नानासाहेबांच्या खजिन्यांच रहस्य ! 

कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहलेल्या पुस्तकात उल्लेख आहे की कानपूर आणि बिठूर इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर नानासाहेब पेशवे तिथून पलायन करण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर तिथे असणाऱ्या राजवाड्यातच नानासाहेब पेशव्यांचा खजिना असण्याचा संशय ब्रिटिशांना आला.

वाड्याखाली असणाऱ्या विहीरींचा शोध घेतल्यानंतर त्यामध्ये ३० लाख रुपयांची सोन्या चांदीची नाणी, ताटे, वाट्या व भांडी, शेकडो वजनांची चांदीची अंबारी, ७० लाख रुपयांचे सोन्याचे दागिणे असा एक कोटींचा ऐवज ब्रिटींशाच्या हाती लागला.  

ही संपत्ती ब्रिटीश दप्तरी नोंद करण्यात आली. पण सांगणारे लोक सांगतात नानासाहेब पेशव्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीपैकी फक्त सोन्याचे वजन अडीच हजार टन इतके होते. काही वर्षांपुर्वी शोभन सरकार यांनी माझ्या स्वप्नात राजे आले आणि त्यांनी अडीच हजार सोने इथल्या राजवाड्याखाली असल्याचं स्वप्नात सांगितल्याचा दावा केला. खुद्द तत्कालीन राज्यमंत्री चरणदास महंत त्यांचे शिष्य असल्याने सरकारने देखील त्यांचे स्वप्न मनावर घेतले व पुरातत्त्व खात्याने त्या ठिकाणी खुदाई केली. मात्र तिथे कोळश्याशिवाय इतर काहीही हाती लागलं नाही. 

पण एक गोष्ट मात्र पक्की झाली. आजही नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याची उत्सुकता लोकांच्या मनातून गेली नाही. विशेषत: उत्तर प्रदेशात पेशवा सरकारका खजिना म्हणून हा विषय वरचेवर तोंड वर काढत असतो. काय आहे या खजिन्याचं नेमकं रहस्य? 

नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याबाबत रहस्य निर्माण होण्याच महत्वाच कारण म्हणजे त्यांचा मृत्यू. 

नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूबद्दल आजही ठामपणे कोणीही सांगत नाही. काही लोकांच्या मते नानासाहेब पेशवे हे नेपाळमध्ये पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. एका रात्रीत झालेल्या सत्ती चोरा घाट नरसंहारच्या घटनेत नानासाहेब पेशवे महाराणी मनस्विनी यांच्यासोबत नेपाळला गेले होते. महाराणी तपस्विनी या झांशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या पुतणी होत्या. नेपाळला जाण्याचा प्रमुख कारण म्हणजे इंग्रज नेपाळवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. नेपालचे प्रधान चंद्र समशेरने १८५७ च्या उठावासाठी दारूगोळा व शस्त्रांस्त्रांचा पुरवठा क्रांन्तीकारकांना केला होता.

इंग्रजांच्या विरोधात नेपाळमधून मदत मिळत असल्यामुळे नेपाळचे राजघराणे व नानासाहेबांचे संबध चांगले होते. त्याचा फायदा करुन घेण्यासाठी नानासाहेब नेपाळला गेल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यासोबत महाराणी तपस्विनी असल्याकारणाने इंग्रज नानासाहेबांचा ठावठिकाणा शोधतील म्हणून नानासाहेबांनी महाराणी तपस्विनी यांना कलकत्त्याला पाठवले. तिथेच त्यांनी महाशक्ति पाठशाला सुरू केली. १९०२ मध्ये लोकमान्य टिळकांसोबत त्यांची भेट झाल्याचे संदर्भ दिले जातात तसेच त्यांचा १९०७ मध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

मात्र त्यांच्याकडून नानासाहेब पेशवे अथवा नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूबद्दल अनेक संशय आहेत. काही जणांच्या मते ते गुजरातमध्ये रहात होते तरी काही जणांच्या मते साईबाबा हेच नानासाहेब पेशवे होते. त्यांच्या संशयास्पदरित्या गायब होण्यामुळेच त्यांनी आपल्या पाठीमागे ठेवलेल्या पेशव्यांच्या विशाल संपत्तीची उत्सुकता ताणली गेली.

एकूण अडीच हजार टन सोन्यासोबतच पुण्यातील पेशवे दफ्तरात दिलेल्या नोंदीनुसार शनिवार वाड्यातील रत्नशाळेत ५१,४०२ हिरे, ११,३५२ माणके, २७,६४३ पाचू, १,७६,०११ मोती असे मौल्यवान खडे होते. हा खजिना दूसऱ्या बाजीरावाच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांकडे आला होता. 

हा खजिना नेमका कुठे असावा या गोष्टीत अधिक इंटरेस्ट येतो तो राव राजा बक्श सिंह यांच्यामुळे. बिठूर इथल्या   दाऊदिया खेड़ा संस्थानचे ते राजे होते. त्यातही नानासाहेब पेशव्यांचे मित्र म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या खजिन्यात एक हजार टन सोनं असल्याचं सांगण्यात आलं. 

नानसाहेब पेशव्यांना पळून जाण्यासाठी त्यांनीच मदत केल्याच सांगण्यात येतं. त्यांनी दाऊदिया खेडा येथील किल्यात व मंदिराच्या तळघरात हा खजिना लपवून ठेवल्याची दंतकथा उत्तरप्रदेशात प्रसिद्ध आहे. उन्नाव परिसरात त्यांच्या खजिन्याचा शोध घेत अनेक मंदिरे पालथे घालणारे महाभाग देखील पुरातत्व खात्यांच्या अधिकाऱ्यांना सापडत असतात.  राजा राव राम बक्श यांचे वंशज शोभन सरकार यांच्या २०१३ साली दावा केला होता की राजा राव राम बक्श स्वप्नात आले होते व त्यांनी मला इथे एक हजार टन सोने असल्याचं सांगितलं आहे.

त्यानंतर पुरातत्व खात्याने खोदकाम चालू केले. पण काहीच हाती लागले नाही. नानासाहेबांचा खजिना याच ठिकाणी असल्याचं ठामपणे सांगितलं जातं पण त्यांच्या मृत्यूप्रमाणेच खजिन्याबद्दल देखील अनेक कथा इतिहासाच्या पानावर नोंद झाल्या आहेत. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.