आणिबाणीच्या निमित्ताने इंदिरा गांधींनी जयपुरचा खजिना लुटला होता का..?

तीन एक वर्षांपूर्वी बादशाहो नावाचा पिक्चर आलेला. गायत्रीदेवींच्या कथित खजिन्यावरच हा सिनेमा होता. पण हल्ली पिक्चरमध्ये तर कुठं काय खरं दाखवण्यात येतं. त्यामुळे पिक्चर बघुन गोष्ट सांगण्याचा काही उपयोग नाही. आपण खरं काय झालेलं त्या विषयावर बोलू…

तर या विषयावर पिक्चर आलेला यावरून एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की, खजिना आणि त्यावर खरच इंदिरा गांधींनी डल्ला मारला अशा गोष्टींची चर्चा आजही होते. आजही हा विषय संपलेला नाही हे खरं. म्हणूनच म्हणलं बोलभिडूच्या माध्यमातून नेमका प्रकार काय होता ते तुम्हाला सांगावं,

तर ही गोष्ट लय लय जुनी आहे. जयपुरच्या राजघराण्याची ही गोष्ट.

जयपुर जवळ असणारा जयगड किल्ला ही राजघराण्याची मालमत्ता. राजा जयसिंह यांने १७२६ मध्ये हा किल्ला बांधला. अकबर बादशाहच्या दरबारी सेनापती असणाऱ्या राजा मानसिंह प्रथम यांनी अकबराच्या सांगण्यावर अफगाणिस्तानवर आक्रमण केलं होतं. या आक्रमणानंतर मानसिंह प्रथम याला मोठ्ठ घबाड सापडलं होतं. त्याने ही अगणित संपत्ती अकबर बादशाच्या दरबारात “पेश” न करता स्वत:जवळ ठेवल्यांच्या दंतकथा प्रसिद्ध आहे.

आत्ता मुळात हा मुद्दा आहे की जो खजिना सांगितला गेला तो खरच राजा मानसिंह याला अफगाणस्वारीत मिळाला होता की नाही हेच एक गुढ आहे.

तरिही अमाप खजिना होता अस आपण मान्य करुनच चालू.

तर ही अमाप संपत्ती त्यांनी जयगड किल्ल्यांच्या बांधणीनंतर तिथे असणाऱ्या मोठमोठ्या टाक्यांमध्ये लपवून ठेवल्याचं सांगण्यात येतं. आत्ता १७२६ मधली ही गोष्ट पण त्याची चर्चा दोनशे वर्ष होऊन गेल्यानंतर देखील चालूच होती.

आत्ता थेट इंदिरा गांधींच पर्व.

या काळात देखील जयपुरच्या राजघराण्याच्या या खजिन्याची चर्चा व्हायची. इंदिरा गांधींच्या काळात राजा सवाई मानसिंह दुसरे आणि त्यांच्या पत्नी गायत्रीदेवी राजघराण्याचे प्रमुख होते. त्याचसोबत ते राजकारणात देखील सक्रिय होते.

गायत्रीदेवी यांनी जयपुरमधून तीन वेळा कॉंग्रेसच्या उमेदवाराला हरवून दाखवलं होतं. गायत्रीदेवी आणि त्यांचे पती स्वतंत्र पार्टी मार्फत विरोधाचा सुर आवळत होते.

साहजिक इंदिरा गांधींच्या रडारवर असणाऱ्या व्यक्तीमध्ये गायत्रीदेवी यांच नाव सर्वात पुढं होतं.

आणिबाणी लागली आणि सत्ताधारी पक्ष जे हत्यार आजही बाहेर काढतात तेच इंदिरा गांधींनी काढलं.

गायत्रीदेवी आणि त्यांच्या घराण्यावर आयकर विभागामार्फत धाडी टाकण्यात आल्या. १९७६ साली ही कारवाई करण्यात आली. कारवाई गुप्तपणे करायची होती पण ते शक्य झालं नाही. याच धाडीमध्ये इंदिरा गांधींनी जयगडचा खजिना शोधण्यासाठी सैन्याची एक तुकडी देखील सामील केली होती. तीन महिने या तुकडीने जयगडचा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला खोदकाम केलं. किल्ल्यातील अनेक गुप्त जागा शोधून काढण्यात आल्या.

अखेर तीन महिन्यानंतर सरकारने जाहीर केलं की हे अभियान थांबवण्यात आलं आहे आणि आमच्या हाताला काहीच सापडलं नाही.

आत्ता प्रकरण इथेच संपल असत तर ठिक होतं पण तस झालं नाही, झालं काय की दिल्ली जयपूर हा राज्यमार्ग काही दिवसात तीन दिवसांसाठी बंद कऱण्यात येणार असल्याची सुचना करण्यात आली.

सैन्याची वहाने दिल्लीला जाण्यासाठी हा राज्यमार्ग बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली.

ठरल्याप्रमाणे सैन्याचे ट्रक्स या रस्त्यांवरून दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आणि पुन्हा बातमी पसरली की जयगडचा खजिना इंदिरा गांधींना सापडला आणि गांधींनी तो लंपास केला. पण ही फक्त सांगण्याची गोष्ट होती.

ज्याप्रमाणे राजा मानसिंग यांने दिल्ली दरबारला फसवून खजिना आपल्याकडे ठेवल्याचं रहस्य इतके वर्ष चालू राहिलं त्याचप्रमाणे आत्ता हा खजिना पुन्हा दिल्ली दरबारी गेल्याचं देखील रहस्यच राहिलं आजही या गोष्टींवर लोकांचे वेगवेगळे दावे आहेत पण ठाम अस उत्तर कोणाकडेच नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.