भारत चीन सीमेवरील सैनिक बंदुकांऐवजी लाथाबुक्यांनी का लढतात ?

डिसेंबर रोजी अरुणाचलच्या तवांगमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्याची बातमी आज आली. तशी या बातमीची दखल इंटरनॅशनल मीडियाने देखील आली आहे. 

बातम्यात उल्लेख केल्याप्रमाणे, ९ डिसेंबर रोजी तवांगमधील यंगस्टे येथे १७ हजार फूट उंचीवर असलेली भारतीय सैनिकांची चौकी हटवण्यासाठी ६०० चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडे काटेरी काठ्या आणि इलेक्ट्रिक बॅट होत्या. भारतीय सैनिकांकडे देखील काटेरी लाठ्या आणि रॉड होते, काटेरी काठ्या आणि इलेक्ट्रिक बॅटने हि चकमक झाली.  यात डझनभर चिनी सैनिकांची हाडे मोडलीत अशी माहिती मिळतेय. 

जेंव्हा जेंव्हा भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चकमक होते तेंव्हा तेंव्हा ती काठ्यांचा, दगडांचा वापर करून होते, लाथाबुक्यांनी होते. दोन्ही देशांमधील सैनिकांकडे आधुनिक शस्त्रे आहेत मात्र तुम्हाला याची माहिती नसेल कि,  दोन्ही देशांमधील सैनिकांकडे आधुनिक शस्त्रे असलात तरी इथल्या चकमकी लाथाबुक्यांनी होतात.  

यापूर्वी देखील भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चकमकींचे व्हिडीओ माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. या व्हिडीओत सैनिक एकमेकांसमोर उभा राहून एकमेकांना ढकलताना दिसत होते. काही ठिकाणी हातांचा वापर देखील केला जात नव्हता.

हल्ली गल्लीतल्या भांडणात देखील कोयत्यापासून तलवारीपर्यन्त प्रत्येक शस्त्राचा पुरेपूर वापर केला जात असताना जगातील दोन तुल्यबळ शत्रू युद्धात अशा प्रकारे हातापायांनी भांडताना पाहून बोलभिडू कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले.

साहजिक हा प्रश्न आंतरराष्ट्रीय आहे म्हणून आम्ही आमच्या “सोलापूरकर” भिडूला डिटेलमध्ये लेख द्यायला सांगितलं.

नेहमीसारखं मिलींद सोलापूरकरांनी यावर डिटेल्स माहिती दिली. तोच लेख खाली देत आहोत.

वाचा आणि समजून घ्या दोन महासत्ता हातापायांनी, लाथाबुक्यांनी का भांडतात ?

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये १५ जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात एका कर्नलसह २० जवान शहीद झाले. भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. भारत आणि चीनच्या लष्कराच्या चकमकीमध्ये प्रथमच प्राणहानी झाली आहे.

दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी आतापर्यंत झालेले तीन करारांमुळे सीमेवर तणाव असतानाही संघर्ष मर्यादितच राहिला होता. गलवान खोऱ्यातील चकमकीमध्ये तीन जवानांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दोन्ही बाजूंकडून प्रामुख्याने दगडांचाच वापर करण्यात आला. तर, चीनच्या सैन्याने सळया आणि तारा गुंडाळलेल्या बाबूंचा वापर केल्याचे सांगण्यात येते.

भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा ३४८८ किलोमीटर लांबीची असून, चीनकडून या सीमेला आक्षेप आहे. या सीमावादावर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे.

त्यामुळे, दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर गस्त घालत असताना, समोरासमोर येतात आणि अनेक वेळा चीनकडून सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये दोन्ही सैन्यामध्ये तणाव निर्माण होतो. आतापर्यंतचा अनुभव पाहिला, तर दोन्ही बाजूंकडून परस्परांना धक्काबुक्की करण्यात येते.

काही वेळाच्या तणावानंतर, लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा होते आणि त्यानंतर सैन्य माघार घेतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत आणि सीमेवरील एखाद्या संघर्षातून युद्धाचा भडका उडण्याची भीती असते. त्यामुळेच, सीमेवरच्या चकमकींमध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून शस्त्रांचा वापर करण्याचे टाळले आहे.

मध्ये चिनी सैन्याने केलेल्या गोळीबारात चार भारतीय जवान हुतात्मा झाले होते.
त्यानंतर, १५ जून रोजी पहिल्यांदाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जीवितहानी झाली आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये १९९३, १९९६ आणि २०१३ मध्ये तीन करार झाले आहेत.

यातील पहिल्या करारामध्ये तणाव निर्माण होत असेल, तर दोन्ही सैन्याने तातडीने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मागे जावे, असे म्हटले आहे. तर, १९९६ च्या करारामध्ये दोन्ही सैन्य आमनेसामने आल्यानंतरच्या परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे.

या करारानुसार,

संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही सैन्याने संयम पाळावा आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने राजनैतिक व अन्य पर्यायांचा वापर करण्याचा उल्लेख या करारात करण्यात आला आहे. या करारामध्येच, शस्त्रास्त्रांच्या वापराचाही उल्लेख करण्यात आला आहे.

कोणत्याही बाजूने पहिल्यांदा गोळीबार करू नये किंवा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरामध्ये कोणताही स्फोट करू नये, असा उल्लेख या करारात आहे.

तर, २०१३ च्या करारानंतर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये हॉटलाइन तयार करण्यात आली.
भारत आणि चीन यांच्यामध्ये १९६२ च्या युद्धानंतर तणावाच्या अनेक घटना घडल्या आहेत. भारतीय लष्कराने १९६७ मध्ये नथु ला भागामध्ये चीनच्या लष्कराला चांगलाच धडा शिकवला होता. तसेच, १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील भारतीय गस्ती पथकावर चीनने गोळीबार केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला नव्हता.

भारताने १९८७ मध्ये अरुणाचल प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यानंतर, चीनने त्याला आक्षेप घेतला होता. त्यावेळीही दोन्ही लष्कर सीमेवर आमनेसामने आले होते. मात्र, १९९३ नंतर दोन्ही बाजूंकडून तणावावर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा पर्याय आला. दोन्ही देशांचे लष्कर २०१७ मध्ये डोकलाम येथे आमनेसामने आल्यानंतर, तब्बल ७३ दिवस तणाव होता.

त्यावेळी भारतीय लष्कराने या भागातील कुमक वाढवली होती. मात्र, तेथे तैनात झालेल्या सैन्याने बंदुकीची तोंडे जमिनीच्या बाजूने केली होती.

एखाद्यावर बंदूक उगारणे, याचा अर्थ त्याच्याशी शत्रूत्व आहे, असा होतो. त्यामुळे, शत्रूत्वाऐवजी शांतता करण्याच्या धोरणातून भारतीय जवानांच्या बंदुका जमिनीच्या दिशेने होत्या.

अक्साई चीन, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशामध्ये दोन्ही बाजूंचे सैन्य आतापर्यंत अनेक वेळा समोरासमोर आले आहेत. त्यावेळी माघारीसाठी एक शिष्टाचार तयार झाला आहे. तणाव वाढत असतानाही, दोन्ही बाजूकडून परस्परांना धक्काबुक्की होते.

त्यातूनही तोडगा निघत नसेल, तर ठिय्या मांडून बसतात आणि अनेक दिवसांच्या चर्चेनंतर मार्ग काढण्यात येतात. गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर हा शिष्टाचार कायम राहणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

– मिलिंद सोलापूरकर

milind.solapurkar1985@gmail.com

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.