मुंबईच्या त्या आगीत जवळपास १३०० जण मरण पावले : इतिहासातील सर्वात मोठा स्फोट

मुंबई शहराने आजवर नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी अनेक संकटं पाहिली आहेत. कधी २६/११ चा दहशतवादी हल्ला असो, कधी २६ जुलै २००५ रोजी झालेली अतिवृष्टी असो तर कधी २००६ चा रेल्वेमध्ये घडलेला साखळी बाॅम्बस्फोट असो.

अशा सर्व आपत्तींच्या झळा मुंबई शहराला आजवर बसलेल्या आहेत.

आज तुम्हाला एक अशाच आपत्तीविषयी सांगणार आहे, जी १९४४ ला घडली होती. ज्यात जवळपास १३०० माणसांना स्वतःचा प्राण गमवावा लागला. १४ एप्रिल १९४४ हा मुंबई अग्निशमन दलातील सर्वात काळा दिवस म्हणुन नोंदवला गेला आहे. 

१९४४ साली जगभर दुस-या महायुद्धाचं सावट होतं. अशावेळेस उघडपणे दारुगोळ्याची वाहतुक करणं शक्य नव्हतं. भारत अजुनही ब्रिटिशांच्या साम्राज्याखाली होता. दोस्त राष्ट्रांचा दारुगोळा आणि इतर लढाऊ सामग्री जपान आणि जर्मनीच्या नौदलाची नजर चुकवुन आणावा लागत असे. 

यादरम्यान ‘एसएस फोर्ट स्टिकाईन’ हे मालवाहू जहाज मुंबईतील व्हिक्टोरीया बंदरात दाखल झाले.

१३९५ टन इतका दारुगोळा या जहाजात होता. या दारुगोळ्यामध्ये २३८ टन इतकी स्फोटकं, काडतुसं, सुरुंग, टार्पेडो अशी विविध प्रकारची ज्वलनशील सामग्री होती. याशिवाय लढाऊ विमानांचे सुटे भाग, कच्च्या कापसाची ८७ हजार गाठोडी, लाकूड, तेलाचे मोठाले डबे, ८९ हजार पौंड किंमतीच्या सोन्याची ३१ खोकी, अशा विविध साहित्यांनी हे जहाज भरलं होतं.

जहाजाचे कप्तान अलेक्झांडर नेस्मिथ यांनी इतका माल जहाजामध्ये भरायला उघड नकार दिला होता. पण दिवस युद्धाचे असल्याने त्यांना या सर्व मालाची वाहुतक करावीच लागली. जहाज मुंबई बंदरात येऊन दाखल झालं, तेव्हा ‘आत दारुगोळा आहे सावधान!’ असा कोणताही संकेत वा चिन्ह युद्धजन्य परिस्थितीमुळे लावण्यात आलं नव्हतं. 

१४ एप्रिल १९४४ हा दिवस उजाडला.

या दिवसात भीषण काहीतरी घडणार आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. दुपारी दोन वाजता जहाजातील दारुगोळ्याने अचानक पेट घेतला. अकस्मात ओढवलेल्या या घटनेमुळे जहाजावरचे कर्मचारी गांगरुन गेले. त्यांच्या परिने त्यांनी आग विझवायचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले. आगीच्या ज्वाळा वाढतच होत्या. अग्निशमन दलाला बोलावण्यात आले परंतु तोवर उशीर झाला होता. 

दारुगोळ्याचे स्फोट होत होते. आग वेगाने पसरत होती. जहाजावर असलेल्या कापसाने पेट घेऊन आसपासच्या सुमारे ११ जहाजांना नुकसान पोहचवले. दारुगोळ्याचा भयंकर स्फोट होऊन सोन्याची खोकी हवेत उडाली.

सोन्याचा एक खोका तर इतक्या लांब उडाला की थेट गिरगावच्या एका चाळीच्या घराचं छप्पर फोडुन खोका घराच्या आत आला. पुढे घरातल्या प्रामाणिक माणसाने ते सोनं सरकारदरबारी जमा केलं. 

इतकं सर्व होत होतं, म्हणजे भिडूंनो तुम्ही विचार करा, आग पसरण्याचा वेग किती जास्त असेल. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न करत होते परंतु आग नियंत्रणाबाहेर गेली होती.

गोदीच्या आजुबाजुचा ८०० मीटरवरील सर्व परिसर बेचिराख झाला. १२ किमीवरील परिसरात जी घरं होती, त्या घराच्या खिडक्यांची तावदानं फुटली. या महाकाय आगीत जवळपास १३०० लोकं मरण पावली. अग्निशमन दलातील ७१ जणांचा सुद्धा या आगीत मृत्यु झाला. आसपासच्या परिसरातील ८० हजारांहून अधिक माणसं बेघर झाले. 

मुंबईत पुढचे तीन दिवस हि आग धुमसत होती. आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की अलिबाग आणि पेणच्या डोंगरांवरुन या ज्वाळांचा धूर दिसत होता. 

जहाजावरील कापसाची गाठोडी पेट घेऊन, आकाशात उडून शहरातील विविध भागात हि गाठोडी कोसळली. त्यामुळे अनेकांना आकाशातुन अग्निवर्षाव होत असल्याचा भास झाला.

ज्या जहाजावर हि सगळी विध्वंसक घटना घडली त्या जहाजाच्या पंख्याचा एक तुकडा नजीकच्या सेन्ट झेव्हियर्स शाळेत पडला. आजही त्या शाळेत हा तुकडा जपुन ठेवला आहे. 

तेव्हा मुंबईची लोकसंख्या कमी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली नाही. या आगीनंतर मुंबईचं रुप थोडंफार का होईना बदललं.

पुढचे तीन दिवस या आगीच्या झळा सर्वांना बसल्या. मुंबई अग्निशमन दलाने अखेर आगीवर नियंत्रण मिळवले पण १४ एप्रिल १९४४ हा दिवस अग्निशमन दलाच्या इतिहासात काळा दिवस म्हणुन नमुद केला गेला. 

  •  भिडू देवेंद्र जाधव 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.