गुजराल यांनी संजय गांधींना सुनावलं, “मी तुझ्या आईच्या मंत्रिमंडळात आहे, तुझ्या नाही.”

२६ जून १९७५, त्या दिवशी अनेक ठिकाणी भारतात वर्तमानपत्र पोहचले नाही. कारण त्या दिवशीच्या पेपरात देशाला हलवून सोडणारी ब्रेकिंग न्यूज हेडलाईनला होती.

इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली होती.

आदल्या दिवशी मध्यरात्री इंदिरा गांधींनी ही ऐतिहासिक घोषणा केली आणि सरकारी यंत्रणानी सगळ्या मीडिया हाऊस, वृत्तसंस्थेचे वीज तोडून टाकली. येत्या काळात भारतात मीडियावर कसा दबाव असणार आहे याची ही झलक होती.

जयप्रकाश नारायण, वाजपेयी, मोरारजी देसाई या सर्व विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली होती.

स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या असणाऱ्या नेहरूंची लेक इंदिरा गांधी आणीबाणीच्या आड हुकूमशाही स्थापन करू पाहत होत्या. पण या आणीबाणीमध्ये एका तरुण नेत्याचा बोलबाला होता.

संजय गांधी.

श्रीमती इंदिरा गांधी यांचा धाकटा मुलगा. इंदिराजींचा तो वारसदार असणार हे आता पर्यंत जाहीर होते, पण आणीबाणीनंतर त्याच्या व त्याच्या यंग ब्रिगेडच्या हातात अनिर्बंध सत्ता आली.

संजय गांधीच्या डोक्यात अनेक चांगल्या कल्पना होत्या मात्र त्यांना प्रत्येक गोष्टीची गडबड होती. काही कल्पना राबवण्यासाठी त्यांनी दडपशाहीचा मार्ग अवलंबला होता.

मात्र आपल्यावर टीका होऊ नये म्हणून बातम्यांवर सेन्सॉरशिप लादण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला.

वृत्तसंस्था, पत्रकार यांच्यावर तर बंधने आली होती मात्र सरकारच्या दूरदर्शन व आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या न्यूज बुलेटिनबद्दल ते समाधानी नव्हते.

आणीबाणी सुरू होऊन अगदी काही दिवस झाले होते, पंतप्रधानांची मंत्रिमंडळ बैठक होती.

नेहमीप्रमाणे नॉर्मल कॅबिनेट मिटिंग झाली. आटोपल्यावर सगळे मंत्री बाहेर आले तेव्हा त्यांना तिथे उभे असलेले संजय गांधी दिसले.

त्यांच्या वागण्याबोलण्यातून आता आपल्याकडे सत्ता आली आहे हा दर्प जाणवत होता.

संजय गांधी यांनी नरूल हसन या शिक्षण मंत्र्यांना थाटात काही तरी आदेश दिले आणि ते माहिती प्रसारण मंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्या दिशेला वळले,

” मला दररोज बुलेटिन प्रसारित होण्यापूर्वी दाखवले गेले पाहिजे.”

आय.के. गुजराल हे तेव्हा काँग्रेसमधील जेष्ठ नेते होते. इंदिरा गांधींशी त्यांची जुनी मैत्री होती. स्वातंत्र्यलढ्यात त्यांना जेल झाली होती अशा या नेत्याला तिशीतला संजय गांधी जाब विचारत होता.

गुजराल यांनी फटक्यात त्यांना उत्तर दिले की,” हे शक्य नाही.”

बातम्या प्रसारित होण्यापूर्वी त्या पहायच्या नाहीत हे दंडक नेहरूंच्या काळापासून चालत आला होता. निष्पक्ष कोणत्याही दबावाविरहित बातम्या प्रसारित व्हाव्या हा त्या मागचा उद्देश होता. स्वतः गुजराल देखील हा दंडक पळत होते.

गुजराल यांचा आवाज एवढा मोठा होता की शेजारच्या खोलीतील इंदिरा गांधी काय झालं हे पाहायला धावत बाहेर आल्या. काय झालं याचा अंदाज घेत त्यांनी गुजराल यांना सांगितलं की,

“No. No. We will deal with it later.”

इंदिरा गांधी यांना पण गुजराल यांचा मुद्दा पटत होता. पण संजय गांधी यांचं तरुण सळसळत रक्त होतं. ते शांत राहणाऱ्यातले नव्हते.

दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता पंतप्रधान निवासमधून गुजराल यांना फोन आला की सकाळी इंदिराजींना भेटायला या. गुजराल १०- ११ च्या सुमारास तिथे पोहचले पण इंदिरा गांधी ऑफिससाठी निघून गेल्या होत्या.

गुजराल तेथून बाहेर पडत असताना परत त्यांची भेट संजय गांधी यांच्याशी झाली.

त्यांचा मूड अत्यंत खराब होता. इंदिरा गांधींच्या एका भाषणाची बातमी रेडिओच्या एका चॅनलवर दाखवली नाही यावर त्यांचा आक्षेप होता.

गुजराल यांना ते म्हणाले,

“देखीए ऐसा नहीं चलेगा.”

आता गुजराल यांचाही पारा चढला. संजय गांधींनी जेष्ठ नेत्यांशी कसे वागले पाहिजे याबद्दल खडसावून सांगितलं आणि वरून ते म्हणाले,

“मै जब तक हुं तब तक ऐसाही चलेगा. मै तुम्हारे माँ के मंत्रीमंडल में हुं, तुम्हारे नहीं”

संजय गांधी हे कोणतेही घटनात्मक पद भूषवित नसल्याने त्यांचा आदेश पाळणे मंत्र्यांना बंधनकारक नव्हते. पण पंतप्रधानांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना हे बोलण्याच धाडस कोणी करत नव्हतं.

फक्त गुजराल यांनीच ही हिंमत दाखवली.

याचा परिणाम झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना नभोवाणी खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

पण इंदिरा गांधी यांना इंद्रकुमार गुजराल यांची कार्यक्षमता, अनुभव, त्यांचा अभ्यास ठाऊक होता. त्यांनी गुजराल याना नियोजन खात्याचे मंत्री बनवले.

कोणत्याही पदासाठी आपल्या तत्वांशी तडजोड करणे गुजराल यांना जमले नाही. हाच त्यांचा सडेतोडपणा पुढे त्यांना देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत घेऊन गेला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.