इतर जिल्ह्यांना हजारो लसी आणि बीड जिल्ह्याच्या वाट्याला फक्त २० डोस, नेमका काय आहे मॅटर ?

महाराष्ट्रात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केलीये. नवीन संक्रमितांचा  दररोज हजारोंचा आकडा समोर येत असून स्मशानाबाहेर रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.  वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील कोलमडली आहे. इस्पितळात खाटांसाठी वाट बघावी लागतीये.

तर ऑक्सिजन, कोरोना लसी, रेमडेसिव्हीर सारख्या आवश्यक आरोग्य सुविधांचा सुद्धा   तुटवडा जाणवू लागलाय. अश्या परिस्थितीत लस मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातायेत.  राज्यातील बीड जिल्ह्यात सुद्धा अशीच  परिस्थितीत पाहायला मिळतिये. ज्यामुळे आता नवा वाद उभा झालाय.

बीड जिल्ह्याच्या वाट्याला अवघ्या २० कोरोना प्रतिकारक लसी 

झालं असं कि, केंद्र सरकारडून महाराष्ट्राला २ लाख लसींचा पुरवठा करण्यात आला. ज्यानंतर राज्य सरकारकडून जिल्हानिहाय लसींचं  वाटप  करण्यात आल. यात वाटपात जिल्ह्याला अवघे २० डोस मिळाले. जे जिल्ह्यातील आवशक्यतेनुसार फारच कमी आहे.

यावरून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलंय. ज्यात त्यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्णांना लागणाऱ्या  रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि लसींचा डोस पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आरोग्यमंत्र्यांना जिल्ह्यातली परिस्थिती कळवली.

पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून खेद व्यक्त केला. त्यांनी म्हंटल कि,

‘बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करतेय. मात्र, दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरोग्य मंत्री यांना विनंती आहे कि,  जातीने लक्ष घालून लस उपलब्ध करून द्यावी.

बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित 

यासोबतच पंकजा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या कि, बीडला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब असून पालकमंत्र्यांचं लक्ष कुठयं?

बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना फक्त माफियांचं हित माहीत आहे. असं म्हणत  त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला केला.

राज्य सरकारने कोव्हॅक्सिनच्या लसीच्या दुसऱ्या  डोसच्या  केलेल्या वाटपात पुणे जिल्ह्याला २४४८० डोस, कोल्हापूर ३१०४०, मुंबई १६९६० तर लातूर जिल्ह्याला २१२८० डोस देण्यात आले आहे. या आकडेवारीत सर्वात कमी डोस हे बीड जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा वाढता आलेख पाहता अवघे २०  डोस का देण्यात आले , असा प्रश्न त्यांनी उभा केला.

इतकच नव्हे तर, बीड जिल्ह्यामध्ये मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे या कोव्हिड सेंटर मध्ये जाऊन रुग्णाशी चर्चा करत होत्या, प्रशासनासोबत बैठका घेऊन माहिती गोळा करत होत्या. मग अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे कुठे आहेत असा सवालही  भाजप कार्यकर्ते सोशल मीडियातून विचारू लागल्या.

‘ताई साहेब, पूर्ण माहिती घेऊन पत्र लिहा …’ धनंजय मुंडेंनी सलग ६ ट्वीट करून दिले प्रतिउत्तर 

पंकजा मुंडे यांच्या आरोपानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील ६ वेगवेगळी ट्वीट  करत माहिती दिली. मुंडे म्हणाले कि, “अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २  लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,”

तसेच , ‘ताई साहेब,  मुख्यमंत्र्यांना व  आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र  पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केलं.

 

धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आकडेवारी नुसार बीड जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरीकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, असा त्यांचा दावा होता.

त्यांनी आपल्या दुसऱ्या एका ट्विट मध्ये दिलेल्या आकडेवारी नुसार बीड जिल्ह्यात आधीच १५७८६ कोरोना लसी स्टॉक मध्ये आहेत आणि ज्या व्यक्तींना दुसऱ्या लसीकरण करावे लागणार आहे त्या साठी अजून फक्त ४४ लसींची आवश्यकता आहे. या पैकी २० लसी शासनाने पुरवल्या असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

बीड जिल्ह्यातील  कोरोनाची परिस्थिती पहिली तर  संक्रमितांचा आकडा ३५ हजारांच्या आसपास गेला असून ७२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचं काम कोणापासूनही लपून नाही.

रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामागे  काळाबाजार जोरात सुरू आहे. अशा वेळी कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्यापेक्षा राजकारण थांबवून नागरिकांना लस व आरोग्य साधने उपलब्ध करून द्या अशी मागणी नागरिक दोन्ही पक्षांना करताना दिसत आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.