एकेकाळचा टॉपर असूनही त्यानं असंच इंजिनियरिंगच शिक्षण मध्येच सोडून दिलं होतं

काही वर्षांपूर्वी झी वर एक सिरीयल लागायची, पवित्र रिश्ता. एकदम टिपिकल एकता कपूरची सिरीयल. पण यावेळी एकताने थोडे बदल केले होते.

एक तर नाव नेहमी प्रमाणे k ने स्टार्ट होणार नव्हतं. ही सिरीयल गुजराती पंजाबी नाही तर एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची दाखवली होती. यात बऱ्यापैकी सगळे मराठी कलाकार होते.

पण कथा, प्लॉट वगैरे सगळं खास एकताच्या स्टाईलच होतं.

फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभरात ही सिरीयल तुफान गाजली. पवित्र रिश्ता अगदी क्यो की सास भी कभी बहू थी, कसोटी जिंदगी की टाइपची सक्सेस फुल ठरली.

एकताने तिच्या बद्दलचे सगळे समज गैरसमज मोडून काढले.

मेन हिरॉईन अंकिता लोखंडे गोड होती.पण हिरो सुशांत सिंग राजपूत प्रचंड हिट होता. अगदी आपल्या आईचं, बायकोच ऐकणारा, प्रचंड सज्जन प्रामाणिक वगैरे सद्गुणांचा पुतळा असलेला मानव उर्फ सुशांत सगळ्यांना आवडला.

सुशांतसिंग राजपूत मूळचा पटना बिहारचा.

छोटयाशा शहरातुन मोठी स्वप्ने बघणाऱ्यापैकी तो एक. अभ्यासात प्रचंड हुशार होता. फिजिक्स नॅशनल ऑलम्पियाड मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. आईच्या अकाली मृत्यूनंतर त्याच कुटुंब दिल्लीला शिफ्ट झालं.

इंजिनियरिंग च्या एट्रन्स एक्झाम ( AIEEE) मध्ये तो संपूर्ण भारतात 7 वा आला होता.

दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये मेकॅनिकलसाठी प्रवेश मिळाला. दिल्लीत हे शहर अनेक संधीच द्वार उघडत. त्याच्यासाठी तसच झालं. कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करता करता त्याने शामक दावरच्या डान्स क्लास मध्ये प्रवेश घेतला.

शामकच्या डान्स ग्रुप मध्ये तो आघाडीवर असायचा.

एका फिल्म फेअर अवॉर्ड फंक्शन मध्ये त्याला नाचायची संधी मिळाली होती. हृतिकच्या धूममध्ये ही तो बॅकग्राऊंडला नाचायला होता.

लवकरच बॅकग्राऊंडवरून पुढं येण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं.

शाहरुख खानचे गुरू बॅरी जॉन यांच्या कडे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. नाटकात कामे केली. इंजिनिअरिंग जमत नव्हतं. स्वप्ने मोठी होती.

अखेर घरच्यांना कसंबसं समजावलं, इंजिनियरिंगमधून एक्झिट घेतली आणि थेट मुंबईला आला.

मुंबईत नादिरा बब्बरच्या ड्रामा ग्रुप मध्ये जॉईन झाला. दिल्लीतून फिल्मइंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला शाहरुख खान व्हायचं असतं.

स्ट्रगल सुरू झाला. थोडीशी मॉडेलिंगची कामे मिळत होती,

असंच एके दिवशी बालाजी टेलिफिल्मच्या कास्टिंग टीमपैकी कोणी तरी त्याला नादिरा बब्बरच्या नाटकात बघितलं, ऑडिशन साठी बोलावलं. त्याची किस देश में है मेरा दिल नावाच्या सिरीयलमध्ये एका छोट्या रोल साठी निवड झाली.

खरं तर टीव्ही सिरीयलमध्ये काम करणे हे काही त्यांचं स्वप्न नव्हतं.

पण खुद्द शाहरुख सुद्धा सिरीयलमध्ये काम करून मोठा झालाय हे त्याने स्वतःच्या मनाला समजावलं.

किस देश में है मेरा दिल मध्ये त्याचा रोल छोटा होता, त्यात त्याचा मृत्यू होतो अस दाखवलं गेलं होतं, पण प्रेक्षकांना सुशांत एवढा आवडला होता की त्याच अकाली जाणं त्यांना पटलं नव्हतं.

