एकेकाळी आपल्या कॅरम बॉलने जगाला धडकी भरवणारा मेंडीस रिटायर झालाय.

२००८ सालचा कराचीमध्ये सुरु असलेला आशिया कप फायनल, भारत विरुद्ध श्रीलंका.

श्रीलंकाने पहिले बॅटिंग करत सनथ जयसूर्याच्या १२५ रन्सच्या जोरावर २७३ बनवत भारताला २७४ चं टार्गेट दिलेलं. भारताकडून गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ओपनिंगला आले. चामिंडा वासने गंभीरला आउट करून भारताला पहिला धक्का दिला. गंभीर जाऊन रैना आला. दुसरीकडे सेहवाग आपल्या बेधडक शैलीत फटके बाजी करत होता. अवघ्या ३६ बॉलमध्ये त्याने ६० धावा बनवल्या होत्या आणि भारताचा स्कोर तेव्हा ७६/१ असा होता. अखेर कप्तान जयवर्धनेने आपल्या दहाव्याच ओव्हरला आपल्या खास स्पिनरला बॉलिंगला बोलवले.

नाही हा स्पेशल स्पिनर मुरलीधरन नव्हता. मुरली टीममध्ये होता पण जयवर्धनेने नवीन स्पिनरला बॉलिंग दिली होती.

स्पिनर आला म्हणल्यावर सेहवाग पहिल्याच बॉलला मारायला समोर आला पण बॉल चकवा देऊन किपर संगकाराच्या हातात गेला अन स्टंप आउट केलं. नंतर युवराज आला एक बॉल खेळला अन दुसऱ्याच बॉलला त्याच्या दांड्या गुल. त्यापाठोपाठ त्यानं रैना आणि रोहित शर्माही आउट केलं अन भारताची अवस्था ९७/५ अशी करून ठेवली. पुढे इरफान पठाण आणि आरपी सिंग दोघांना दोन बॉलात आउट करून त्याने त्या मॅचमध्ये ८ ओवर्समध्ये फक्त १३ रन्स देऊन ६ विकेट्स घेतल्या.

श्रीलंकेने बलाढ्य भारताला हरवून आशिया कप जिंकला. पण सगळ्या क्रिकेट जगात चर्चा सुरु होती कोण आहे हा नवीन बॉलर? त्याची विचित्र रहस्यमयी अक्शन बघून त्याला मिस्टीरियस बॉलर म्हटल जात होतं. त्याच नाव अजंता मेंडीस.

त्या आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत ‘मॅन ऑफ द सिरीज’ बनला होता. 

मेंडीसचं मुख्य अस्त्र होतं कॅरम बॉल. म्हणजे काय तर कॅरम खेळताना आपण मधल्या बोटाने जसा स्ट्राईककर मारतो तसा तो बॉल टाकायचा. तो लेग ब्रेक टाकतो का ऑफ ब्रेक. गुगली टाकतो का दुसरा हेच समोर खेळणाऱ्या बॅॅट्समनला कळायचं नाही आणि तो चक्रावून जावून त्याच नादात विकेट देऊन बसायचा. त्यामुळेच त्याला मिस्टीरीयस बॉलर म्हणल जायचं. शिवाय त्याच्या कमी असलेल्या इकॉनॉमी रेटमुळे रन्स देण्याच्याबाबतीत कंजूस बॉलर सुद्धा म्हटल जायचं.

११ मार्च १९८५ रोजी जन्माला आलेल्या अजंता मेंडीसला लहानपणापसूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. वयाच्या १३व्या वर्षापासूनच त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तो स्पिन बॉलर होता. शाळेत असतांना त्याने आपल्या शाळेच्या टीमचं नेतृत्व केलं होतं. आपल्या फिरकीच्या जादूने आपल्या शाळेच्या टीमला त्याने मोठमोठ्या मॅचेसमध्ये विजय मिळवून दिलेला, त्यामुळे तो एक उत्तम बॉलर ठरला होता.

पुढे शाळेकडून खेळत असलेल्या आर्मी विरुद्धच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी बघून प्रभावित झालेल्या श्रीलंका आर्टीलरी क्रिकेट कमेटीने त्याला आर्मी जॉईन करून आर्मीच्या क्रिकेट टीमकडून खेळण्याचे आमंत्रण दिले. त्यानेही ते स्वीकारून लगेच जॉईन झाला. कारण आठवडाभरा पूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि ५ भावंडांना एकट्याला आईला सांभाळणे कठीण झालं होतं.

त्यानंतर आर्मीमध्ये सक्रीय होऊन आर्मी टीमकडून क्रिकेट खेळू लागला. तिथंही त्याने चमकदार कामगिरी करत नॅशनल क्रिकेट टीम सिलेक्टरर्सचे लक्ष वेधून घेतले. घरगुती क्रिकेटमध्ये अवघ्या ९ मॅचेसमध्ये ६८ विकेट्स घेण्यासोबतच त्याने बरेचसे रेकॉर्ड केले होते. आणि याच जोरावर त्यानं श्रीलंकेच्या नॅशनल टीममध्ये जागा मिळवत २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पर्दापण केलं.

पर्दापणातच दर्जेदार कामगिरी केल्याने त्याला २००८ सालचा आयसीसीचा ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर’ अवाॅर्ड मिळाला होता. वनडेमध्ये वेगवान ५० विकेट्स घेण्याचा अजित आगरकरचा रेकॉर्ड मोडून आपल्या नावावर केलेला. त्याने अवघ्या २३ मॅचेस मध्ये ५० विकेट्स घेतलेल्या. लोक म्हणाले श्रीलंकेला पुढचा मुरलीधरन मिळाला. 

पण नंतर मेंडीसच्या बॉलिंगचं रहस्य जास्त काळ टिकून राहू शकल नाही. पुढच्याच वर्षी झालेल्या सिरीजमध्ये सचिन तेंडूलकरने मेंडीसच्या बॉलिंगचा भांडाफोड केला अन चांगली धुलाईही केली. मग काय साधे साधे टेक्निक न येणारे बॅट्समन देखील मेंडीसच्या कॅरम बॉलला सहज खेळू लागले. नाही म्हणायला ट्वेंटी ट्वेन्टी मध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली. २०१३च्या आयपीएलचा तो सर्वात महागडा खेळाडू होता.

त्यानंतर मात्र त्याची कारकीर्द जास्त टिकली नाही. २०१४ मध्ये त्याच्या पाठीचं मोठ ऑपरेशन झालं. त्यानंतर बॉल टाकता येण कठीण होऊन बसलं. आणि आज अचानक त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट मधून रिटायरमेंटची घोषणा  करून सगळ्यांना धक्का दिला.

यावर्षी युवराज सिंग, अंबाती रायुडू, हशिम अमला, डेल स्टेन, लसिथ मलिंगा, क्रिस गेल अशा अनेक प्लेयर्सनी क्रिकेटला निरोप घेतला. अवघ्या ३४ वर्षांच्या अजंता मेंडीसने देखील त्यांना जॉईन केलय. आत्तापर्यंत त्याने १९ टेस्टमध्ये ७०, ८७ वनडेमध्ये १५२ तर ३९ टी२० मध्ये ६६ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकन लोकं मेंडीस मध्ये दुसरा मुरलीधरन बघत होते. मात्र मेंडीसच्या अचानक रिटायरमेंटच्या घोषणेने ते केवळ एक स्वप्न राहिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.