किराणा दुकानापासून सुरू झालेली ‘सॅमसंग’ ड्युप्लिकेट चिनी मालाला हरवून खंबीरपणे उभी आहे

गोष्ट आहे साधारण ऐंशी वर्षांपूर्वीची.

कोरियाच्या डाएज्यू नावाच्या शहरात एका २८ वर्षांच्या तरुणाने एक किराणा स्टोअर सुरू केलं. पण त्याचा जन्म फक्त गोळ्या बिस्कीट विकण्यासाठी झाला नव्हता.

जवळच्याच एका खेड्यातील मोठ्या जमीनदार कुटुंबातील हा मुलगा ली-ब्युंग-च्युल. शिक्षणासाठी जपानच्या एका प्रथितयश विद्यापीठात ऍडमिशन घेतलं होतं पण तिथे जास्त काळ टिकला नाही. शिक्षण अर्धवट सोडून स्वतःचा धंदा सुरू करण्यासाठी कोरियाला परत आला.

सर्वप्रथम जवळच्या काही हजार रुपयांमध्ये किराणामाल विकणारे होलसेल दुकान आणि ट्रेडिंग कंपनी सुरू केली.

तारीख १ मार्च १९३८. ट्रेडिंग कंपनीच नाव ठेवलं,

सॅमसंग

SAVE 20200701 175324

सॅमसंगचा कोरियन भाषेत अर्थ होतो तीन स्टार.

घरच्यांकडून मिळालेल्या पैशातून ट्रक घेतले. कोणालाही कोरियाच्या कोणत्याही शहरात कुठेही माल पोहचवायच आहे तर सॅमसंगचे ट्रक हजर होते.

या ट्रान्सपोर्टच्या धंद्यात यश होतं. पण किराणा मालच्या ट्रेडिंगमध्ये म्हणावा तेवढा चालत नव्हता. याच मुख्य कारण म्हणजे किराण्याच्या पारंपरिक व्यवसायात स्पर्धा खूप होती.

मग न्यूडल्सची एजन्सी घेतली.

पण नफ्याचे गणित सुटत नव्हतं. एकीकडे ट्रान्सपोर्टचा बिझनेस वेगाने वाढत चालला होता. ली यांनी आपलं डोकं यात लावलं.

काहीच वर्षात कोरियाची ही पहिल्या दहा मधली कंपनी बनली होती.आता कोरियाच नाही तर परदेशातही इम्पोर्ट एक्स्पोर्ट उद्योगात त्यांनी उडी घेतली.

सॅमसंगचे ट्रक आता कोरियन नूडल्स चीनमध्ये पोहचवत होते.

पण अशातच कोरियन युद्ध सुरू झाले. उत्तर कोरिया दक्षिण कोरिया भांडणाचा सॅमसंगला खूप मोठा फटका बसला. उत्तर कोरियाच्या ली-ब्युंग-च्युल यांनी कंपनी बुसानला हलवली आणि नव्याने सुरवात केली.

चिकाटीने सामना करणाऱ्याला संकटातही यशाचा नवा मार्ग मिळत असतो अस म्हणतात. सॅमसंगच्या बाबतीतही असच घडलं.

या युद्धाच्यावेळी कम्युनिस्ट उत्तर कोरियाच्या विरोधात मदतीच्या निमित्ताने अमेरिकन सैन्य व त्यांचं साहित्य दक्षिण कोरियाच्या बुसान मध्ये येत होतं. याचा सॅमसंगच्या ट्रान्सपोर्ट उद्योगाला फायदा झाला.

सॅमसंगच क्षितिज विस्तारल. आता ती फक्त ट्रेडिंग कंपनी उरली नव्हती.

त्यांनी साखर कारखाने, लोकर बनवणारे कारखाने सुरू केले. एक विमा कंपनी सुरू केली. बांधकाम व्यवसाय, खतांचा उद्योग, वगैरे प्रत्येक गोष्टीत सॅमसंगच नाव झळकू लागलं.

साधारण 1969 साली सॅमसंगने एक क्रांतिकारी निर्णय घेतला, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा.

ली-ब्युंग-च्युल यांना खरं तर इलेक्ट्रॉनिक्समधील काहीच ज्ञान नव्हतं.

आज आपल्या कडे चिनी वस्तूंवर बंदी आणण्याची मागणी होत आहे त्या प्रमाणे कोरियामध्ये जापनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती.

ली-ब्युंग-च्युल याना एक तोषीयो नावाचा जापनीज इंजिनियर भेटला. त्याला नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवण्याची आवड होती. त्याने ली-ब्युंग-च्युल यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात उतरण्यास तयार केले.

तोषीयोच्या सान्यो या कंपनी बरोबर करार करून सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचा श्रीगणेशा केला.

सुरवातीला जपान सारख्या शत्रू राष्ट्राच्या कंपनीबरोबर कंपनी सुरू केली म्हणून ली-ब्युंग-च्युल यांच्यावर मोठी टीका करण्यात आली. पण त्यांनी खंबीरपणे तोंड देत प्रोडक्शन सुरू केलं.

सुरवातीला सेमी कंडक्टर सारख्या छोट्या गुंतागुंत नसलेल्या वस्तू बनवणारी सॅमसंग थोड्याच दिवसात ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही बनवू लागली. फ्रीज, वॉशिंग मशीन, कॅलक्युलेटर, एसी बनवू लागली.

याच काळात त्यांनी कॉम्प्युटर बनवायचा प्रयत्न केला तो यशस्वी ठरला.

१ वर्षात त्यानी स्वतःचा ६४ केबी रॅम बनवून अमेरिकेसारख्या आधुनिक देशा पेक्षा आशियाई देश खूप मागे नाहीत हे दाखवून दिलं.

फक्त कोरियाच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील लिडिंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये सॅमसंगचा समावेश झाला.

१९८७ साली सॅमसंगचे निर्माते ली-ब्युंग-च्युल यांचं निधन झालं.

याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९८८ साली सॅमसंगने आपला पहिला मोबाईल फोन बाजारात आणला होता. पण तेव्हाच्या मोटोरोलाच्या तुलनेत त्यांना खूप मागणी नव्हती.

नव्वदच्या दशकात ली-ब्युंग-च्युल यांच्या तिसऱ्या मुलाने कंपनी ताब्यात घेतली व अनेक बदल घडवून आणले. सर्वात मोठा बदल म्हणजे छोट्या छोट्या कंपन्या व वस्तू बनवण्यामध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी पुढे भविष्य असणाऱ्या वस्तूंचे डिझाइन व मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरलं.

दहा वर्षांचा प्लॅन तयार केला. जपानच्या सोनी शी टक्कर द्यायची होती.

पुढच्या दहा पंधरा वर्षांत केलेल्या मेहनतीने परिणाम आज आपण सगळेच पाहतोय. आज सॅमसंगची ओळख त्यांच्या दर्जेदार उत्पादनामुळे आहे.

मोबाईल सारख्या उपकरणात तर त्यांनी सोनीला कधीच मागे टाकले आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकन ऍप्पलला सुद्धा धूळ चारली.

चीनी सेलफोन कंपन्यानी आक्रमकपणे आपले साधा दर्जाचा माल वापरून बनवलेले स्वस्त मोबाईल मार्केटमध्ये आणले पण तरीही

जगभरात २०% लोक सॅमसंगचा फोन वापरतात व ही सर्वात मोठी मोबाईल कंपनी आहे.

एकेकाळी किराणा मालाच्या दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास आता अब्जावधी करोड रुपयांचा होऊन बसला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.