेगळाच होता. त्याच्या बॅटिंगमध्ये एक अग्रेशन दिसायचे. फास्टर बॉलर्सना देखील तो निवांत पुढे येऊन षटकार मारायचा. अॅलन डोनाल्ड, मॅकग्रा, शेन वॉर्न असे भलभले बॉलर त्याला टरकून असायचे. तेव्हाच्या वर्ल्ड कपला भारताच मेन अस्त्र हा सचिनच होता. पण बाहेर कोणालाच माहित नव्हत की सचिनवर कोणत आभाळ कोसळलंय.

सचिन गेल्या काही दिवसापासून फिट नव्हता. त्याला पाठदुखीच्या आजाराने त्रस्त केले होते. उभे राहणे सुद्धा वेदनादायक होते. त्याला डॉक्टरांनी पाठीचे ऑपरेशन करून घेऊन क्रिकेटपासून काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. पण वर्ल्ड कप तोंडासमोर होतं. सचिनने या पाठदुखीकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. हीच त्याची चूक पुढे अनेक वर्ष त्याला सतावणार होती. याच पाठदुखीमुळे त्याला आपला गेम चेंज करावा लागणार होता.

हे झालं तंदुरुस्तीबद्दल. पण हे सोडून आणखी एक गोष्ट होती जिच टेन्शन सचिनवर होतं ते म्हणजे त्याच्या वडिलांची तब्येत. काही महिन्यांपूर्वी त्यांना हृद्यविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अक्षरशः मृत्युच्या दाढेतून ते परत आले होते. त्यांच्या अन्जीयोप्लास्टीच्या ऑपरेशन नंतर तब्येत काहीशी सुधारली होती. सचिनची बायको अंजली स्वतः त्यांची काळजी घेत होती.

प्रो.रमेश तेंडूलकर हे सचिनचे वडील. मुंबईच्या कीर्ती कॉलेजमध्ये ते मराठीचे प्राध्यापक होते. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारे रमेश तेंडूलकर हे एक भावूक कवी देखील होते. सगळ्यात धाकटा मुलगा सचिन त्यांचा खूप लाडका होता. त्याला अभ्यासात गती नव्हती पण क्रिकेटचे त्याला वेड होते. रमेश तेंडूलकरनी त्याच्यावर कधी शिक्षणाचे दडपण येऊ दिल नाही. त्याला खेळायचं प्रोत्साहन दिल. सचिन साठी ते सर्वस्व होते.

download

वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे म्हणून तो निर्धास्त झाला. त्याने परत आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. पाठदुखीमुळे त्याने ट्रेनिंगमध्ये देखील बदल केले. नेहमीच्या जड बॅटेच्या ऐवजी हलकी बॅट वापरायला सुरवात केली.

वर्ल्ड कप सुरु झाला. भारताची पहिलीच मॅच ब्रायटनमध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर झाली. यात सचिन काही चांगली कामगिरी करू शकला नाही. भारत हा सामना ४ विकेटनी हरला. पुढचा सामना चार दिवसांनी लेस्टरशायर येथे झिम्बाब्वे विरुद्ध खेळला जाणार होता. तिथल्या स्टेडियममध्ये भारतीय टीमने जोरदार प्रक्टीस सुरु केली होती. सुरवात चांगली झाली नाही म्हणून सगळे खेळाडू जास्त मेहनत घेत होते.

मॅचच्या आदल्या दिवशीच्या नेट प्रॅक्टीस नंतर सचिन रूम वर आला. तो आणि त्याचा मित्र अतुल रानडे रात्री उद्याच्या मॅचबद्दल गप्पा मारत बसले होते. अचानक त्याच्या रूमच दार कोणी तरी खटखटल. सचिनने दार उघडलं, त्याची बायको अंजली तिथे उभी होती. तीचे डोळे रडून लाल झालेले होते. शेजारी अजय जडेजा आणि रोबिनसिंगही खाली मान घालून उभे होते. त्याला ओळखलं काही तरी वाईट घडलंय.

त्याच्या वडीलांचं निधन झालं होतं.

सचिन साठी आयुष्यातला हा सर्वात मोठा धक्का होता. रात्री पहिली फ्लाईट पकडून तो वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला परतला. सकाळी रमेश तेंडुलकर यांचा मित्रपरिवार, त्यांचे विद्यार्थी, नातेवाईक असे हजारो शुभचिंतक सचिनच्या बांद्रयामधल्या साहित्यसहवास या घराबाहेर हजर होते.

इकडे भारताची झिम्बाब्वे विरुद्धची महत्वाची मॅच सुरु होती. हा सामना अटीतटीचा झाला. पण अवघ्या चार धावांनी भारताने ही मॅच गमावली. आता इथून पुढे उरलेल्या तिन्ही मॅचेस जिंकल्या नाहीत तर भारतीय टीम सुपरसिक्स पर्यंतही पोहचणार नाही हे स्पष्ट होतं. त्या दिवशी रात्री सचिनची आई त्याला म्हणाली,

“तू वर्ल्डकप खेळायला परत जा. तुझे वडील असते तर त्यांनीही तुला हेच सांगितलं असत. टीमला तुझी गरज आहे. दुख्खः साजरा करत बसायची ही वेळ नाही.”

आईचे हे शब्द ऐकून सचिनचे डोळे खाड करून उघडले. स्वतःच्या वैयक्तिक दुख्खःपेक्षा टीमच्या उपयोगी पडणे महत्वाचे होते. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून सगळ्यांना कळाल सचिन वर्ल्ड कप खेळायला परत गेला आहे.

त्याला परत आलेलं बघून त्याच्या टीममेम्बर्सनां देखील आश्चर्य वाटले. दुख्खाच आभाळ कोसळलं असतानाही सचिन पुढच्या मॅच मध्ये खेळायला उतरला. केनिया बरोबरची मॅच होती. सचिन त्या दिवशी वेगळ्याच धुंधीत खेळला. त्याच्या मनात ठाम बसलेलं आपले वडील आपला खेळ वरून पहात आहेत.

आल्या पासून त्याने चेंडूची पिटाई सुरु केली. मनातल्या सगळ्या भावना त्याने बॉलवर काढल्या होत्या. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होत होती. सगळे प्रेक्षक, फॅन्स सचिनचा या खेळीकडे सुन्न होऊन पाहत होते. बघता बघता त्याची सेन्चुरी पूर्ण झाली. त्याने आभाळाकडे बघून वडिलाना सलाम केला. 

sachin600 1463989584

भारताची इनिंग संपली तेव्हा सचिन १०१ चेंडूत १४० धावा करून नाबाद होता. तो आणि द्रविड जेव्हा पव्हेलीयनमध्ये परतत होते तेव्हा अख्खं स्टेडियम उभ राहून टाळ्या वाजवत होते. ते दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

भारताने हा सामना जिंकला. वर्ल्ड कपमध्ये आपले आव्हान जिवंत राहिले होते. सचिन या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच होता. त्याने आपली ही इनिंग वडिलाना समर्पित केली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.