बिहारच्या राजकारणात भूकंप करणारं “बॉबी हत्याकांड” अशाप्रकारे दाबण्यात आलं होतं

बिहारच्या राजकारणात उलथापालथ करणारे हे कांड बॉबी हत्याकांड म्हणून ओळखलं जातं.  त्या काळात या हत्याकांडाने प्रचंड चर्चा निर्माण केली.  24 तास न्यूज चॅनेल नसणाऱ्या जमान्यात देखील ही बातमी काही महिने नॅशनल न्यूज म्हणून राहिली आणि कशी संपली हे सांगणारा हा किस्सा. 

श्वेतानिशा त्रिवेदी अर्थात बॉबी नावाची तरुणी बिहारच्या विधानसभेत टेलीफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होती.  महत्वकांक्षी स्वभावामुळे आणि बोलण्यामुळे तिचे अनेक राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध देखील होते, इतकचं नव्हे तर बिहार विधानपरिषदेच्या तत्कालीन उपसभापती राजेश्वरी सरोजदास यांनी तिला दत्तक देखील घेतलं होतं. दत्तक गेल्यानंतर तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. 

झालं अस की १९८३ साली बॉबी अर्थात श्वेतानिशाचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. 

नेमकं काय घडलं हे कळण्यापूर्वीच तीचं दफन करण्यात आलं.  तफन करण्यात आल्यानंतर तिच्या मृत्यूवरून दबक्या आवाजात चर्चा चालू झाल्या.  बॉबीचे अनेक राजकीय नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध असल्याने वेगवेगळ्या नेत्यांसोबत तिचं नाव जोडलं जाऊ लागलं.  हळुहळु का होईना या चर्चांनी बातम्यांच स्वरुप धारणं केलं आणि तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला.,

बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा तेव्हा जगन्नाथ मिश्र यांच्याकडे होती. कॉंग्रेसची सत्ता होती.  माध्यमांमधून युवक कॉंग्रेसच्या काही नेत्यांसहीत बिहार विधानसभेचे अध्यक्ष राधानंदन झा यांचा मुलगा रघुवर झा यांच्यावर देखील आरोप होऊ लागले. त्यांनीच या मुलीचा खून केल्यांच्या चर्चांनी जोर पकडला. 

आत्ता इथेचं एक कांड झालं. केंद्रात व राज्यात कॉंग्रेसच सरकार असताना देखील पटनाचे तत्कालीन पोलीस अधिक्षक किशोर कुणाल यांनी या घटनेच्या मुळापर्यन्त जाण्याची तयारी केली. बातम्या व चर्चा ऐकून त्यांनी कब्रस्तानमधून बॉबीची डेडबॉडी बाहेर काढण्याचं ठरवलं.  किशोर कुणाल यांनी बॉबीची बॉडी बाहेर काढून ती पोस्ट मार्टमसाठी पाठवली.

तेव्हा बॉबीला विषाचं इजेक्शन देऊन मारण्यात आल्याचं स्पष्ट झालं त्याचसोबत तिचं यौन शोषण केल्याचंही स्पष्ट झालं. 

झालं प्रकरण चर्चेत आलं. बिहारचं राजकारण तापू लागलं. यामध्ये कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना अटक होईल अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. किशोर कुणाल यांच्या धाडसाचं कौतुक होऊ लागलं तेच एक बातमी आली, किशोर कुणाल यांच्या बदलीची ती बातमी होती. किशोर कुणाल यांची पटन्याहून बदली करण्यात आली. त्यानंतर प्रकरण अजूनच तापलं.

राष्ट्रीय मिडीयात इंदिरा गांधी व जग्गनाथ मिश्रा चर्चेत आले. त्यामुळे ही केस CBI कडे वर्ग करण्यात आली. CBI कडे केस गेल्यानंतर मात्र प्रकरणाचे कोणतेच धागे जुळवता आले नाहीत. काही दिवसात प्रकरण शांत होत गेलं आणि इतिहासाच्या पानांमध्ये कायमच नाहीसं झालं…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.