रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर ब्राह्मण माणूस निवडणूक लढला आणि आमदारही झाला.

ब्राह्मण उमेदवार ते पण रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर उभा राहून चक्क आमदार होतो. आजही ऐकलं तर विश्वास बसत नाही ना भिडू. कारण रिपब्लिकन पक्ष बहुजनांचा अन् दिन- दलितांचा पक्ष म्हणून उद्याला आला त्यानंतर बहुजनांनीच त्याचं नेतृत्व केलं.

मग ब्राह्मण उमेदवार या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढला आणि निवडून कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं,

भूम- परांडा दोन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ होता. काँग्रेसने आमदार उभा करावा आणि जनतेनं निवडून द्यावा असं बऱ्याच काळ इथं चाललं. मात्र नंतर काँग्रेसमध्ये फुट पडली. असं असलं तरी अनेकांना भूम-परांडा हा मतदारसंघ निवडणुकीसाठी सोपा वाटायचा.

तसा हा मतदारसंघ दुष्काळी. शेती हेच जवळपास सगळ्याचं जगण्याचं साधन. या भागात तेव्हा नीट रस्ते नव्हते. भागवत मोटार सर्व्हिसेेस आणि अन् बाबूलाल शेठची गाडी बार्शी- परांडा- भूम मार्गे फुफाटा उडवत पळायची. हीच काय ती दळवळणाची साधनं होती.

सालं होतं 1972. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. शेकापने भाई उद्धवराव पाटील यांना उमेदवारी दिली. भाई उद्धवराव त्यावेळी शेकापचे राज्य पातळीवरचे नेते होते. त्यांच्या पाठीशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ऐतिहासिक अशी कामगिरी होती. शिवाय उस्मानाबाद जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता.

तर काँग्रेस पक्षाकडून अरूणोजीराव देशमुख उभे होते. तर रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर अँड. नानासाहेब उर्फ वासुदेव देशमुख उभा राहिले.

वासुदेव देशमुखांचं आडनाव जरी खानदानी मराठा वाटत असलं तरी ते ब्राम्हण माणूस. परांडा उस्मानाबादच्या न्यायालयात कोट चढवून उभा राहणारा साधा, सरळमार्गी वकील . मवाळ, शांत, पण जिद्दी. जातीचं असं पाठबळ नाही. त्यात रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर ब्राह्मण माणूस उभा. पैसा नाही की अडका नाही. अशातला सगळा प्रकार.

प्रचार सुरू झाला. भाई उद्धवराव पाटील प्रचारात आघाडीवर. ते राजकीय मुत्सद्दी, अभ्यासू शिवाय त्याचं घणाघाती वक्तृत्व. त्यामुळे सभेला गर्दी व्हायची. लोक प्रतिसाद द्यायचे. 

तर काँग्रेसच्या तिकीटावर उभा राहिलेले अरूणोजीराव चार- पाच जिपगाड्या घेऊन फिरायचे. त्यांचा आत्मविश्वास दांडगा होता. तरूण होते. दिसायला राजबिंडे, राजपुत्रासासारखी चाल. बोलणं एकदम रूबाबदार. बसायला जाईल तिथं पाट. सगळा थाटमाट. या निवडणुकीत आपणच बाजी मारणार अश्या अविर्भावात ते होते.

मात्र, या दोन्ही उमेदवारांच्या तुलनेत वासुदेव देशमुख प्रचारात मागे होते. ते सकाळी उठायचे. भाकर तुकडा सोबत घ्यायचे.

हत्तीवरून गावोगाव हिंडायचे. दोन चार कार्यकर्ते सोबत असायचे. त्यांच्या हातात निळे झेंडे. गावच्या पारावर, शेताच्या बांधावर जाऊन लोकांना भेटायचे. रात्र झाली की गाववेशीवर सभा घ्यायची. एकमेकांचा आदर ठेवून रात्रीच्या अंधारात घसा ताणू ताणू आपलं म्हणणं मांडायचे.

त्यांनी गावचं गाव पिंजून काढले. जंगजंग पछाडले. रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर ब्राह्मण माणूस निवडणूक लढवतोय हीच चर्चा गावाच्या पारावर, मंदिराच्या आवारात,शेताच्या बांधावर जास्त गाजली होती.

एकदाचा प्रचार संपला होता. लोकांनी मतदान करून आपलं मत मतपेटीत टाकलं होतं.

निकालाचा दिवस उजाडला. काँग्रेसचे अरूणोजीराव किंवा भाई उद्धवराव पाटलांपैकी कोणीतरी निवडूण येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र जनतेनॆ कौल नेमका कुणाला दिला असेल ते नेमकं सांगता येत नव्हतं. एकदाची मतमोजणी झाली. निकाल लागला. निळा गुलाल उधळत कार्यकर्ते नाचत होते. रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर एक ब्राम्हण आमदार भूम- पराड्यांच्या जनतेने निवडून दिला होता.

आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, उपक्षितांचे प्रश्न मांडले.

लोकांची कामे करणारा आमदार म्हणून त्यांनी नाव मिळवलं. भूम- परांडा भागात नेहमीच दुष्काळ पडायचा. त्यामुळे या भागातील लोकांना रोजगार द्या, पिण्याचं पाणी द्या, जनावरांना चारा द्या अश्या मागण्यांसाठी त्यांनी 40 हजार लोकांचा अभुतपुर्व अशा मोर्चा काढला होता. रोजगार हमी योजना सुरू करा अशी त्यांची अग्रही मागणी होती. ती सातत्याने त्यांनी लावून धरली होती. त्याच्या रेट्यामुळेच रोजगार हमीचा कायदा आस्तित्वात आला.

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे सर्वांना मान्य होईल हे नाव वासुदेवरावांनीच सुचवले होते.

त्यांच्या आमदारकीच्या काळातील विधानसभेतही त्यांची अनेक भाषणे गाजली. यामागे त्यांचा खूप मोठा अभ्यास होता. महाराष्ट्रात रामभाऊ म्हाळगी आणि मृणाल गोरे यांच्या नंतर सर्वात जास्त प्रश्न विधानसभेत मांडलेला, विविध विषयावर सभागृहात भाषण केलेला एकमेव आमदार म्हणून अँड. वासुदेवरावांचे नाव आजही घेतले जाते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.