अखेर एकता कपूरने त्याला शेवटच्या एपिसोडमध्ये आत्मा बनून परत आणलं.

सुशांत ची अभिनयातील सहजता त्याला पवित्र रिश्ता पर्यंत आणून सोडली. या सिरीयलने तर टीआरपीचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले.

अंकिता आणि सुशांतची जोडी तर चांगली जमली होती, दोघांचं खऱ्या आयुष्यातही चांगलं जुळतंय अशी बातमी होती. सिरीयल जवळपास 3 वर्षे यशाच्या शिखरावर होती आणि अचानक एक दिवस बातमी आली की सुशांतसिंग राजपूतने सिरीयल सोडली.

सुशांतची एक्झिट पवित्र रिश्तासाठी सुद्धा धक्कादायक होती.

सुशांतला फिल्म मेकिंग शिकायचं होत. टीव्हीच्या छोट्या पडद्याआड स्वतःच करियर बंदिस्त करून घेणे त्याला पसंत नव्हतं. सुशांत परदेशी शिकायला गेला. इकडे अंकिता पवित्र रिश्तामध्येच अडकली होती.

अनेकांसाठी आदर्श कपल असणारे हे दोघे वेगळे झाले. हा देखील एक धक्काच होता.या त्यांच्या ब्रेक अप साठी सगळ्यांनी सुशांतला दोषी धरलं पण त्याला वेळच नव्हता. अनेक स्वप्ने त्याला खुणावत होती.

सुशांतने चेतन भगतच्या थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफवर आधारित काय पो चे मधून मोठ्या पडद्यावर झोकात एन्ट्री केली.

त्यात राजकुमार राव आणि अमित साध हे अजून दोन अभिनेते होते पण सुशांतने सादर केलेला ईशान अनेक जणांना आवडला. प्रेक्षकांच्या बरोबरच समीक्षकांनी देखील त्याच कौतुक केलं.

खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला थेट यशराज बॅनरच्या शुद्ध देसी रोमान्समध्ये सिंगल लिडिंग हिरो म्हणून रोल मिळाला.

हा सिनेमा खूप चालला नाही पण आता सुशांतची गणती आघाडीच्या हिरोंमध्ये होऊ लागली होती.

राजकुमार हिराणी आणि आमिर खानच्या पीके मध्ये अगदी छोट्या रोल मध्ये तर तो प्रचंड भाव खाऊन गेला. बॉलिवूडचा फ्युचर म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागला.

मग आला डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी. दिवाकर बनर्जीच्या या सिनेमामध्ये सुशांतच खूप कौतुक झालं, या पाठोपाठ आलेला धोनी तर त्याच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला.

सुशांत धोनी सारखा दिसत नाही, फक्त तो बिहारी आहे म्हणून त्याला घेतलंय

अशा अफवा पसरल्या होत्या. पण सुशांतने अनेकांना धक्का देत धोनी साकारून दाखवला.

मधल्या काळात राबता, सोन चिरईया वगैरे सिनेमे फ्लॉप गेले. केदारनाथकडून खुप अपेक्षा होत्या पण तोही एवढा चालला नाही. अनेकांना वाटलं बॉलिवूडमध्ये रोज येणाऱ्या हिरोच्या गळेकापू स्पर्धेत सुशांतसिंग संपला.

पण अस व्हायचं नव्हतं. सुशांतचा छिछोरे हा एक सुखद धक्का होता.

परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आत्महत्या करायचा प्रयत्न केलेल्या मुलाला आपल्या कॉलेजच्या खेळाच्या आठवणी सांगून त्याला डिप्रेशन मधूनबाहेर आणणारा हळवा बाप सुशांतने जबरदस्त रंगवला होता.

या सिनेमात एक डायलॉग आहे,

“दुसरों से हार कर लुझर केहलाने से कही ज्यादा बुरा है खुद से हारके लुझर केहलाना”

बिचारा सुशांत स्वतःच्या आयुष्यात फेल्युअरनंतरचे प्लॅन करायला विसरला. आजच त्याने त्याच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी आली.

सुशांतच हे अकाली जाणं आजही अनेकांना पटत नाहीय.  त्याने त्याच्या छोट्याशा करियर मध्ये अनेकदा आपल्याला धक्का दिला होता. पण यावेळीचा धक्का प्रचंड मोठा आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.