२०१४ नंतरच्या पोटनिवडणुकीतील ‘हे’ पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा आहेत का..?

मुख्य निवडणुकीनंतर काही कारणास्तव रिक्त झालेल्या जागेवरच्या पोटनिवडणुका या खरं तर कुठल्याही सत्ताधारी पक्षासाठी सहज आणि सोप्या समजल्या जातात. कारण लोकांचा कल सामान्यतः सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जाण्याची शक्यता असते. सत्ताधारी पक्षाला मतदान करून  आपल्या मतदारसंघाचा विकास साधून घेण्याची लोकांची मानसिकता त्यामागे असते. २०१४ नंतर झालेल्या पोटनिवडणुकांमधील निकालांवर नजर टाकली असता मात्र ही धारणा चुकीची ठरल्याची बघायला मिळतेय.

२०१४  सालानंतर झालेल्या एकूण २७ पोटनिवडणुकांपैकी फक्त ५ जागांवर केंद्रातील सत्ताधारी भाजपला यश मिळवता आलं असून या पाचही जागी त्यापूर्वी भाजपच्याच ताब्यात होत्या. म्हणजेच पोटनिवडणुकीत कुठलीही नवीन जागा भाजपला जिंकता आलेली नसून, आपल्या आहे त्याच जागा कायम राखण्यात भाजपने यश मिळवलंय. याउलट विरोधकांनी मात्र सत्ताधारी भाजपच्या ताब्यातील ८ जागा हिसकावून घेतल्या आहेत. यात प्रामुख्याने काँग्रेस आणि काँग्रेससह विरोधकांच्या महाआघाडीचा समावेश आहे.

२०१४ नंतर विरोधकांनी भाजपकडून हिसकावलेल्या जागा.

रतलाम-झाबुआ (मध्य प्रदेश) –

२०१४ सालानंतर सत्ताधारी भाजपला पहिला झटका बसला तो २०१५ साली झालेल्या मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी २७ प्रचार सभा घेऊन प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीत भाजपला  पराभवास सामोरे जायला लागलं. २०१४ साली या जागेवर भाजपच्या दिलीपसिंग भुरिया यांनी विजय मिळवला होता, पण त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणुक झाली. या पोटनिवडणुकीत भाजपने दिलीपसिंग भुरिया यांची मुलगी निर्मला भुरिया यांना पक्षाची उमेदवारी दिली होती. परंतु सहानुभूतीची कुठलीही लाट उपयोगी पडली नाही आणि काँग्रेसच्या कांतीलाल भुरिया यांनी निर्मला भुरिया यांचा ८२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

गुरदासपूर (पंजाब) –

२०१४ साली पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विनोद खन्ना यांनी काँग्रेसच्या प्रतापसिंग बाजवा यांचा पराभव केला होता. विनोद खन्ना यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. २०१७ साली याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सुनील कुमार जाखड यांनी भाजप आणि अकाली दलाच्या स्वर्ण सिंग सलारिया यांचा साधारणतः २ लाख मतांनी दणदणीत पराभव केला. विशेष म्हणजे २०१४ साली काँग्रेसचा जवळपास दीड लाख मतांनी पराभव झाला होता. पराभवातील हे अंतर भरून काढत काँग्रेसने जवळपास २ लाख मतांनी  विजय मिळविल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला गेला होता.

अलवर आणि अजमेर (राजस्थान) –

२०१४ साली राजस्थानातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व २५ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. अलवरमधून भाजपच्या चांद नाथ यांनी काँग्रेसच्या भवर जितेंद्र सिंग यांचा जवळपास ३ लाख मतांनी पराभव केला होता, तर अजमेरमधून सावरलाल जाट यांनी काँग्रेसच्या सचिन पायलट यांचा जवळपास १ लाख ७५ हजार मतांनी पराभव केला होता. २०१८ मध्ये या दोन्ही जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करत या जागा भाजपकडून हिसकावून घेतल्या. अलवरमधून काँग्रेसच्या करण सिंग यादव यांनी भाजपच्या जसवंत सिंग यादव यांचा जवळपास २ लाख मतांनी पराभव केला. ही २ लाखांची आघाडी मिळवताना करण सिंग यांनी २०१४ सालातील जितेंद्र सिंग यांच्या ३ लाखांनी झालेल्या पराभवाची पिछाडी भरून काढली हे विशेष. अजमेरमधून देखील काँग्रेसच्या रघू शर्मा यांनी भाजपच्या रामस्वरूप लांबा यांचा जवळपास १ लाख मतांनी पराभव केला.

गोरखपूर आणि फुलपूर आणि कैराना (उत्तर प्रदेश) –

सत्ताधारी भाजपला सर्वात मोठा धक्का बसला तो २०१८ साली झालेल्या गोरखपूर पोटनिवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर. २०१४ साली गोरखपूरमधून सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय मिळवला होता. ते १९९८ सालापासून गोराखपूरचे खासदार म्हणून निवडून येताहेत. त्यांच्यापूर्वीही १९८९ सालापासून ते १९९६ पर्यंत भाजपच्याच महंत अवैद्यनाथ यांच्याच ताब्यात हा मतदारसंघ होता. म्हणजे साधारणतः गेल्या ३० वर्षांपासून भाजपचा किल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीच्या प्रवीण कुमार निषाद यांनी भाजपच्या उपेंद्र दत्त शुक्ला यांचा पराभव करून भाजपचा हा अभेद्य गड जिंकला. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने ही जागा रिक्त झाली होती.

केशव प्रसाद मौर्य यांनी उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने फुलपूरची जागा रिकामी झाली होती. याठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत देखील समाजवादी पार्टीच्या नागेंद्र प्रताप सिंग पटेल यांनी भाजपच्या कौशलेन्द्र सिंग पटेल यांचा पराभव केला. उत्तर प्रदेश मधील पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्या दरम्यान युती झाली होती.

२०१४ साली कैराना लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चौधरी हुकुम सिंग यांनी समाजवादी पार्टीच्या नाहीद हसन यांचा जवळपास अडीच लाख मातांनी पराभव केला होता, त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. भाजपने चौधरी हुकुम सिंग यांची मुलगी मृगांका सिंग यांना पोटनिवडणुकीत पक्षाचं तिकीट दिलं होतं. पण आज लागलेल्या निकालानुसार अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सुम हसन यांनी मृगांका सिंग यांचा पराभव केला. या ठिकाणी इतर विरोधी पक्षांनी तबस्सुम हसन यांना पाठींबा दिला होता.

भंडारा-गोंदिया (महाराष्ट्र) –

२०१४ साली भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नाना पटोले यांनी सरकारविरोधातील नाराजीच्या कारणावरून आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव करत ही जागा भाजपकडून खेचून आणली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.